Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पत्नीचा खून केल्याबद्दल जन्मठेप
कोल्हापूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हॉटेल राज डिलक्समध्ये आपल्या पत्नीचा रूमालाने गळा आवळून खून केल्यावरून श्रीकांत बापूराव गायकवाड याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. शुक्रे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारच्या वतीने अ‍ॅड. श्रीमती मंजूषा

 

पाटील यांनी काम पाहिले.
सोलापूर जिल्ह्य़ाच्या बार्शी तालुक्यातील सारोळे या गावी राहणारा श्रीकांत गायकवाड याचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुलेही आहेत. पहिले लग्न लपवून ठेवून त्याने राजश्री नावाच्या युवतीशी दुसरे लग्न केले. राजश्री ही शाहूवाडी तालुक्यातील कडवे या गावी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस होती. श्रीकांतचे पहिले लग्न झाले असल्याचे राजश्रीच्या लक्षात आल्यानंतर तिने आकांडतांडव केला. तसेच आपण फसले गेलो आहोत असे तिने आपल्या आईसही सांगितले होते. त्यामुळे श्रीकांत गायकवाड हा राजश्रीवर संतप्त झाला होता.
३ सप्टेंबर २००७ रोजी श्रीकांत गायकवाड याने आपली द्वितीय पत्नी राजश्री हिला शाहूवाडी तालुक्यातील कडवे गावातून कोल्हापुरात बोलावून घेतले होते. महालक्ष्मी दर्शनाचे त्याने कारण सांगितले होते. राजश्री कोल्हापुरात आल्यानंतर त्याने हॉटेल राज डिलक्समध्ये एक रूम भाडय़ाने घेतली. त्याच रात्री राजश्रीचा रूमालाने गळा आवळून तिचा खून केला. यावेळी राजश्रीबरोबर तिचा ३ महिने वयाचा मुलगाही होता. राजश्रीला ठार मारल्यानंतर श्रीकांतने रूमच्या बाहेर येवून व्हेंटीलेटरमधून आतमध्ये हात घालून कडी लावून घेवून तो पळून गेला होता. सकाळी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज रूममधून येवू लागल्यानंतर हॉटेल व्यवस्थापकांनी पोलिसांच्या मदतीने दरवाजा उघडला असता राजश्रीचा मृतदेह खाटेवर पडलेला आढळून आला. तिचा मुलगा मृतदेहाजवळच रडत होता. राजश्रीचा खून केल्यानंतर पळून गेलेल्या श्रीकांतने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. मी राजश्रीचा खून केला आहे. माझा शोध घेवू नका मी स्वत:हून पोलिसांत हजर होत आहे. माझ्या मुलास सांभाळण्यासाठी माझ्या सासूला बोलावून घ्यावे असा मजकूर या चिठ्ठीमध्ये होता.
या खटल्यात प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नव्हता. परिस्थितीजन्य पुराव्यावरून अ‍ॅड. मंजूषा पाटील यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य़ धरून न्या. शुक्रे यांनी श्रीकांत बापूराव गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.