Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

हायकोर्टाने सांगूनही पवनराजे खुनाचा तपास ‘सीबीआय’कडे नाही
मुंबई, २०एप्रिल/प्रतिनिधी

 

काँग्रेसचे माजी नेते व उस्मानाबाद जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पवनराजे निंबाळकर व त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांच्या खुनाचा तपास ‘सीबीआय’ने तात्काळ स्वत:कडे घ्यावा व तो त्वरेने पूर्ण करावा असा आदेश उच्च न्यायालयाने सहा महिन्यांपूर्वी देऊनही अद्याप हा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आलेला नाही, अशी तक्रार करणारा एक अर्ज पवनराजे यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी न्यायालयात केला आहे.
हा अर्ज आज न्या. श्रीमती रंजना देसाई व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे आला तेव्हा ‘सीबीआय’तर्फे कोणीही वकील हजर नव्हता. त्यामुळे ‘सीबीआय’ला नोटीस काढण्याचे निर्देश देऊन सुनावणी तहकूब केली गेली. अर्जदारांसाठी अ‍ॅड. नितीन जामदार काम पाहात आहेत.
या खुनांचा तपास आधी नवी मुंबईतील कळंबोली पोलीस करीत होते. त्यांनी तपासात गोळा केलेले सर्व रेकॉर्ड कोर्टात जमा केले होते. ते नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला ‘सीलबंद’ स्थितीत परत केले गेले. त्यांनी ते आहे त्याच स्थितीत ‘सीबीआय’कडे सुपूर्द करावे आणि ‘सीबीआय’ने ताबडतोब तपासाला सुरुवात करून तो त्वरेने पूर्ण करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने गेल्या २३ ऑक्टोबर रोजी दिला होता. हा आदेशही पवनराजेंच्या पत्नी आनंदीबाई यांच्याच याचिकेवर दिला गेला होता.
पवनराजे मोटारीने मुंबईहून पुण्यास जात असता कळंबोली स्टील मार्केटजवळ ३ जून २००६ रोजी त्यांचा व त्यांच्या ड्रायव्हरचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. पवनराजे आपल्या राजकीय करिअरला धोका आहेत, याची खात्री झाल्याने माजी मंत्री पद्मसिंह पाटील, अजित बाबू पाटील व अमोल पाटोदकर यांनी कट करून हा खून घडवून आणला, असा पवनराजेंच्या पत्नीने आरोप केला होता. या गुन्ह्यात सत्तादारी वजनदार व्यक्ती अडकलेल्या असल्याने पोलीस मुद्दाम ढिसाळ तपास करीत आहेत, असाही त्यांचा आरोप होता.
या पाश्र्वभूमीवर खंडपीठाने ‘सीबीआय’कडे तपास सोपविताना या गोष्टीची नोंद घेतली होती की, तपासी अधिकाऱ्यांनी तानाजी पाटील या साक्षीदाराची ‘नोर्को’ चाचणी करण्यासाठी एक वर्षांचा विलंब लावला. या चाचणीत तानाजीने पवनराजेंचे नाव घेऊनही त्यादृष्टीने तपास केला गेला नाही. एवढेच नव्हे तर छोटा राजन टोळीचा अट्टल गुंड विक्की मल्होत्रा याला सुपारी देऊन हा खून केला गेला, असे ‘नार्को’ चाचणीतून बाहेर येऊनही त्यावेळी ठाणे कारागृहात असलेला विक्की हा गुन्हा करूच शकत नाही, असेच गृहित धरून पोलिसांनी तपासाची दिशा ठेवली. प्रत्यक्षात रेकॉर्ड पाहिले असता न्यायालयास असे दिसले होते की, खुनाच्या आधी तीन दिवस विक्कीला आणखी एका केससाठी ठाणे कारागृहातून मुंबईला आणले गेले होते व खून झाला त्याच सुमारास पोलीस त्याला नेहमीच्या प्रथेप्रमाणे पोलीस व्हॅनने नव्हे तर जिप्सीमधून त्याच रस्त्याने ठाण्याला परत घेऊन गेले होते. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेला तपास सदोष आहे. तो ‘डेड एन्ड’ला पोहोचला आहे.
हे सर्व राजकीय दबावामुळे मुद्दाम केला जात आहे, असा अर्जदारांचा समज आहे. या प्रकरणाने खूप वादंग माजले होते. अशा परिस्थितीत तपासही नीट व्हावा व शंकेसही जागा राहू नये, यादृष्टीने आपण तपास ‘सीबीआय’कडे सोपवित आहोत, असे खंडपीठाने त्या वेळी दिलेल्या निकालपत्रात स्पष्ट केले होते.