Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सोनियांनी केले शिवसेनेला लक्ष्य!
संतोष प्रधान
जालना, २० एप्रिल

 

प्रचारात सातत्याने भाजपला लक्ष्य केले असतानाच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रथमच नाव घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला. भाजपप्रमाणेच शिवसेना सातत्याने सरकारच्या विरोधात नकारात्मक भूमिका घेत असल्याचा आरोप करतानाच शिवाजी महाराजांच्या सर्वधर्मसमभाव व लोकानुयाच्या धोरणाऐवजी त्यांचे नाव घेत जाती व प्रातांच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचे काम शिवसेना करीत असल्याची टीका त्यांनी केली.
जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. कल्याण काळे व औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवार उत्तमसिंह पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत सोनियांनी शिवसेना व भाजपला लक्ष्य केले होते. भर उन्हात दुपारी झालेल्या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणिय होती.
देश स्वातंत्र झाल्यापासून सुरुवातीला रा. स्व. संघ व आता भाजपने कायम नकारात्मक भूमिका घेतली. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र लढय़ाच्या विरोधात कोणी नकारात्मक भूमिका घेतली हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. देशाला स्वातंत्र मिळाल्यावर पंडित नेहरू यांच्या औद्योगिक धोरणास संघाने कायम विरोध केला. इंदिरा गांधी यांच्या बँका व एल.आय.सी.च्या राष्ट्रीयीकरणास असाच विरोध झाला. राजीव गांधी यांनी पंचायत राज संस्थेत महिलांकरिता ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तेव्हाही भाजपने विरोध केला होता. १८ वर्षांंच्या युवकांना मतदानाचा हक्क देण्याचा निर्णय असो वा संगणकीय क्रांती, भाजपने कोठे विरोध केला नाही असे झाले नाही. आता पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या धोरणास भाजपप्रमाणेच शिवसेना विरोध करीत आहे. चांगल्याला विरोध करण्याची शिवसेना व भाजपला सवयच जडल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली. जाती व धर्माच्या नावाखाली समाजात फूट पाडणाऱ्या शिवसेना व भाजपला थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजप सरकारने कारगीलच्या वेळी वीरमरण प्राप्त झालेल्या सैनिकांच्या शवपेटय़ांमध्येही घपला केला. दहशतवादाच्या विरोधात काँग्रसच्या नेतृत्वाखालील सरकार लढा देत आहे. भाजप सरकारच्या काळात दहशतवाद्यांना सुखरूपपणे कंदहारला सोडण्यात आले होते, अशी टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या ६५ हजार कोटींच्या कर्जमाफीचे श्रेय घेतानाच केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामांची जंत्री सादर केली.
गेल्या निवडणुकीत मराठवाडय़ात काँग्रेसची पाटी कोरी होती. यंदा मात्र चांगले यश मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही, असे मत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.