Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

देशाला सतत निवडणुका परवडणार नाहीत - शरद पवार
सातारा, २० एप्रिल/प्रतिनिधी

केंद्रात सरकार बनविण्यासाठी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे गेल्या वेळेप्रमाणेच काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार बनविण्याची वेळ येणार आहे. देशाला पुन:पुन्हा निवडणुका परवडणार नाहीत. देश एकसंध ठेवण्यासाठी सेना-भाजपसारख्या धर्माध

 

शक्तीला बाजूला ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले.
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या विराट सभेत शरद पवार बोलत होते. काँग्रेसचे नेते पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची या वेळी भाषणे झाली. व्यासपीठावर मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, लक्ष्मणराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार विलासराव पाटील उंडाळकर, विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप यांच्यासह जिल्ह्य़ातील नेतेमंडळी, तसेच श्रोत्यांमध्ये राजमाता कल्पनाराजे भोसले यांची उपस्थिती होती.
उदयनराजे मित्रमंडळाने शरद पवार यांना भवानीमातेची तलवार भेट दिली. ती त्यांनी उदयनराजे यांच्याकडे सुपूर्द केली व महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याचे आवाहन केले. या तडफदार उमेदवाराला विजयी करून ऐतिहासिक कामगिरी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
ते म्हणाले की, शिवसेनेने निवडणुकीत कार्यक्रम सांगावा, बालिशपणे टीका करू नये. तसे करणाऱ्यांना शांततेने मतदानाद्वारे स्वाभिमानी जनता दूर केल्याशिवाय राहणार नाही. आपण सातारा व माढा मतदारसंघातील दुष्काळी जनतेचा प्रश्न संपविण्यासाठी २४ तास वीज देण्याची पराकाष्ठा करू.
उदयनराजेंना मनापासून पाठिंबा देऊन ज्या छत्रपती घराण्याने सर्वसामान्य जनतेला प्रतिष्ठा दिली, ती वाढविण्यासाठी संसदेत पाठवून सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन केले. उदयनराजेंनी आपली चुरस पवारसाहेबांशी नाही, ती जातीयवादी शिवसेनेशी आहे. ठाकरे शैलीची भाषा करणाऱ्यांना छत्रपतींची शैली माहिती नाही, ती दाखवून देऊ, असे सांगितले.