Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘दोन्ही काँग्रेसचे उच्चाटन करून भाजप मित्रपक्षांची सत्ता आणावी’
फलटण, २० एप्रिल/वार्ताहर

देशातील जनतेला रोजगार, वीज, पाणी या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवण्याचे व कर्जाच्या छायेत लोटण्याचे काम काँग्रेस आघाडी सरकारने केले असून, लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे उच्चाटन करून भाजप मित्रपक्षांची सत्ता आणण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजपा

 

अध्यक्ष आमदार नितीन गडकरी यांनी केले.
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ येथील डेक्कन चौकामध्ये आयोजित जाहीर सभेत नितीन गडकरी बोलत होते. यावेळी खासदार सुभाषराव देशमुख, आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार बाबुराव माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विकास राऊत आदी उपस्थित होते.
कृष्णा खोऱ्यातील कामे आघाडी सरकारला करता आली नाहीत. याचा दोष मुंडे व गडकरी म्हणजे आमच्यावर दिला जातो. काँग्रेस आघाडीने ९ वर्षे संसार केला मात्र कृष्णा खोऱ्याची कामे केली नाहीत. म्हणजे यांना पोर झाली नाही तर त्यात आमचा काय दोष आहे? आमची मदत मागितली असती तर आम्ही दिली असती असा उपरोधिक टोलाही गडकरी यांनी लगावला.
कृष्णा खोऱ्याची पहिली घटना मी तयार केली. मात्र काँग्रेस आघाडी सरकारने कृष्णा खोऱ्याचे एकही काम पूर्ण केलेले नाही. उलट या प्रश्नावर झुलविण्याचे काम ते करीत असून, कृष्णा खोऱ्याची कामे करण्यापेक्षा टक्केवारीच्या कामामध्ये त्यांना रस असल्याचा आरोपही गडकरी यांनी केला.
शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजप-शिवसेना नेत्यांना शेतीतील काही समजत नाही. सात-बारा समजत नाही असा आरोप करतात. परंतु माझ्याकडे ४७ एकर जमीन आहे. पवारांकडे एक गुंठाही जमीन नाही. माझा स्वत:चा साखर कारखाना आहे. १२०० रुपये दर मी ऊस कमी असतानाही शेतकऱ्यांना दिला आहे. १६ कोटी रुपयांची वीज प्रतिवर्षी माझा कारखाना निर्माण करतो, असे स्पष्ट करून गडकरी म्हणाले, विदर्भ-मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबईत दोन्ही काँग्रेसचे नामोनिशान राहणार नाही. पश्चिम महाराष्ट्रानेच फक्त दोन्ही काँग्रेसला चांगली साथ दिली. मात्र या काँग्रेसने जनतेशी गद्दारी करीत त्यानंतर फसविण्याचे काम केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जनता ही शिवरायांच्या रक्ताची वारस आहे. दुष्काळी जनतेने राष्ट्रवादीच्या अफजलखान व शाहिस्तेखानाच्या भ्रष्ट फौजेला पराभवाचा धक्का द्यावा, असे आवाहनही गडकरी यांनी केले.
मुंबई बॉम्बस्फोटातील शहीद पोलिसांचा अपमान करणाऱ्या बॅ. अ. र. अंतुले यांचा साधा निषेधही काँग्रेसने केला नसून, मतपेटीच्या राजकारणासाठी दोन्ही काँग्रेसने जाती जातीला लाचार केले आहे. मतदारांनी भाजपला साथ द्यावी आम्ही दोन वर्षांत राज्य भारनियमनमुक्त करू, कृष्णा खोऱ्याची कामे पाच वर्षांत करू, प्रत्येकाच्या हाताला काम देवू अशी ग्वाहीही गडकरी यांनी दिली.
या वेळी खा. सुभाष देशमुख, आमदार डॉ. दिलीप येळगावकर आदींची भाषणे झाली.