Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अंकुश राणे हत्येचा तपास सीआयडीकडे
कुटुंबियांचे मौन
सावंतवाडी, २० एप्रिल/वार्ताहर

 

उद्योगमंत्री नारायण राणे यांचा चुलत भाऊ अंकुश रामचंद्र राणे यांचा खून कोणी केला, हे अद्यापि उघड झालेले नसले तरी या खुनाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. तातडीने सीआयडी तपास हाती घेणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले. दरम्यान, नारायण राणे यांनी शिवसेनेनेच खून केल्याचा संशय व्यक्त करून शिवसेना खासदार संजय राऊत व जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा षडयंत्रात सहभाग असल्याचा आरोप केला. स्थानिकांची माहिती पोलिसांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वरवडे येथून शुक्रवारी संध्याकाळी बेपत्ता झालेल्या अंकुश राणे यांचा मृतदेह सुमारे २० कि. मी. अंतरावर कासार्डे येथे रविवारी रात्री सापडला. त्यानंतर राणे यांचा खून झाल्याचे उघड झाले. अंकुश यांच्या देहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अंकुश राणे यांच्या शवविच्छेदनाबरोबरच डी. एन. ए. तपासणी करण्यात येणार आहे. अंकुश राणे यांचा चेहरा विद्रूप झाला होता. त्याही स्थितीत विजय राणे यांनी त्या मृतदेहाची ओळख पटविली असल्याने आज दुपारी वरवडे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. नारायण राणे हेही याप्रसंगी उपस्थित होते. अंकुश राणे यांचे अपहरण करून निर्दयी खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असतानाच कुटुंबियांनी मात्र कोणावरही संशय व्यक्त करण्यास नकार दिला.
अंकुश राणे यांच्या खुनामुळे साऱ्या जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिवसभर तपास केला, पण खून कोणी कशासाठी केला, तसेच अपहरण करण्यामागचा हेतू, याबाबतची माहिती पोलिसांकडे नव्हती.

शिवसेनेचे षड्यंत्र -राणे
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेने षड्यंत्र रचल्याचा आरोप पुन्हा एकदा केला. खासदार संजय राऊत यांचा ब्रेन आणि जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा संबंध या प्रकरणात असल्याचा आरोप त्यांनी केला.
नारायण राणे म्हणाले, अंकुश राणे माझ्या वरवदेच्या मूळ घराशेजारीच राहतात. ते शेतकरी होते. त्यांचा शेती व घर याशिवाय राजकारणाशी काहीच संबंध नव्हता. त्यांचे अपहरण करून खून केला, हा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी विरोधकांच्या षड्यंत्राचा भाग आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय होणार असल्याने विरोधकांनी हा सारा प्रकार केला. सिंधुदुर्गात त्यांची एकही सभा झाली नव्हती. त्यामुळे मला गुंतवून ठेवण्यासाठी शिवसेनेने षडयंत्र रचले होते. माझा संजय राऊत व वैभव नाईक यांच्यावर संशय असून, राजकीय हेतूने ही केलेली हत्या आहे, असा त्यांनी आरोप केला. त्यांचा हा हेतू साध्य होऊ देणार नाही. मी महाराष्ट्र व मतदारसंघातील सर्व प्रचार सभांना उपस्थित राहणार आहे, असे राणे म्हणाले.
शिवसेनेचा कोकणचा गड माझ्यामुळे अभेद्य होता, आता शिवसेनेत दम नाही. मी ३९ वर्षे सेनेत होतो. त्यामुळे त्याची पाळेमुळे मला माहिती आहेत, असे राणे म्हणाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकतर्फी विजय होणार म्हणून शिवसेनेने हे कृत्य केले आहे. या साऱ्या प्रकाराबाबत मी २३ एप्रिलनंतर बोलेन, असे ते म्हणाले.