Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

डावे व तिसऱ्या आघाडीमुळेच पवारांना पंतप्रधानपदाची संधी - गोविंदराव आदिक
सोलापूर, २० एप्रिल/प्रतिनिधी

डावे आणि तिसऱ्या आघाडीला डावलून कोणालाही पंतप्रधान होता येणार नाही. काँग्रेसचा पंतप्रधान डाव्या व तिसऱ्या आघाडीला मान्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी प्राप्त झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष

 

गोविंदराव आदिक यांनी सांगितले.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आदिक हे सोमवारी आले होते. त्यावेळी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यंदाची लोकसभा निवडणूक ही धर्मनिरपेक्ष शक्ती विरुद्ध जातीयवादी शक्ती यांच्यातील लढत असून, यात धर्मनिरपेक्ष शक्तीचा विजय होणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, देशापुढे राजकीय अस्थिरता, महागाई, मंदी, बेरोजगारी, विकास असे महत्त्वाचे प्रश्न असताना त्यावर चर्चा करण्यापेक्षा वेगळ्याच मुद्यावर विरोधक चर्चा करून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न करतात; परंतु मतदार आता सुज्ञ झाला आहे. देश सर्व जाती-धर्माचा असून, कोणत्याही एका धर्माचा असू शकत नाही. हीच भूमिका तरुण पिढीने स्वीकारली आहे. त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत जरूर येईल, असा विश्वास आदिक यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातून पंतप्रधान व्हावा, असे अनेक दिवसांपासूनचे मराठी माणसांचे स्वप्न आहे. यशवंतराव चव्हाण यांना उपपंतप्रधान होण्याची संधी लाभली होती. त्यानंतर शरद पवार यांच्यासारखा मराठी मातीला अभिमान वाटावा असा नेता मिळाला. पंतप्रधानपदासाठी त्यांचे नेतृत्व सक्षम असून, त्यांना सर्वानी साथ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत डाव्या आणि तिसऱ्या आघाडीशिवाय कोणालाही पंतप्रधान होता येणार नाही. काँग्रेसच्या पंतप्रधानाला त्यांचा विरोध असल्याने आता शरद पवार यांनाच पंतप्रधान होण्याची संधी मिळाल्याचा दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदेस माजी खासदार धर्मण्णा सादूल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कय्युम बुऱ्हाण आदी उपस्थित होते.