Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मुंबई हल्ल्यातील हौतात्म्यावर शंका घेणाऱ्या अंतुलेंवर खटला भरावा- रामदास कदम
कोल्हापूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांच्या हौतात्म्याबद्दल शंका उपस्थित करून त्यांचा अवमान करणाऱ्या बॅ. ए. आर. अंतुले यांच्याविरुध्द राज्य शासनाने खटला दाखल करावा अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय देवणे यांच्या

 

प्रचारसभेसाठी श्री. कदम हे आज कोल्हापुरात आले होते.
२६/११ च्या मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यावेळी हेमंत करकरे, अशोक कामटे यांना कामा हॉस्पिटलकडे पाठवले कोणी ? हा प्रश्न बॅ. ए. आर. अंतुले यांनी आपल्या प्रचारसभेच्यावेळी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. पाच महिन्यांपूर्वी हाच प्रश्न उपस्थित करून तेंव्हा श्री.अंतुले यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या गंभीर वक्तव्याकडे लक्ष वेधले असता रामदास कदम यांनी अंतुले हे पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत. हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या अंतुले यांच्यावर राज्य शासनाने तातडीने खटला दाखल करावा अशी मागणी केली.
पदोपदी राजर्षी शाहू महाराजांचे नांव घ्यायचे आणि कृती मात्र उलटी करायची, महाराष्ट्राच्या भूमितच राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना छेद देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस यांची उमेदवारी घेणारे राजर्षी शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना रामदास कदम यांनी संभाजीराजेंकडून ही अपेक्षा नव्हती असे सांगितले. ९० हजार कोटी रुपयांची खतावरील सबसिडी रद्द करून ७१ हजार कोटी रुपयांची कर्जे माफ करणाऱ्या केंद्र सरकारला या देशातील या राज्यातील शेतकरी माफ करणार नाही असे ते म्हणाले. कणकवलीतील अंकुश राणे यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची अतिशय खोलात जावून चौकशी करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात. या प्रकरणात शिवसेनेला गोवण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा देताना उद्योगमंत्री नारायण राणे हे अंकुश राणे हत्येचे राजकीय भांडवल करीत आहेत असे स्पष्ट करताना रामदास कदम यांनी श्रीधर नाईक हत्या प्रकरणात कोण होते ? बेपत्ता रमेश गोयेकर याचे काय झाले ? असे सवाल उपस्थित केले.
निवडणुका जाहीर होण्याच्या आधी आणि नंतरही कांही दिवस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होणार अशी चर्चा वृत्तपत्रातून सुरू होती. अशी चर्चा सुरू व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पध्दतशीर खतपाणी घातले. अशी कोणतीही युती होणार नाही हे मी त्यावेळी ठामपणाने सांगितले होते. या चर्चेला वृत्तपत्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचे श्री.कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. संपूर्ण महाराष्ट्राचा मी दौरा केला असून सर्वत्र शिवसेना भाजपला अनुकूल वातावरण आहे. जनतेला बदल हवा आहे अशी आपली निरीक्षणे असल्याचे श्री.कदम यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला उमेदवार विजय देवणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, राजेश क्षीरसागर हे उपस्थित होते.