Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उमेदवारी जनतेचीच असल्याने परिवर्तन अटळ - घोरपडे
मतदारसंघ आणि मी सांगली
सांगली, २० एप्रिल / शीतल पाटील

सांगली जिल्हय़ातील सत्तेचे केंद्र गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच घराण्याकडे केंद्रित झाली

 

आहे. या काळात जिल्हय़ातील एकही ठोस काम होऊ शकलेले नाही. सांगली लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. तरीही त्याकडे लक्ष देण्यास खासदारांना वेळ नाही. ते गल्लीत व दिल्लीतही दिसून येत नाहीत. अशा अकार्यक्षम व निष्क्रिय खासदाराबाबत जनतेतच तीव्र असंतोष आहे. यामुळेच आपण निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. आज मतदारसंघाचा दौरा करताना जनतेच्या भावना किती तीव्र आहेत, याचीच प्रचिती येते. आपली उमेदवारी ही जनतेचीच असून परिवर्तन अटळ आहे, असा ठाम विश्वास काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आमदार अजित घोरपडे यांनी व्यक्त केला.
सांगली मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ हे दुष्काळी आहेत. ताकारी, टेंभू व म्हैसाळ या पाणी योजना पूर्ण झाल्या असत्या, तर या मतदारसंघातही सुकाळ आला असता. आपल्या १५ वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीत म्हैसाळ योजनेला गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळेच मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांच्या शिवारात कृष्णेचे पाणी खेळू लागले. या मतदारसंघात प्रचारानिमित्त फिरताना पाण्याअभावी शेतकऱ्यांचे करपलेले चेहरे व त्यांची पाण्यासाठीची आर्त किंकाळी ऐकून मन सुन्न होते. एकीकडे दुष्काळाचा प्रश्न गंभीर असतानाच सांगली महापालिका क्षेत्रातही पिण्याचे पाणी, गुंठेवारी भागातील सोयीसुविधा, ड्रेनेज हे प्रश्नही सुटलेले नाहीत. वास्तविक या प्रश्नांसाठी राजकारण न करता त्याची सोडवणूक करणे गरजेचे होते. आजवर हे प्रश्न सुटू शकलेले नाहीत. त्यामुळेच दुष्काळी व शहरी जनतेसाठी आपणच निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचेही घोरपडे यांनी सांगितले.
आज जनतेसमोर जाताना हे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित कार्यक्रमही आपण दिला आहे. त्यामुळेच जनतेतून आपणाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. सिंचन प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून निधी मिळविणे कठीण असले तरी केंद्राकडून विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी जल आयोगाची मान्यता आवश्यक आहे. जनतेला जगण्याइतके पाणी देण्याची जबाबदारी ही शासनकर्त्यांची आहे. निवडणुकीनंतरचे पहिले काम हे पाणी योजनांना निधी आणणे व सांगली शहर हे राज्यात एक आदर्शवत शहर म्हणून ओळखले जावे, यासाठी प्रयत्न करणे, हेच राहणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मतदारसंघाचा विकास करणे, हेच ध्येय राहणार असल्याचेही ते म्हणाले.
ते म्हणाले, की वसंतदादा पाटील यांनी या योजनांना मंजुरी आणली, पण त्यांच्या नावे मते मागणाऱ्या वारसांनी या योजना पूर्ण केल्या की नाही? याचे आत्मपरीक्षण करावे. एकीकडे दुष्काळी जनतेची शुद्ध फसवणूक करताना ऊस उत्पादक शेतकरी, ठेवीदार व कामगारांनाही देशोधडीला लावण्याचे काम त्यांनी केले. आज १८०० कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा ते करतात. इतका निधी जर जिल्हय़ात आला असता तर जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाला नसता का, असा सवालही त्यांनी केला. केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी निधी आणल्याचे ते सांगत असले तरी त्यांनी एकतरी ठोस काम केल्याचे दाखवून द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
दुष्काळी तालुक्यातील जनतेचे प्रश्न प्रतीक पाटील यांनी किती समजून घेतले? त्यासाठी किती वेळ दिला? वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची दुरवस्था कोणी केली? वसंतदादा शेतकरी सहकारी बँक बुडवून ठेवीदारांना लयाला लावण्याचे पाप कोणी केले? वसंतदादा सहकारी सूतगिरणी व दूध संघ बंद पाडून कामगारांना कोणी वाऱ्यावर सोडले? याबाबत ते काहीच बोलत नाहीत. केवळ आपल्यावर टीकाटिप्पणी करणे व वसंतदादा पाटील यांचे नाव हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. ज्या लोकांना जनतेच्या भावनांशी काहीही देणेघेणे नाही. ते तुमचा काय विकास करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आज ६० वर्षांनंतर जिल्हय़ाची अवस्था ‘जैसे थे’च आहे. ना कोणता विकास झाला, ना जनतेची कामे झाली. केवळ निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागायचा व पुन्हा त्याच मतदाराला पाच वर्षे तोंड दाखवायचे नाही. आश्वासन व घोषणा करण्यातच त्यांचा वेळ गेला, अशी टीका केली.
सांगली जिल्हय़ाला कार्यक्षम लोकप्रतिनिधीची गरज आहे. आपण सतत कार्यक्षम उमेदवारालाच उमेदवारी द्यावी, अशी भूमिका घेतली होती. पण ती मान्य न झाल्यानेच जनतेच्या हितासाठी बंडखोरी करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहिला नव्हता. आज ‘जग चंद्रावर जात असताना आम्ही मात्र माळावरच’ अशीच अवस्था सांगलीकरांची झाली आहे. त्यामुळेच आपणाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला आहे. जो कोणी मतदारसंघाचे प्रश्न सोडवेल, त्यालाच आपणही पाठिंबा देणार असल्याचे ते म्हणाले. जनतेतून मिळालेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचेही अजित घोरपडे म्हणाले.