Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वाळव्यात राष्ट्रवादीची फिल्डिंग टाईट
इस्लामपूर, २० एप्रिल / वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीमती निवेदिता माने यांना वाळवा तालुक्यातून ५० ते ६० हजारांचे मताधिक्य मिळालेच पाहिजे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने दिवसरात्र एक करून बूथवाईज काम करावे. जो कार्यकर्ता आपल्या कामात कसूर करेल, त्याला यापुढे आपले दार बंद असेल, असा रोखठोक इशारा देत गृहमंत्री जयंत पाटील यांनी उमेदवार श्रीमती निवेदिता माने यांच्या प्रचाराची वाळवा तालुक्यात फिल्डिंग टाईट केली. जो कार्यकर्ता प्रचारात व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मताधिक्यात मागे राहील, त्याची गय

 

केली जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला.
वाळवा तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा येथील विजया सांस्कृतिक भवनात आयोजित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार श्रीमती निवेदिता माने यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे सांगून निवडणूक जरी लोकसभेची असली तरी माझी वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या निकालावर माझे राजकीय भवितव्य पणाला लागले असल्याची जाणीव त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. निवडणूक ग्रामपंचायतीची आहे व जयंत पाटील हे या निवडणुकीला उभे आहेत, असे समजून कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात कामाला लागावे. प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त कसे मतदान होईल व होणाऱ्या मतदानात उमेदवार श्रीमती निवेदिता माने यांनाच जास्तीत जास्त मतदान करण्याचा माझ्या कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न करावा. माझ्यावर प्रेम असेल, तर त्यांनी मनापासून काम करावे, असे आवाहन करतानाच गेली अनेक वर्षे मी कार्यकर्त्यांचे ऐकत आलोय, विकासकामात व वैयक्तिक कामात मी कोठेही कमी पडलो नाही. आता तुम्हीही कमी पडू नका, असे सांगतानाच जो हे करणार नाही, त्याची गयही केली जाणार नाही, असा सज्जड दम जयंत पाटील यांनी देताच या दमाचेही उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे टाळय़ा वाजवून स्वागत केले.
लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगले असल्याचे सांगताना माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी शेतात पीक चांगले असून भागत नाही, तर त्याची राखण करून ते पदरात पाडून घेणे महत्त्वाचे असल्याने कार्यकर्त्यांनी अफवा व खोटय़ानाटय़ा प्रचाराला बळी न पडता जास्तीत जास्त मतदान आपल्या उमेदवार श्रीमती निवेदिता माने यांनाच कसे होईल, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विलासराव शिंदे यांनी गेल्या पाच वर्षांत शरद पवार यांनी व काँग्रेसप्रणीत केंद्र शासनाने गावपातळीपर्यंत केलेल्या विकासकामांचा व राबविलेल्या योजनांचा आढावा घेऊन आपण आष्टा व परिसरातून उमेदवार श्रीमती निवेदिता माने यांना विक्रमी मताधिक्य दिले नाही, तर पुन्हा तोंड दाखविणार नाही, अशी जाहीर प्रतिज्ञा केली. या मेळाव्यात राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष माणिकराव पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील व तालुका अध्यक्ष विष्णुपंत शिंदे यांची भाषणे झाली. संजय पाटील यांनी आभार मानले.