Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

भाजप जिल्हाध्यक्ष गरुड यांच्यावर निष्ठावंत गटातून तीव्र टीका
सांगली, २० एप्रिल/प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांनी ज्येष्ठ नेते बापूसाहेब पुजारी यांचा ‘काँग्रेसचा वळू’ असा अवमानकारक उल्लेख केल्यामुळे निष्ठावंत गटातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. सांगलीचे माजी शहर अध्यक्ष नंदकुमार बापट यांनी राजाराम गरुड यांनी भाजपसाठी काय काम केले? काय दिवे लावले? केवळ घोडेबाजार करण्यातच त्यांना रस आहे, अशी खरमरीत

 

टीका केली आहे.
बापूसाहेब पुजारी यांच्यासारख्या सहकार क्षेत्रातील दिग्गजावर टीका करण्यापूर्वी राजाराम गरुड यांनी आपली उंची तपासणे आवश्यक होते, असा टोला लगावत नंदकुमार बापट यांनी पुजारी यांनी व्यक्त केलेल्या मतावर त्यांनी टिप्पणी केली असती तर योग्य होते, पण मुद्दय़ाला सोडून त्यांच्यावर नाहक चिखलफेक करणे हे भ्याडपणाचे आहे. श्री. पुजारी यांचे सहकारातील योगदान हे अतुलनीय आहे. जिल्ह्य़ातील सहकारी चळवळ मोडीत निघाली असताना बापूसाहेबांमुळेच सांगली अर्बन बँक आजही तग धरून आहे. राजाराम गरुड हे ज्यांना नेता मानतात, त्यांच्या तर सर्वच नागरी सहकारी पतसंस्था डबघाईस आल्या आहेत. केवळ माती चौकातील नेत्याच्या हो ला हो म्हणण्याखेरीज गरुड यांनी भाजपसाठी कोणतेच ठोस काम केलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
राजाराम गरुड यांच्या कारभाराला कंटाळून त्यांच्याच तालुका अध्यक्षाने भाजपचा राजीनामा दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत तासगाव तालुक्यातील निवडणुका बिनविरोध करण्यासाठी गरुड यांनीच घोडेबाजार मांडला होता. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आलेल्या निधीचे त्यांनी योग्य वाटप केले का? पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत त्यांनी किती मतदारांची नोंदणी केली? पक्षाने ‘बूथ तेथे भाजप’ हे अभियान राबविण्यास सांगितले असताना त्यांनी काय काम केले? किती नवीन मतदारांची नोंदणी केली, असे अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.
राजाराम गरुड यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कालावधीतच लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार उभा न राहण्याची नामुष्की पत्करावी लागली. त्यांच्या काळात भाजप किती वाढला, याचे गरुड यांनी प्रथम आत्मपरीक्षण करावे व मगच बापूसाहेब पुजारी यांच्यावर टीका करावी, असेही बापट यांनी म्हटले आहे.