Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पुणे-सोलापूर महामार्गावर
ट्रक उलटून १९ ठार
पाटस, २० एप्रिल/वार्ताहर

 

पुणे-सोलापूर महामार्गावर भांडगाव (ता. दौंड) हद्दीत लोखंडी रॉड वाहतुकीच्या ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात १९ व्यक्ती जागीच ठार झाल्या, तर १५ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झालेल्या अपघातात गुलबर्गा, बार्शी, मुंबई येथील प्रवासी असून, मृत व जखमींमध्ये सर्वाधिक महिला व मुलींचा समावेश आहे. हा महामार्गावरील सर्वात मोठा अपघात ठरला आहे.
महामार्गावरून सोलापूरकडे भरीव लोखंडी रॉडचा मालट्रक (एपी १३/डब्ल्यू ६५२७) भांडगावनजीक भरधाव वेगाने जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन पलटी झाले. मालट्रकच्या पाठीमागे लोखंडी रॉडवर, टपावर बसलेले प्रवासी लोखंडी रॉड अंगावर पडल्याने जागीच ठार झाले. मालट्रक पलटी होऊन शेतातील एका खड्डय़ात पडल्याने काही प्रवासी बाहेर फेकले गेले. अपघातानंतर चालक पळून गेला. मुंबईतून सोलापूरकडे हा मालट्रक लोखंडी रॉड घेऊन जात होता. दरम्यान, मालट्रकच्या टपावर व लोखंडी रॉडवरून अंदाजे ३५ ते ४० प्रवासी प्रवास करत होते. जखमींना यवतच्या खासगी दवाखान्यात व आनंद हॉस्पिटल, तसेच नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मृतांमध्ये कर्नार वासुसाब फत्तूरसाब मुल्लावाले (वय ५०), रा. सूटनूर, ता. जि. गुलबर्गा, इमामसाब अल्लाउद्दिन शेख (वय ६०), कु. फातिमा इब्राहिम शेख (वय १२), अब्बासअल्ली इब्राहिम शेख (वय ९), राजा इब्राहिम शेख (वय ४), शबाना इमामसाब शेख (वय ११), जनतबी इमामसाब शेख (वय ५०), इब्राहिम बाबनसाब शेख (वय ४५), सर्व रा. आळंद, जि. गुलबर्गा (कर्नाटक), श्रावण मलकाप्पा कांबळे (वय ३६) रा. बेलकुंडी, ता. आळंद, गुलबर्गा, त्याचप्रमाणे रेशमा आदम पठाण (वय २१), सोहेल मुबारक शेख (वय दीड वर्ष), सीमरान आदम पठाण (वय १) सर्व रा. बार्शी (चांभारवाडा, सोलापूर रोड) जि. सोलापूर, विशाल शिवाजी गवळी (वय १५), सौ. महानंदा अशोक शिंदे (वय ४०), सौ. सविता शिवाजी गवळी (वय ३५), सर्व रा. कुर्ला वेस्ट, मुंबई, तसेच चन्नू इमाम शेख (वय ३२), रा. बिलगुंडी, ता. आळंद, गुलबर्गा यांचा समावेश असून, तीन मृतांची नावे निष्पन्न झाली नाहीत.