Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

हातकणंगलेत प्रचाराला वेग
इस्लामपूर, २० एप्रिल / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा संपला तरीही तालुक्यातील वातावरण शांत शांत असतानाच दुसऱ्या टप्प्यात मात्र मतदारांना मतदानाचे आवाहन करणाऱ्या व विविध पक्षाचे झेंडे लावलेल्या तुरळक प्रमाणातील गाडय़ा धावू लागल्याने या गाडय़ा लोकसभा निवडणूक सुरू असल्याची

 

जाणीव करून देऊ लागल्या आहेत. बाकी सर्वत्र शुकशुकाटच आहे.
पहिल्या टप्प्यात हातकणंगले मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खासदार निवेदिता माने यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री जयंत पाटील यांनी गाववार प्रचार सभा घेतल्या. जिथे जिथे प्रचार सभा झाल्या, तिथे तिथे सभेच्या दिवशीच निवडणुकीच्या वातावरणाची निर्मिती झाली. इतरत्र पूर्ववत स्तब्धता. देशभरातील प्रचारसभांच्या बातम्या वृत्तपत्र व दूरदर्शनवरून वाचल्या, पाहिल्या गेल्या. तेवढय़ापुरतीच लोकसभा निवडणुकीची जाणीव होत होती. काही मंडळी कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येईल, याची चर्चा करून निवडणुकीत सहभागी होऊ पहात होती. मात्र तेही मर्यादितच घडत असल्याने बाकी सर्वत्र सामसूमच जाणवत होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आमदार राजू शेट्टी यांनी काही गावात प्रचारसभा घेतल्याने वातावरण निवडणूकमय होऊ लागले आहे. उशिराने का होईना, परंतु तयारीनिशी शिवसेना पुरस्कृत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ दोन्ही बाजूला घोषणांचे भलेमोठे फलक लावलेल्या चित्ररथासारख्या गाडय़ा धावू लागल्याने व त्यांनीही जाहीर सभा घेण्यास सुरूवात केल्याने या वातावरणातील उत्साह वाढू लागला आहे.
निवडणुकीचे वातावरण तुलनेने थंड असले तरी जीवघेण्या उन्हाने मात्र वातावरण एकदम तापू लागले आहे व हे तापलेले वातावरण जनतेला असह्य़ होऊ लागले आहे. त्याचाही विपरित परिणाम प्रचार यंत्रणेवर झाल्याने ही यंत्रणाही संथगतीने चालू लागली आहे. सध्या रस्त्यावरचाच प्रचार सुरू असून येत्या एक- दोन दिवसात घरोघरी भेटी देऊन प्रचार करण्याचे काम सुरू होईल व पक्ष कार्यकर्ते जेव्हा घरोघरी जातील, प्रभागनिहाय प्रचारफेऱ्या काढतील, तेव्हाच वातावरण निवडणूकमय होईल, तोपर्यंत सारं कसं शांत शांतच असेल!