Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मुंबई दहशतवादी हल्ला
३१२ आरोपांचा मसुदा न्यायालयात सादर
मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी

 

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब, त्याचे ठार झालेले नऊ साथीदार, फरारी असलेले पाकिस्तानी दहशतवादी आणि दोन भारतीय संशयित यांच्याविरुद्ध एकूण ३१२ आरोपांचा समावेश असलेला मसुदा आज अभियोग पक्षाने विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. तहलियानी यांच्यासमोर सादर केला. भारताच्या न्यायालयीन इतिहासात आतापर्यंत प्रस्तावित करण्यात आलेला हा सर्वाधिक आरोपांचा मसुदा आहे. या मसुद्यात लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावरून कट रचून भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, त्यासाठी शस्त्रास्त्र आणि स्फोटकांसह समुद्रमार्गे बेकायदेशीरपणे भारतात घुसणे, तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह १६६ जणांचा खून करणे, २३४ जणांच्या हत्येचा प्रयत्न करणे, स्फोट घडवून किंवा आग लावून सरकारी व खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे आदी महत्त्वाच्या आरोपांचा समावेश आहे.
खटला सुरू होण्यापूर्वीचे निवेदन केल्यानंतर अभियोग पक्षाच्या वतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी ३१२ आरोपांचा हा मसुदा न्यायालयासमोर सादर केला. या मसुद्यानुसार, कसाब आणि अन्य दहशतवाद्यांनी भारताच्या विविध आणि महत्त्वाच्या शहरात हिंसाचार करून व भारतात पर्यटक म्हणून आलेल्या परदेशी नागरिकांना ठार करून भारताला आर्थिकदृष्टय़ा पोकळ करण्यासाठी, जम्मू आणि काश्मीरचा ताबा मिळविण्यासाठी कटकारस्थान रचून भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप प्रस्तावित करण्यात आला आहे.
कटाची अंमलबजावणी केली. या हल्ल्याद्वारे त्यांनी भारताच्या एकात्मतेला आणि धार्मिक बांधिलकीला धक्का पोहोचविला आहे. भारताविरुद्धच्या युद्धासाठी फरारी आरोपींनी हल्लेखोरांना पाकिस्तानात शस्त्रास्त्र हाताळणी आणि स्फोटकांविषयीचे प्रशिक्षण दिले. या मुख्य आरोपांशिवाय पासपोर्ट अ‍ॅक्ट, रेल्वे अ‍ॅक्ट, शस्त्रास्त्र कायदा, बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा, स्फोटके कायदा या कायद्यांतर्गतही काही आरोप अभियोग पक्षाने प्रस्तावित केले आहेत. मसुद्यातील ३१२पैकी काही आरोप हे पर्यायी आरोप म्हणून प्रस्तावित करण्यात आले असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी या वेळी न्यायालयाला सांगितले.