Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अडवाणी देशाचे भले करू शकणार नाहीत - पृथ्वीराज चव्हाण
सातारा, २० एप्रिल/प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षांतील यूपीए सरकारची कामगिरी प्रचंड प्रगतीची झाली आहे. ती कायम ठेवण्याची, आर्थिक संकटाचा सामना करण्याची क्षमता असणारे दिल्लीतील बळकट सरकार स्थापण्यासाठी काम करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शरद पवार व उदयनराजे यांना विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले व भाजपाचे

 

लालकृष्ण अडवाणी देशाचे भले करू शकणार नाहीत, असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर रविवारी रात्री झालेल्या सभेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह जिल्ह्य़ातील काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआयचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवार यांनी उदयनराजेंची निवड करून काँग्रेस विचाराच्या लोकांना एकत्र आणण्याचे काम केले. त्यामुळे जिल्ह्य़ात नवीन राजकारणाची दिशा सुरू झाली आहे.आपण सोनिया गांधींचा संदेश घेऊन येथे आलो आहे. धर्माध जातीयवादी शक्तीला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी मतभेद विसरून काम करावे. ही निवडणूक ऐतिहासिक स्वरूपाची आहे.
एनडीए सरकारच्या काळात विकासाचा दर ५.८ एवढा होता. तो यूपीएच्या सरकारच्या काळात ८.५ वर आला. अन्नधान्याच्या बाबतीत उत्पन्नाचे रेकॉर्ड झाले आहे. महागाईचा दर शून्यावर आला. आता देशातील दारिद्रय़ नाहीसे करण्याचे स्वप्न यूपीएचे आहे. गेल्या २००४ मधील निवडणुकीपेक्षा अधिक संख्येने खासदार आमचे येतील, असे संकेत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
उदयनराजे प्रचंड वेगाने काम करणारे उमदे नेते आहेत. जिल्ह्य़ातील दुष्काळ, धरणग्रस्त, सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या, साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्याची ताकद केंद्र सरकारात आहे. वाजपेयींच्या गतीने सरकार गेले असते तर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नसती व विकास दर ९ पर्यंत वाढलाही नसता.
उदयनराजे म्हणाले की, जिल्हा आदर्श करण्याचे आपले स्वप्न आहे. खासदार लक्ष्मणराव तात्यांनी मताच्या विक्रमाबाबत पवारसाहेबांशी चुरस लावण्याची भाषा केली आहे. पण आपण चुरस पवारसाहेबांशी नाही, तर जातीयवादी पक्षाशी करतो. भूमाता दिंडीत दिलेला शब्द पाळण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.
वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी पाणी आणि वीज, रोजगाराचे प्रश्न मार्गी लावून सातारा जिल्ह्य़ाला गतवैभव प्राप्त करून देणार आहे. त्यासाठी जिल्ह्य़ातील अनुभवी सर्व नेत्यांचे मार्गदर्शन व सर्वाची साथ घेऊन वाटचाल करेन, असा शब्द उदयनराजेंनी या वेळी दिला.
शिवेंद्रच्या धाकाने दबकत बोलत असल्याचे सांगून राजमाता कल्पनाराजे यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी आपल्या खास शैलीचे दर्शन घडवत उद्धव ठाकरेंना आव्हान दिले. पायाला भेगा पडल्या असल्याचे दाखवण्यास ते यावेळीही विसरले नाहीत.
राजा असून नसल्यासारखा वागतोय, तर ते (उद्धव) शिवसेनेचे स्टार प्रचारक राजा नसून उंची बूट घालून राजासारखे वागत आहेत. त्यांना छत्रपतींची शैली माहीत करून देण्यासाठी ठिकाण ठरवण्याचे आवाहन केले. छत्रपतींचे नाव घेणे सोपे आहे, पण त्यांचे विचार आचरणात आणणे अवघड आहे. ते जमत नसेल तर शिवसेनेचे नाव बदलून बकरी/ठाकरे सेना करा. बघू किती लोक त्यात राहतात. राजचा मला फोन आला तो म्हणाला, मी तुमच्या बरोबर आहे. स्वार्थासाठी भावनेशी खिलवाड करण्याची त्यांची हातोटी असली तरी ती जास्त काळ चालणार नाही.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, पवारसाहेबांनी आम्हाला हवा तो उमेदवार दिला व मनोमीलन टिकवले. मराठय़ांचा नेता अस्मिता जाणू शकतो. बाकीचे स्वत:चे तेल ओतून मनोमीलनात विघ्न आणण्याचे काम करीत होते.
स्वागतासाठी सभेत आणलेल्या राजे प्रतिष्ठानच्या भगव्या झेंडय़ाबाबत ते म्हणाले, आता भगवे वादळ अजिंक्यताऱ्याला धडकून नाहीसे होईल. छत्रपतींवर प्रेम करणाऱ्यांचा भगवा झेंडा गुलाल घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जातीयवादी शक्तींच्या विरोधात पक्ष असल्याचे सांगून सत्तेत वाटा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.