Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘कृष्णा खोऱ्यातील सर्व कामे पूर्ण करू’
सांगोला, २० एप्रिल/वार्ताहर

कृष्णा खोऱ्यातील टेंभू, म्हैसाळ आदी योजनेची सर्व कामे पूर्ण करून दुष्काळी पट्टय़ातील सर्व शेतकऱ्यांच्या अंगणात कृष्णामाईचे पाणी फिरवू व खेडय़ापाडय़ातल्या शेतकऱ्यांचे आर्थिक परिवर्तन घडवून नंदनवन करु अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी

 

दिली.
माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार यांचे प्रचारार्थ सांगोला येथे आयोजित केलेल्या सभेत शरद पवार बोलत होते.
शरद पवार पुढे म्हणाले, की लोकसभेची निवडणूक देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. देशाचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी स्थिर सरकारची गरज आहे. समविचारी पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन सरकारची स्थापना केल्यास स्थिर सरकार बनेल व देशाचा विकास होईल.
शेतीच्या व पिण्याच्या पाण्याविषयी बोलताना पवार म्हणाले, की लोकसभेच्या निवडणुका झाल्या की मंगळवेढा तालुक्यातील २२ गावांचा व सांगोला तालुक्यातील अपूर्ण कामाच्या संदर्भात सर्व नेत्यांना घेऊन निधी कसा उपलब्ध करता येईल ते विचार करून निधी उपलब्ध करून कामाला गती देण्याचे काम करू. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव देणे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी जरूर प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळाले व शेतकरी सुधारला तर देश सुधारणार आहे.त्यादृष्टीने उर्वरित आयुष्य शेतकऱ्यांच्या विकासासाठी घालवणार आहे. तसेच सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यासाठी ग्रामीण भागात नवनवीन उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतीचे पाणी व वीज हे दोन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले, की शरद पवारांमुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या अपेक्षा ते नक्कीच पूर्ण करतील. त्यासाठी तुम्ही पवार यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.
आमदार गणपतराव देशमुख म्हणाले, की शरद पवारांमुळे या भागाचा कायापालट होणार आहे व कायमचा दुष्काळ हटणार आहे.त्यासाठी विक्रमी मतांनी विजयी करावे.
याप्रसंगी आमदार रमेश शेंडगे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील, सिंहगड एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक दीपक साळुंखे पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्रीकांत देशमुख यांनी मानले.