Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विकासाचा रोड मॅप तयार - रघुनाथ पाटील
इचलकरंजी, २० एप्रिल / दयानंद लिपारे

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचे परिपूर्ण नियोजन, या भागातील शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी केलेली यशस्वी आंदोलने, त्यातून जनतेत निर्माण झालेला विश्वास आणि शिवसेना, भाजप व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने व समर्पित भावनेने चालवलेला

 

प्रचार पाहता माझा विजय निश्चित आहे. मतदारांना कार्यक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिल्याचे समाधान वाटेल, असे मत शिवसेनेचे उमेदवार रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले.
दिवसभर रणरणत्या उन्हात प्रचारात गुंतल्यानंतर रात्री उशिरा घरी परतल्यावर रघुनाथदादा पाटील यांनी निवडणुकीच्या आखाडय़ात उतरण्यापासून ते मतदारसंघाच्या विकासाचा आराखडा, निकालाविषयीचा आत्मविश्वास, धनुष्यबाणाची मजबूत होत चाललेली बाजू आदी मुद्दय़ांवर भाष्य केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला आलेला. शेतकरी संघटनेच्या झेंडय़ाखाली काम करणाऱ्या रघुनाथदादांना अनेक नाटय़पूर्ण घडामोडींनंतर निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण घेऊन उतरावे लागले. खरे तर त्यांना स्वत:ला ही निवडणूक लढवायचीच होती. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे व्यथित झालेल्या रघुनाथदादांना कृषी, भारनियमन, बाँबस्फोट मालिकेमुळे निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण, सर्वोच्च न्यायालयाने अफजल गुरूला फाशीची शिक्षा ठोठावूनही शासनाने त्याकडे दुर्लक्ष करणे, महागाईपासून विकासाच्या कामापर्यंत सर्व बाबतींतील केंद्र शासनाचे अपयश, यामुळे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संसदेत जाण्याची आवश्यकता भासू लागली.
शासनाच्या नाकर्तेपणावर आवाज उठवण्यासाठी लोकसभेत जाऊ इच्छिणाऱ्या रघुनाथदादांकडे मतदारसंघाच्या विकासाचा रोड मॅप तयार आहे. त्यावर ते भरभरून व तडफेने बोलतात. हातकणंगले, शिरोळ, वाळव्यासारखे पूर्वेकडील सधन व सखल भाग आणि शाहूवाडी, पन्हाळा, शिराळा यांसारखे पश्चिमेकडील निर्धन व डोंगराळ भाग असा विकासाचा असमतोल इथे जाणवतो. त्यासाठी विकास समान न्यायाने होणे गरजेचे आहे.
शिवसेना, भाजप, शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते धनुष्यबाण तळागाळात पोहोचवण्यासाठी ईर्षेने कामाला लागले आहेत. त्यांचा कामाचा झपाटा, आवेग पाहून, कौतुक तर वाटतेच, पण त्यामुळे माझा विजय सुकर असल्याचे जाणवते. निवडणूक लढण्याची तयारी वेगाने व तडफेने सुरू असल्याने विजयाची खात्री रघुनाथदादांनी छातीठोकपणे वर्तविली.