Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

चतु:सीमांवर ‘स्कायवॉच’!
श्रीहरिकोटा, २० एप्रिल/पी.टी.आय.
प्रतिकूल हवामानातही कार्यरत राहणारा आणि देशाच्या चतु:सीमांवर १२ महिने २४ तास बारकाईने नजर ठेवून घुसखोरी अथवा आक्रमणाची माहिती त्वरित संबंधितांना देऊ शकणारा ‘रडार इमेजिंग सॅटेलाइट-२’ अर्थात रीसॅट-२ हा उपग्रह आज दिमाखात अंतरीक्षात झेपावला आणि ‘इस्रो’च्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. पाठोपाठ काही मिनिटांतच चेन्नईच्या अण्णा विद्यापीठाने तयार केलेला ‘अणुसॅट’ हा अवघा ४० कि.ग्रॅ. वजनाचा उपग्रहही अवकाशात झेपावला. वर्षांच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या यशाने इस्रोचे प्रमुख जी. माधवन नायर एकदम सुखावले होते. विशेषत: रीसॅट-२ च्या प्रक्षेपणापूर्वी अचानक काही अडचणी उद्भवल्या होत्या.नायर यांनी ही सारी आव्हाने आणि त्यांच्यावर मात करून यशस्वीपणे झालेले उड्डाण यांची तुलना रोमांचक क्रिकेट सामन्याशी केली.

अंकुश राणे हत्येचा तपास सीआयडीकडे
कुटुंबियांचे मौन
सावंतवाडी, २० एप्रिल/वार्ताहर
उद्योगमंत्री नारायण राणे यांचा चुलत भाऊ अंकुश रामचंद्र राणे यांचा खून कोणी केला, हे अद्यापि उघड झालेले नसले तरी या खुनाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. तातडीने सीआयडी तपास हाती घेणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले. दरम्यान, नारायण राणे यांनी शिवसेनेनेच खून केल्याचा संशय व्यक्त करून शिवसेना खासदार संजय राऊत व जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा षडयंत्रात सहभाग असल्याचा आरोप केला. स्थानिकांची माहिती पोलिसांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोनियांनी केले शिवसेनेला लक्ष्य!
संतोष प्रधान
जालना, २० एप्रिल

प्रचारात सातत्याने भाजपला लक्ष्य केले असतानाच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रथमच नाव घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला. भाजपप्रमाणेच शिवसेना सातत्याने सरकारच्या विरोधात नकारात्मक भूमिका घेत असल्याचा आरोप करतानाच शिवाजी महाराजांच्या सर्वधर्मसमभाव व लोकानुयाच्या धोरणाऐवजी त्यांचे नाव घेत जाती व प्रातांच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचे काम शिवसेना करीत असल्याची टीका त्यांनी केली. जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. कल्याण काळे व औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवार उत्तमसिंह पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत सोनियांनी शिवसेना व भाजपला लक्ष्य केले होते. भर उन्हात दुपारी झालेल्या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणिय होती.

पुणे-सोलापूर महामार्गावर
ट्रक उलटून १९ ठार
पाटस, २० एप्रिल/वार्ताहर
पुणे-सोलापूर महामार्गावर भांडगाव (ता. दौंड) हद्दीत लोखंडी रॉड वाहतुकीच्या ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात १९ व्यक्ती जागीच ठार झाल्या, तर १५ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झालेल्या अपघातात गुलबर्गा, बार्शी, मुंबई येथील प्रवासी असून, मृत व जखमींमध्ये सर्वाधिक महिला व मुलींचा समावेश आहे. हा महामार्गावरील सर्वात मोठा अपघात ठरला आहे. महामार्गावरून सोलापूरकडे भरीव लोखंडी रॉडचा मालट्रक (एपी १३/डब्ल्यू ६५२७) भांडगावनजीक भरधाव वेगाने जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन पलटी झाले.

हायकोर्टाने सांगूनही पवनराजे खुनाचा तपास ‘सीबीआय’कडे नाही
मुंबई, २०एप्रिल/प्रतिनिधी

काँग्रेसचे माजी नेते व उस्मानाबाद जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पवनराजे निंबाळकर व त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांच्या खुनाचा तपास ‘सीबीआय’ने तात्काळ स्वत:कडे घ्यावा व तो त्वरेने पूर्ण करावा असा आदेश उच्च न्यायालयाने सहा महिन्यांपूर्वी देऊनही अद्याप हा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आलेला नाही, अशी तक्रार करणारा एक अर्ज पवनराजे यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी न्यायालयात केला आहे.

मुंबई दहशतवादी हल्ला
३१२ आरोपांचा मसुदा न्यायालयात सादर

मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब, त्याचे ठार झालेले नऊ साथीदार, फरारी असलेले पाकिस्तानी दहशतवादी आणि दोन भारतीय संशयित यांच्याविरुद्ध एकूण ३१२ आरोपांचा समावेश असलेला मसुदा आज अभियोग पक्षाने विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. तहलियानी यांच्यासमोर सादर केला. भारताच्या न्यायालयीन इतिहासात आतापर्यंत प्रस्तावित करण्यात आलेला हा सर्वाधिक आरोपांचा मसुदा आहे.

कसाब-पाकिस्तान के अलावा कुछ समझता नहीं
अभियोग पक्षाने आरोपांचा मसुदा न्यायालयात सादर केल्यानंतर न्या. तहलियानी यांनी कसाबला ‘तुझी तब्येत बरी नाही का’ अशी विचारणा केली. त्यावर त्याने मला काहीच ‘तकलीफ’ नाही असे न्यायालयाला सांगितले. त्याच्या या उत्तरानंतर अ‍ॅड. निकम यांनी लगेचच आपल्या निवेदनात त्याने काय केले आहे याचा पाढा वाचला गेल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागल्याचा टोला लगावला. मात्र कसाबने आपल्याला न्यायालयात जे काही सुरू आहे त्यातील केवळ कसाब आणि पाकिस्तान हे शब्दवगळता काहीच कळत नाही आणि ‘यही तकलीफ हैं’ असे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्याला तुझे वकील तुला याबाबत सर्व माहिती देतील असे सांगितले.

चेन्नई सुपर किंग्जने चाखली विजयाची चव
बंगलोर रॉयल चॅलेंजर्सवर ९२ धावांनी मात
पोर्ट एलिझाबेथ, २० एप्रिल / वृत्तसंस्था

पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभूत झालेल्या चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या पहिल्या विजयाची चव चाखली. विजयी सलामी देणाऱ्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला ९२ धावांनी नमविण्यात त्यांना यश आले. या विजयासह चेन्नईच्या संघाने आपले गुणांचे खाते उघडले आहे.मुथय्या मुरलीधरनच्या फसव्या फिरकीच्या जाळ्यात बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचे खेळाडू अलगद अडकले आणि चेन्नईने ठेवलेले १८० धावांचे आव्हान पेलताना त्यांची सर्व बाद ८७ अशी अत्यंत वाईट अवस्था झाली. तत्पूर्वी, मॅथ्यू हेडन (६५) आणि पार्थिव पटेल (३०) या सलामीवीरांनी केलेल्या १०६ धावांच्या भागीदारीमुळे चेन्नईच्या संघाने २० षटकांत १७९ धावा केल्या. फ्लिन्टॉफ (२२), रैना (२८), धोनी (१६) यांनीही उपयुक्त खेळी केली.बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने या धावसंख्येला उत्तर देण्यासाठी प्रवीण कुमारला सलामीला पाठविण्याची शक्कल लढविली, पण तो प्रयोग फसला. त्यानंतर त्यांची गाडी रुळावर आलीच नाही. कॅलिस (२४) व राहुल द्रविड (२०), उथप्पा (२०) यांचा अपवाद वगळता बंगलोरचा प्रतिकार फिका पडला. मुरलीधरनने ४ षटकांत केवळ ११ धावा देत पीटरसन (०), उथप्पा व बिष्णोई यांना बाद करून बंगलोर संघाचा कणा मोडला.

प्रभाकरनला शरण येण्यास २४ तासांची मुदत
कोलंबो, २० एप्रिल/पीटीआय

तामिळ बंडखोरांच्या प्रभावाखाली असणाऱ्या भागामध्ये अडकलेले ३५ हजारांहून अधिक तामिळ नागरिक आज इतर भागात स्थलांतरित झाले आहेत. यामुळे उत्तर भागात ‘लिट्टे’ बंडखोरांविरोंधातील श्रीलंका लष्कराच्या मोहिमांना वेग येणार असून, राष्ट्राध्यक्ष महिंदा राजेपक्षे यांनी ‘लिट्टे’चा प्रमुख प्रभाकरन आणि त्याच्या सहकाऱ्यांना शरण येण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. तामिळ बंडखोरांच्या अखत्यारीत असणाऱ्या २० किलो मीटर परिसरातून मोठय़ा प्रमाणावर तामिळ नागरिकांचे सामूहिकरीत्या स्थलांतर झाल्याचे उपग्रह छायाचित्रावरून स्पष्ट झाले आहे. हा तामिळ बंडखोरांचा पूर्णपणे पराभव झाला असून हा भागही लवकरच श्रीलंका लष्कर ताब्यात घेईल, असा विश्वास राजेपक्षे यांनी व्यक्त केला आहे. या घडामोडी घडत असतानाच नो फायर झोनमध्ये दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले असून त्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन स्फोट लिट्टेनेच घडवून आणले असल्याचा संशय आहे. लिट्टेचा संरक्षण गड असलेलाच भाग ताब्यात घेण्यात आल्यामुळे हा श्रीलंकेचा मोठा विजय असल्याचा दावा राजेपक्षे यांनी केला.

आजारपणाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या
मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी

आजारपणाला कंटाळून प्रवीण सोळंकी (४४) या डॉक्टरने आज ताडदेव येथील निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली. तो नायर डेन्टल महाविद्यालयात कार्यरत होता. वृद्ध आईवडिलांसोबत ताडदेव येथील शासकीय वसाहतीमध्ये राहत असलेला प्रवीण पाठीच्या आजाराने त्रस्त होता. त्यामुळे त्याचे सतत पत्नीशी भांडण व्हायचे. त्यातूनच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर खचलेल्या प्रवीणने ही आत्महत्या केली. पहाटे पावणेसहाच्या सुमारास आईवडिलांना त्याने गळफास लावून घेतल्याचे दिसले.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
प्रत्येक शुक्रवारी