Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

चतु:सीमांवर ‘स्कायवॉच’!
श्रीहरिकोटा, २० एप्रिल/पी.टी.आय.

प्रतिकूल हवामानातही कार्यरत राहणारा आणि देशाच्या चतु:सीमांवर १२ महिने २४ तास बारकाईने नजर ठेवून घुसखोरी अथवा आक्रमणाची माहिती त्वरित संबंधितांना देऊ शकणारा ‘रडार इमेजिंग सॅटेलाइट-२’ अर्थात रीसॅट-२ हा उपग्रह आज दिमाखात अंतरीक्षात झेपावला आणि ‘इस्रो’च्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. पाठोपाठ काही मिनिटांतच चेन्नईच्या अण्णा विद्यापीठाने तयार केलेला ‘अणुसॅट’ हा अवघा ४० कि.ग्रॅ. वजनाचा उपग्रहही अवकाशात झेपावला.
वर्षांच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या यशाने इस्रोचे प्रमुख जी. माधवन नायर एकदम सुखावले होते. विशेषत: रीसॅट-२ च्या प्रक्षेपणापूर्वी अचानक काही अडचणी उद्भवल्या होत्या. नायर यांनी ही सारी आव्हाने आणि त्यांच्यावर मात करून यशस्वीपणे झालेले उड्डाण यांची तुलना रोमांचक क्रिकेट सामन्याशी केली. क्रिकेटचीच शब्दावली वापरून ते म्हणाले की, या शेवटच्या क्षणांत आम्ही काही चौकार ठोकले तर काही गुगली चेंडूही टाकले. रीसॅट-२ हा उपग्रह अवकाशात घेऊन जाणारे ‘पीएसएलव्ही-सी१२’ हे रॉकेट अगदी ठरल्यानुसार आणि ठरल्या वेळेला अवकाशात झेपावले. या उड्डाणाचा दिवस आणि वेळ आम्ही खूप आधी घोषित केली होती आणि अगदी त्याबरहुकूम आम्ही हे प्रक्षेपण केले. हा एक विक्रमच आहे, असे माधवन नायर यांनी पत्रकारांना सांगितले.
उड्डाणापूर्वीचे ‘रोमांचक’क्षण
दोन्ही उपग्रहांचे उड्डाण यशस्वीरित्या आणि सुरळीत झाले असले तरी ‘काऊंट डाऊन’ची प्रक्रिया मात्र सुरळीत नव्हती. प्रत्यक्ष उड्डाणापूर्वी ४८ तास काऊंट डाऊन सुरू झाले. मात्र काल पीएसएलव्ही-१२ या प्रक्षेपण वाहनाचा

 

(अग्निबाण) अगदी वरचा एक कनेक्टर निखळला आणि खाली आला. मात्र खाली येताना तो आणखी सहा कनेक्टरवर आदळला आणि तेसुद्धा अग्निबाणापासून निखळले. उपग्रहांच्या नियोजित प्रक्षेपणाला हा मोठाच धक्का होता. परंतु इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सलग सहा तास काम करून हा बिघाड दुरुस्त केला आणि उपग्रहांचे प्रक्षेपण ठरल्या वेळीच पार पाडले.