Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘अडवाणी हेच दहशतवादाचा मजबूत बीमोड करू शकतात’
सोलापूर, २० एप्रिल/प्रतिनिधी

देशाला राजकीय स्थैर्य लाभण्यासाठी लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाला पर्याय नाही. अडवाणी

 

हेच दहशतवादाचा मजबूतपणे बिमोड करु शकतील. त्यासाठी मतदारांनी आपली ताकद भाजपच्या पाठीशी उभी करावी, असे आवाहन भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी केले.
सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्या प्रचारार्थ शहर उत्तर भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेचा समारोप करताना ते बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख विठ्ठल जाधव, नगरसेविका शोभा बनशेट्टी, श्रीशैल बनशेट्टी, महेश धाराशिवकर आदी उपस्थित होते. माणिक चौकातील आजोबा गणपतीची पूजा करुन पदयात्रेस प्रारंभ झाला. धाकटा राजवाडा, भांडे गल्ली, पुकाळे डेअरी, विजापूर वेस, पाणी वेस, दत्त चौक, जुने विठ्ठल मंदिर, टिळक चौक या भागातून काढण्यात आलेल्या या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला.
अपंगांनी युतीला साथ द्यावी
अपंगांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी अपंग बांधवांनी भाजप-सेना युतीच्या पाठीशी राहावे, असे आवाहन भाजप अपंग आघाडीचे अध्यक्ष, अ‍ॅड. लक्ष्मीकांत कोंडा यांनी अपंगांच्या बैठकीत केले. युतीला पाठिंबा देण्यासाठी सावरकर पुतळ्यापासून तीन चाकी सायकलींसह अपंगांची फेरी काढण्यात आली होती.
कामगार सेनेचे आवाहन
देशातील संपूर्ण विडी उद्योगातील कामगारांना धूम्रपानविरोधी कायद्याच्या खाईत लोटणाऱ्या काँग्रेसला पराभूत करुन कामगारांनी आपली शक्ती दाखवून द्यावी, असे आवाहन शिवसेनाप्रणीत विडी व यंत्रमाग कामगार सेनेचे सरचिटणीस विष्णू कारमपुरी यांनी विडी कामगारांच्या मेळाव्यात केले. अध्यक्षस्थानी पद्मा म्हंता या होत्या.