Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

एकाची परिस्थिती चांगली; दुसऱ्याची वाईट नाही!
लक्ष्मण राऊत

जालना मतदारसंघातील निवडणूक अंतिम टप्प्यात खऱ्या अर्थाने उत्सुकता निर्माण करणारी ठरत आहे. विानसभेच्या जालना व औरंगाबाद जिल्ह्य़ांतील प्रत्येकी तीन मतदारसंघांचा समावेश या मतदारसंघात आहे. जालना जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या इच्छुकांना बाजूला ठेवून जेव्हा औरंगाबाद जिल्ह्य़ातील डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा प्रारंभीच पैठण, फुलंब्री आणि सिल्लोडमध्ये कल्याण काळे यांचे जबरदस्त वर्चस्व असल्याचे चित्र त्यांच्या समर्थकांनी निर्माण केले होते.

दोन्हीकडे चिंता मते खाल्ली जाण्याची

प्रमोद माने

औरंगाबाद मतदारसंघाची लढत बहुरंगी असली, तरी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातच खऱ्या अर्थाने लढत होणार आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे उत्तमसिंह पवार यांना चिंता आहे ती अन्य उमेदवार किती मते खातात याची. श्री. खैरे यांच्याविरोधात त्यांचे गुरू शांतिगिरी मौनगिरी महाराज मैदानात उतरले आहेत. दुसऱ्या बाजूने श्री. पवार यांची डोकेदुखी वाढविण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज प या दोन्ही पक्षाचे उमेदवार रिंगणात आहे. शांतिगिरी मौनगिरी महाराज हिंदू मतपेढी फोडण्यामध्ये यशस्वी होत असल्याची चिन्हे दिसत आहेत आणि नेमके हेच शिवसेनेला नको आहे.

पंतप्रधान आज लातूरमध्ये
लातूर, २० एप्रिल/वार्ताहर

लातूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जयवंत आवळे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग उद्या (मंगळवारी) शहरात येत आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी ११.४५ वाजता त्यांची सभा होईल. केंद्रीय अर्थमंत्री असताना लातूर अर्बन बँकेच्या उद्घाटनासाठी श्री. सिंग येथे आले होते. त्यानंतर ते प्रथमच येत आहेत.

सोनियांच्या सभेत जालन्याचा पाणीप्रश्न
जालना, २० एप्रिल/वार्ताहर

शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी थेट जायकवाडी जलाशयातून जलवाहिनी टाकण्याचा विषय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आजच्या सभेत उपस्थित झाला.
शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रारंभीच जालन्याच्या पिण्याच्या पाण्याची योजना लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा श्रीमती गांधी यांना उद्देशून व्यक्त केली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘औरंगाबादनंतर जालन्यात औद्योगिक विकास झाला असून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण शहरात पाण्याची कमतरता असून त्यासाठी राजेश टोपे यांनी प्रयत्न केले आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी ५० कोटी रुपये दिले आहेत. सांप्रदायिक आणि जातीयवादी शक्तींनी हा देश तोडण्याचे काम केले आहे, तर राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी देश जोडण्याचे काम केले आहे. ेत.’’

टाळ्या आणि माणसे
*प्रचारसभा म्हटलं की, हशा आणि टाळ्या आल्याच. बीड येथील प्रचारसभेत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उपस्थित नेत्यांचे नाव घेताच टाळ्यांचा आवाज होत असे. नेत्यांच्या नावाला मिळणाऱ्या कमी अधिक टाळ्या त्यांच्या समर्थकांची संख्या दाखवत असे. टाळ्यावरूनच कोणाचे किती समर्थक याचा अंदाज बांधला जाई. एका नेत्याच्या नावावर टाळीच पडली नाही. सभा संपल्यानंतर त्याला प्रचारप्रमुखाने बाजूला घेतले. तुम्ही गाडय़ा लावल्याच नाहीत; त्यामुळे माणसे आली नाहीत असे बजावत त्याने नेत्याचा चांगलाच समाचार घेतला. टाळ्या आणि माणसे यांचं गणित सभेत किती जवळचं असतं हे न सांगणे लागे.

मुंडे यांना विक्रमी मताधिक्य द्या - शत्रुघ्न सिन्हा
परळी वैजनाथ, २० एप्रिल/वार्ताहर

भूकबळी, दहशतवाद, बेरोजगारी यामुळे संपूर्ण देश त्रस्त झालेल्या परिस्थितीत लोकसभेची निवडणूक होत आहे. लोकप्रिय व शेतकऱ्यांचा तारणहार असणारा नेता आपल्याला लाभला असून या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने आमदार गोपीनाथ मुंडे यांना विजयी करा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेता व भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज केले.

मराठवाडय़ाचे बाबा - श्यामराव बोधनकर
आजूबाजूचे सगळेच लोक येणारे-जाणारे आजोबांना ‘बाबा’ म्हणायचे - त्यामुळे आम्ही नातवंडेही त्यांना नकळत ‘बाबा’च म्हणायचो. मग आम्हा भावंडांचे वडील प्रत्येकाचे बाबाच म्हणून मग आजोबांना ‘मोठेबाबा’ असं संबोधन आलं. कळतं तसं आजोबा फारसे कधी घरी नसायचेच. कायम कामाला जुंपलेले. रात्री घरी यायचे किंवा दुपारी घरी असायचे, तेव्हाही भेटायला येणारे त्यांच्या बैठकीत असायचेच.
आमचा जुना वाडा फारच प्रशस्त होता.

वीज म्हणजे काय?
कहाणी बिनतारी संदेशवहनाची - ७

वीज म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला पदार्थ, घटक/ मूलद्रव्य, अणू आणि रेणूंचे अंतरंग अशा चार पायऱ्यांचा प्रवास केला पाहिजे. पहिली पायरी म्हणजे जगातला प्रत्येक पदार्थ (उदाहरणार्थ पाणी) रासायनिक घटकांचा किंवा मूलद्रव्यांचा बनलेला असतो. हायड्रोजन, लोखंड, सोडियम वगैरे एकूण ९२ प्रकारची नैसर्गिक मूलद्रव्य अस्तित्वात आहेत.

भैरवनाथाच्या यात्रेमुळे उस्मानाबादमध्ये मतदान घटण्याची शक्यता
यात्रेला महत्व देणाऱ्या मतदारांसमोर उमेदवार हतबल
सतीश टोणगे
कळंब, २० एप्रिल

लहान-मोठय़ा यात्रा, देवस्थानच्या सहली शक्यतो उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्येच असतात आणि या सुट्टयांमध्ये या वेळी लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. मतदानाच्या दिवशीच सोनारी (ता. परंडा) येथे भैरवनाथाची यात्रा असून, या यात्रेला तीन ते चार लाख भाविक जमतात, यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते. या यात्रेमुळे मतदानावर परिणाम होणार असून, लोकसभेच्या ‘मतदानापेक्षा आम्हाला यात्रा महत्त्वाची आहे’ अशी चर्चा भाविक करत असून, याचा परिणाम उमेदवारावर होणार आहे.

प्रश्न असे : १) मी निवडणूक का लढवितो?
२) प्रचाराचे मुद्दे काय? ३) निवडून आल्यावर महाराष्ट्रातील कोणते महत्त्वाचे प्रश्न संसदेत मांडता येतील, असे वाटते? ४) तुमच्या पक्षाची कोणती धोरणे अधिक महत्त्वाची वाटतात? ५) निवडणूक लढविण्यामागे तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचे काय वाटते? अ) पैसा, आ) प्रतिष्ठा, इ) जनसेवेची संधी, ई) व्यावसायिक संबंधांची जोपासना, उ) प्रश्न मार्गी लावण्याचा चांगला उपाय.

गोपीनाथ मुंडे (भारतीय जनता पक्ष)
१) भारतीय जनता पक्षाचा मी राष्ट्रीय सरचिटणीस असल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात जाण्याचे मनापासून ठरविले आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात काम करण्यासाठी संसदेत जावे लागते म्हणून मी ही निवडणूक लढवीत आहे. २) कोसळलेली अर्थव्यवस्था, महागाई आणि केंद्र व राज्य सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यास पूर्णपणे अपयशी ठरले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात यश आले नाही. काँग्रेसप्रणीत केंद्र व राज्य सरकारचा निष्क्रिय कारभार आणि जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासाचा ‘व्हीजन-२०३०’ हा वचननामा.

रमेश आडसकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
१) माझे वडील माजी आमदार बाबुराव आडसकर यांनी ४० वर्षांपासून चालविलेला राजकीय व समाजकारणाचा वारसा पुढे चालविण्यासाठी मी निवडणूक लढवीत आहे. मागील १० वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांशी संपर्क ठेवल्याने पक्षाने उमेदवारी दिली.

मच्छिंद्र मस्के (बहुजन समाज पक्ष)
१) विद्यार्थी-दशेपासून राजकारणात व समाजकारणात असून युवक काँग्रेसचा अध्यक्ष आणि १९८५मध्ये बीड मतदारसंघातून निवडणूक लढविली. काँग्रेस पुरोगामी पक्ष राहिला नाही म्हणून बहुजन समाज पक्षातर्फे निवडणूक लढवीत आहे. २) भारतीय जनता पक्षाचे व काँग्रेसचे उमेदवार साखरसम्राट असल्याने त्यांनी सत्तेचे केंद्रीकरण आपल्या कुटुंबात केले आहे.

पैसा वाटून निवडणूक जिंकता येत नाही - गायकवाड
औसा, २० एप्रिल/वार्ताहर

ज्या उमेदवाराच्या पाठीमागे प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी आहे, सर्वसामान्यांपासून सुशिक्षितांपर्यंत सहानुभूती आहे, वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद आहे तोच उमेदवार लोकशाहीच्या या निवडणुकीत विजयी होणार आहे. नुसता पैसा वाटून निवडणूक जिंकता येत नाही, असा ठाम विश्वास शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी व्यक्त केला.

गठ्ठा घ्या; गठ्ठा द्या!
किशोर कुलकर्णी
तुळजापूर, २० एप्रिल

‘घ्या हव्या तेवढय़ा नोटा. मला हवा जास्तीत जास्त मताचा गठ्ठा,’ अशी तोंडी सूचना देत निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वर्तुळातील नेते मंडळींनी आपापल्या विश्वासातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना ‘मोहिमे’वर रवाना केल्याची चर्चा जोरावर आहे. अर्थकारणाच्या माध्यमाने मतसंकलनाची मोहीम मार्गी लावण्याकामी शेकडो खासगी वाहने खेडोपाडी रवाना केल्याने ऐन लग्नसराईच्या काळात गरजूंना खासगी वाहने मिळणेही कठीण झाल्याचे दिसून आले.

भूकंपग्रस्तांचा निवडणुकीवर बहिष्कार
उस्मानाबाद, २० एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघातील पळसप पारधी पेढी, किल्लारी परिसरातील भूकंपग्रस्त गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही भूकंपग्रस्त भागातील गावकऱ्यांनी नोकरभरतीत सामावून घेतले जावे व पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी बहिष्कार टाकणार असल्याचे लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.

बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर यांना.
*जायकवाडी धरणाचा उजवा कालवा गेवराई तालुक्यातून जातो. तो जागोजागी नादुरुस्त झाला असून त्याची वहनक्षमता कमी झाली आहे. याच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च होऊन काहीच फायदा झाला नाही. हा भ्रष्टाचार बाहेर काढणार का?

आमचा जाहीरनामा
सामाजिक बांधिलकी मानणारा असावा

मतदारांना मतदान करताना भविष्यातील भारत व त्यापुढील आव्हाने काय आहेत यांचा विचार करून त्यांचा अभ्यास असणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. उमेदवाराने सामाजिक कार्य काय केले याची पाश्र्वभूमी पाहूनच उमेदवारी देण्यात यावी. विचार करण्याची क्षमता,प्रबळ राष्ट्रभक्तीची भावना असणारा लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी मतदारांनी जात, धर्म, भाषा न पाहता कर्तृत्व पाहूनच संधी द्यावी.लोकप्रतिनिधी विकासाची बांधिलकी मानणारा हवा.
डॉ. के. व्ही. के. मूर्ती
प्राचार्य, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर.

आता भर मेजवान्यांवर
नेताजी मुळे
नळदुर्ग, २० एप्रिल

जाहीर सभा, पदयात्रा, मेळावे यानंतर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आता मतदारांसाठी रात्रीच्या मेजवानीवर भर दिला जाऊ लागला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे.
लोकसभनिवडणुकीचा प्रचार तुळजापूर तालुक्यात शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील व शिवसेनेचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्यामध्ये अत्यंत अटीतटीची लढत आहे. जिल्ह्य़ाच्या राजकारणात डॉ. पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करीत आहेत. कालपरवापर्यंत डॉक्टरांवर आरोप करणारे, कोपरखळ्या मारणारे चव्हाण आज डॉक्टरांच्या विजयासाठी जीवाचे रान करीत आहेत. मतदारांना वळविण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला जात आहे. तालुक्यातील गावा-गावासह वाडय़ा-वस्त्यांवर रात्रीच्या मेजवान्यांचे आयोजन करण्यात येत आहे. सामिष जेवणाबरोबर मद्यपानाचीही ‘सोय’ असल्याने पाटर्य़ा रंगू लागल्या आहेत.

‘जय महाराष्ट्र’ ऐवजी ‘जय काँग्रेस’
सोयगाव, २० एप्रिल/वार्ताहर

जालना मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब विखे-पाटील यांची सभा झाली. प्रथेप्रमाणे भाषण संपल्यानंतर काँग्रेसच्या एका मान्यवर नेत्याने ‘जय हिंद जय भारत’ अशी घोषणा दिली. आणि त्यानंतर ‘जय काँग्रेस’ असे म्हटले. विशेष म्हणजे सभेमध्ये भाषणानंतर ‘जय महाराष्ट्र’च्या ऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी ‘जय काँग्रेस’चा जयघोष सुरू केल्याचे जाणवले.

१६ वर्षांखालील औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघ घोषित
निवडलेल्या खेळांडूंना १० सराव सामने खेळायला मिळणार
औरंगाबाद, २० एप्रिल/खास प्रतिनिधी

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आमंत्रित १६ वर्षांखालील राज्यस्तरीय साखळी सामन्यांचे आयोजन एप्रिल व मे महिन्यात करण्यात आले आहे. या साखळी स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्य़ाचा ३० खेळाडूंचा संभाव्य संघ घोषित करण्यात आला आहे.या संघाची घोषणा औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव जे. यू. मिटकर यांनी केली. निवड समितीचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, इक्बाल सिद्दीकी, प्रमोद माने, महेंद्रसिंग कानसा आणि समन्वयक महेश वकील यांनी हा संघ निवडला आहे. या निवड चाचणीसाठी तीन दिवसांत १५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या चाचणीतून या ३० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.या खेळाडूंना मुंबई, पुणे, नागपूर आदी ठिकाणी १० सराव सामने खेळविण्यात येणार आहे. हा संघ शारीरिक आणि तांत्रिक बाजूने भक्कम आहे, असे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष शिरीष बोराळकर आणि माजी कसोटीपटू आणि प्रशिक्षक इक्बाल सिद्दीकी यांनी सांगितले.संभाव्य संघातील खेळाडू असे - राहुल शर्मा, विश्वजित उढाण, सारंग सराफ, मुस्तफा, वाजीद सिद्दीकी, सुमीत स्वामी, रुपेश सातदिवे, अजय काळे, शारीक शेख, स्वप्नील चव्हाण, निशांत फळे, प्रणव केला, गौरव वकील, सचिन लव्हेरा, संकेत महाजन, ज्ञानेश्वर कदम, सौरभ अडलग, रोहन बोरा, सलमान मलिक, महम्मद मुस्तफा, अनिकेत तिवारी, निकित चौधरी, ऋषिकेश जैस्वाल, सय्यद कादर, संकेत शर्मा, अजय आशन्ना, शुभम जाधव, अंकुश मंडळ, मूर्तझा खान आणि मुजन्नबा खान.

नवविवाहित तरुणाचा अपघाती मृत्यू
औरंगाबाद, २० एप्रिल/प्रतिनिधी

जेमतेम आठवडाभरापूर्वी विवाहबद्ध झालेल्या तरुणावर काळाने घाला केला. एका लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेला असता रिक्षाला एस.टी. बसची धडक लागली. त्यात त्या नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.भोकरदन तालुक्यातील जहागिरकोटा या गावात राहणाऱ्या दादाराव उत्तमराव शेळके (वय २४) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याचा विवाह आठवडाभरापूर्वीच झाला होता. शुक्रवारी रात्री तो देऊळगावताड या गावाहून मित्राचे लग्न आटोपून परतत होता. को एका रिक्षात प्रवास करीत होता. रात्री ८ च्या सुमारास केदाखेडा नदीजवळ रिक्षाचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि एस.टी. महामंडळाच्या बसचा मागील भाग त्या रिक्षाला घासून गेला. यात दादारावची मांडी पूर्णपणे घासून गेली. हा अपघात इतका भीषण होता की अति रक्तस्रावामुळे दादारावचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी त्याच्या घरी धडकताच मित्र व नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले. ज्याच्यासोबत आयुष्यभर राहायचे होते तो अवघ्या आठ दिवसांत सोडून गेल्याने दादारावच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे गावातही हळहळ व्यक्त होत आहे.

सरपंचाच्या पतीच्या डोळ्यांत तिखट टाकले
गेवराई, २० एप्रिल/वार्ताहर

ग्रामदेवतेच्या उत्साहानिमित्त गावात भरलेल्या यात्रेत कुस्त्याच्या फडात वर्गणी न दिल्याचे कारण पुढे करून सरपंचांच्या पतीच्या डोळ्यांत तिखट टाकून बेदम मारहाण करण्यात आली. तालुक्यातील धुमेगाव येथे शनिवारी हा प्रकार घडला. याबाबत चकलांबा पोलीस ठाण्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धुमेगाव येथे पीर बाबाच्या यात्रेनिमित्त कुस्त्याचे फड रंगत असतात. शनिवारी राजू गंगाराम घोडके यांच्या शेतात कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते. गावच्या सरपंचांचे पती अर्जुन विठ्ठल पाटोळे कुस्त्या लावू लागले. काही जणांनी ‘तू वर्गणी दिली नाहीस तू कुस्त्या का लावतोस?’, असे विचारत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून लाठय़ा, काठय़ांनी बेदम मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. गंभीर जखमी झालेल्या पाटोळे यांच्यावर बीडच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

धनगर समाजाने भाजपच्या मागे उभे राहावे-शेंडगे
गेवराई, २० एप्रिल/वार्ताहर

केंद्रातील व राज्यातील करंटय़ा आघाडी सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जाती-जमातीत (एस.टी.) प्रवर्गामध्ये समावेश करण्याबाबत असमर्थता दर्शविली. त्यामुळे धनगर समाजाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी यासाठी युतीचे सरकार येणे आवश्यक आहे. ते आणण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांच्याच पाठीशी धनगर समाजाने उभे राहावे, असे आवाहन आमदार प्रकाश शेंडगे यांनी केले.