Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

माढय़ात प्रचाराने वातावरण ढवळून निघाले..
माळशिरस, २० एप्रिल/वार्ताहर

छोटय़ा-मोठय़ा सभा, बैठका, कोपरा बैठका बरोबरच प्रत्येक आठवडा बाजारातील ओरडून प्रचाराचा धडाका, घरोघरी व व्यक्तिगत संपर्क, तसेच कार्यकर्त्यांतील वेगवेगळ्या अफवांमुळे माढा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराचे वातावरण अक्षरश: ढवळून निघाले आहे. नव्याने निर्माण झालेला माढा मतदारसंघ खुला होताच अनेकांच्या नजरा या मतदारसंघाकडे वळल्या. या मतदारसंघात आणखी ११ उमेदवार असले तरी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत हे चारच उमेदवार पोहोचले

 

आहेत.
या निवडणुकीत शरद पवारांना मताधिक्य देण्याच्या भूमिकेवर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं व शेकापने गावागावांतील गट-तट एकत्र करीत प्रचारात विकासकामे व पक्षाला राजधानीत नेतृत्व करण्याची संधी आदी मुद्दय़ांवर भर दिला आहे. भाजपाला अनेक गावांत कार्यकर्त्यांची वाणवा असल्याने गावागावांतील नाराज गट शोधत त्याद्वारे प्रचारात अडवाणींचे खंबीर नेतृत्व, संयुक्त पुरोगामी आघाडी अपयश त्याचबरोबर स्थानिक मुद्दे यावर भर दिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा व स्थानिक उमेदवारीचा मुद्दा घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे प्रचारात मतदारसंघातील धनगर समाज एकजुटीने पाठिंबा देत असल्याचा दावा करीत आहेत. बंगलोरचे रविशंकर यांच्या संकल्पनेतील भ्रष्टाचारमुक्त भारत व निसर्गशेती या मुद्दय़ावर व प्राणायम, वैद्यकीय सेवेतील शिष्यगणाद्वारे प्रथमच राजकारणात उतरलेले डॉ. माधव पोळ आपला प्रचार शक्यतो मुद्रित पत्रकांद्वारे व या मतदारसंघातील नातेवाइकांद्वारे करताना दिसत आहेत.
मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार वेग घेताना दिसत आहे. अकलूजच्या शक्ती प्रदर्शनाच्या सभेनंतर त्यांच्या प्रचारार्थ खा. राहुल गांधी, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आर. आर. पाटील, अजित पवार, अरुण गुजराथी, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जाहीर सभांचा, तर रश्मी बांगल, विलास घुमरे, शहाजी देशमुख, सुधाकर परिचारक, भारत भालके, कल्याण काळे, निवडणूक प्रतिनिधी जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, दत्तात्रय भिलारे, मदनसिंह मोहिते पाटील, गणपतराव देशमुख, अ‍ॅड. शहाजीराव पाटील, दीपक साळुंखे, रामराजे नाईक निंबाळकर, हिंदुराव नाईक निंबाळकर, बबनराव शिंदे, संजय शिंदे, संजय कोकाटे आदींच्या कोपरा बैठका व वैयक्तिक गाठीभेटी यावर जोर दिल्याचे दिसत आहे. मतदारसंघात केलेली विकासकामे, महिला आरक्षण, कर्जमाफी, बचतगट, प्रलंबित प्रश्न यावर जोर देत आहेत. सुभाष देशमुखांच्या प्रचारासाठीही लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, पाशा पटेल यांच्या सभा झाल्या आहेत. या मतदारसंघातील धनगर समाजावर बहुतेकांचा डोळा असून, आ. प्रकाश शेंडगे भाजपाबरोबर, तर रमेश शेंडगे, अण्णा डांगे, गणपतराव देशमुख हे या समाजाचे प्रतिनिधी, तसेच संख्येने मोठा असलेला माळी समाज राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे. मतदारसंघातील माण तालुक्यात तर भाजपाचा पदाधिकारीही नसल्याने देशमुखांना कार्यकर्त्यांची वाणवा भासणार असल्याचे दिसते.