Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य - देवणे
कोल्हापूर, २० एप्रिल / नंदकुमार ओतारी

जिल्हा प्रशासनाशी, राज्य शासनाशी आणि केंद्र शासनाशी निगडित असलेले सामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, विद्यार्थी, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त यांचे असंख्य प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांचा माझा सखोल अभ्यास असल्यामुळे ते सोडविण्यासाठी लोकसभेच्या माध्यमातून उपयोग होईल या भूमिकेतून मी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवतो आहे. या लढतीमध्ये मी निश्चित विजयी होईन असा विश्वास विजय

 

देवणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.
महागाईपासून ते पर्यावरणापर्यंत, सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून श्रमिकांपर्यंत आणि सामान्य गृहिणींपासून विद्यार्थी,कलाकारापर्यंत अशा विविध घटकांचे, समूहांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता म्हणून विजय देवणे हे सुपरिचित आहेत. विविध प्रश्नांसाठी, मागण्यांसाठी अगणीतवेळा आंदोलनामध्ये स्वतला झोकून देणाऱ्या विजय देवणे यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली तो क्षण त्यांना आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण वाटतो.उमेदवारी जाहीर झाल्यापासून श्री.विजय देवणे यांनी पायाला अक्षरश भिंगरी लावली आहे. पहाटे सहा वाजता सुरू होणारा त्यांचा दिवस मध्यरात्री संपतो. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख राजेश क्षीरसागर, भाजपचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, शेतकरी संघटनेचे पी.जी.पाटील यांना सोबत घेऊन प्रचाराचा धुमधडाका उडविला आहे. नुकत्याच त्यांनी ग्रामीण भागातील प्रचार संपवून ते आता मतदानापर्यंत शहराचा कोपरान्कोपरा पिंजून काढणार आहेत. प्रचाराच्या घाईगडबडीत असलेल्या विजय देवणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना आपल्या विजयाचा मार्ग कसा सुकर होतो आहे हे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर भाव मिळत नाही, खते आणि बि-बियाणे खरेदीसाठी अनुदान दिले जात नाही, पाणी असूनही भारनियमनामुळे शेतीला पाणी पुरवठा होत नाही, देशातील सर्वाधिक विषारी नदी म्हणून केंद्र शासनानेच जाहीर केलेल्या पंचगंगा नदीचे प्रदूषण सातत्याने वाढतेच आहे.विभागीय क्रीडा संकुल उभारणीसाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही हे संकुल कागदातच अडकले आहे. बांधा, वापरा, हस्तांतर करा या तत्वावर चित्रनगरीचा विकास करण्याचा निर्णय झाला आहे. ३५० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होऊनही त्याच्या निविदा अद्याप निघालेल्या नाहीत. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी देशभरातून आणि जोतिबाच्या दर्शनासाठी राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात पण अजूनही कोल्हापूरला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला नाही. आयटी पार्कवर केवळ चर्चाच होते आहे प्रत्यक्षात कृती शून्य आहे. कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही अनेक वर्षांची मागणी प्रलंबित आहे. असे किती तरी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून राज्य व केंद्र शासनाच्या स्तरावर धूळ खात पडून आहेत. पण ही धूळ झटकण्याचे कामही इथल्या खासदार, आमदारांनी केलेले नाही. याबद्दल खंत व्यक्त करताना विजय देवणे यांनी या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे शोधण्याचा आणि कोल्हापूरचा विकास करण्याचा आपला प्रयत्न राहील असे सांगितले.
युवक, महिला, विद्यार्थी, विचारवंत, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, इंजिनिअर, कलाकार या सर्व घटकांशी या ना त्या निमित्ताने, आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांत जवळीक साधली आहे. समाजाचे क्रिम असणारे हे घटक माझ्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. हे घटक आणि सर्वसामान्य जनता हिच माझी या निवडणुकीतील बलस्थाने आहेत. या निवडणुकीत माझे नजिकचे प्रतिस्पर्धी संभाजीराजे छत्रपती हे आहेत. संभाजीराजे हे राजघराण्यातील आणि मी तीन खोल्यांच्या घरामध्ये राहणारा सामान्य कार्यकर्ता आहे. दहा वर्षांपूर्वी माझी जी सांपत्तिक स्थिती होती तीच आजही आहे. त्यामुळेच सामान्य जनतेला मी जवळचा उमेदवार वाटतो. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सुमारे १७०० गावे, वाडय़ावस्त्या आहेत. त्यापैकी एक हजार गावांपर्यंत पोहचून थेट मतदारांशी संपर्क साधणारा मी एकमेव उमेदवार आहे.दिवसाला ४० किलोमीटरचा प्रवास करून मी घरोघरी संपर्क साधलेला आहे. सामान्य आर्थिक स्थितीतील आणि कायम आंदोलनात असणारा कार्यकर्ता म्हणून मला लोकांची सहानुभूती आहे. त्यामुळेच निवडणूक खर्चासाठी सामान्य लोक मला आर्थिक मदत करत आहेत. सात ते आठ लाख रुपये अशा मदतीतूनच उभे झाले आहेत. आजही सकाळी घरातून बाहेर पडताना मदत म्हणून ५० हजार रुपये मिळाले आहेत. आर्थिक मदत करणारे कोणी धनदांडगे नाहीत. तर सामान्य माणूस आहे, कष्टकरी आहे, श्रमीक महिला आहेत. राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या आघाडी सरकारबद्दल जनमानसात सुप्त अशी अंतोषाची लाट आहे. शिवसेना-भाजप बद्दल लोकांचे आकर्षण वाढते आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संभाजीराजे छत्रपती आणि अपक्ष उमेदवार माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यात काँग्रेस आघाडीची मते विभागली गेली आहेत. त्याचा लाभ मला नक्कीच मिळणार असल्याचे श्री.देवणे यांचे मत आहे. आपल्या हमखास यशाबद्दल त्यांनी शहर (पाच लाख) आणि शहराला लागून असलेल्या भागांमध्ये (अडीच लाख) असे साडेसात लाख मतदार आहेत. या भागांवर माझा प्रभाव इतर उमेदवारांच्या तुलनेत जास्त असल्याचे सांगितले.
निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या कार्यकर्त्यांंमध्ये नाराजीची मोठी लाट आहे त्याचाही बऱ्यापैकी लाभ आपणाला मिळेल. महाडिक यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पंच्याहत्तरी पार केलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्यापेक्षा माझ्याच उमेदवारीची चर्चा आहे. या मतदारसंघात हिंदुत्ववाद्यांची सुमारे २ लाख मते आहेत. अँटी काँग्रेस अशी १ लाख मते आहेत. ती मते शिवसेनेकडे वळतील तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न हातात घेतल्यामुळे बळीराजाचा ओढाही शिवसेनेकडेच आहे. मी गेल्या २५ वर्षांत केलेल्या विविध आंदोलनातून माझी स्वतची अशी पन्नास हजार मते या मतदारसंघात तयार केली आहेत. शिवसेना,भाजप, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते माझ्यासाठी रक्ताचे पाणी करीत आहेत. या एकूण सांघिक प्रयत्नामुळे मी या निवडणुकीत विजयाची पताका फडकाविल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम आत्मविश्वास श्री.विजय देवणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना व्यक्त केला.
या मतदारसंघात शरद पवार यांच्यासह काँग्रेस आघाडीतील नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या. पण या सभांमधून मूलभूत प्रश्न, विकासाचे प्रकल्प यावर चर्चाच झाली नाही. केवळ आरोप-प्रत्यारोपच झाले. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची सभा कोल्हापुरात झाली. त्यांनी कोणावरही टीका न करता कोल्हापूरचे तसेच राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न या सभेत लोकांच्या समोर मांडले. त्यांच्या भाषणामुळे या मतदारसंघात एक सकारात्मक लाट शिवसेनेच्या बाजूने निर्माण झाली आहे. ही लाट मला विजय मिळवून देईल असे श्री.देवणे यांनी ठामपणे सांगितले.