Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
प्रादेशिक

‘मेटे यांना पुन्हा उपाध्यक्ष केल्याने राष्ट्रवादीचा जातीयवादी चेहरा उघड’
मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आलेले ‘शिवसंग्राम’ संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचे निलंबन मागे घेण्यात आले असून उपाध्यक्षपदी त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा समाजाचा समावेश ओबीसींत करावा, या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारलेल्या मेटे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यामागे मराठा मतांची बेगमी हा राष्ट्रवादीचा उद्देश असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

महाबळेश्वर साहित्य संमेलन अवघ्या ४० लाखांत!
मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी

महाबळेश्वर येथे गेल्या महिन्यात ८२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा ‘नॅनो’ प्रयोग पार पडला. संमेलन आयोजनातील या नॅनो प्रयोगात आता ‘नॅनो’ खर्चाचीही नव्याने भर पडली आहे. गेल्या काही वर्षांतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात खूपच कमी खर्चात पार पडलेले साहित्य संमेलन म्हणून महाबळेश्वरच्या संमेलनाची नोंद होणार आहे.

‘आधी शस्त्रे जमा करा व मग ‘स्क्रीनिंग कमिटी’कडे दाद मागा’
निवडणूक आयोगाहून राज्याची वेगळी भूमिका
मुंबई, २० एप्रिल/प्रतिनिधी
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर परवानाधारक शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींनी आधी आपापली शस्त्रे पोलिसांकडे जमा करावीत. त्यानंतर त्यांच्या प्रकरणांची ‘स्क्रीिनग कमिटी’कडून छाननी केली जाईल व समिती ज्यांची शस्त्रे परत करण्यास हरकत नाही, असा अभिप्राय देईल त्यांचीच शस्त्रे परत केली जातील, अशी भूमिका राज्य सरकारतर्फे आज मुंबई उच्च न्यायालयात घेण्यात आली.

राणे यांची पाश्र्वभूमी वादग्रस्त - सुभाष देसाई
मुंबई, २० एप्रिल/प्रतिनिधी

श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर हे नारायण राणे यांच्याविरुद्ध संघर्ष करताना मरण पावले. राणे यांची पाश्र्वभूमी वादग्रस्त असून अंकुश राणे यांचा मृतदेह सापडण्याची घटना राजकीय लाभ घेण्याकरिता घडविण्यात आली आहे, असा आरोप शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई यांनी केला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टोल कडाडला
वाहतूकदारांकडून आंदोलनाचा इशारा
मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी
केंद्रीय नौकानयन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आकारण्यात येणाऱ्या टोलच्या रकमेत मोठी वाढ केल्यामुळे वाहतुकदारांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्याविरोधात बुधवार, २२ एप्रिल रोजी उग्र आंदोलन करण्याचा इशारा वाहतुकदारांनी दिला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा साक्षीदार पाच महिन्यांपासून बेपत्ता
मुंबई, २० एप्रिल/प्रतिनिधी

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील इंदूर येथे राहणारे एक साक्षीदार दिलीप पाटीदार हे गेले पाच महिने बेपत्ता असून ते आमच्या ताब्यात नाहीत, असा पवित्रा मध्य प्रदेश पोलीस व महाराष्ट्रातील ‘एटीएस’ने घेतला आहे. पाटीदार इलेक्ट्रीशियन आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना हजर करावे अशी हेबियस कॉर्पस याचिका त्यांचे बंधू रामस्वरूप पाटीदार यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठापुढे केली आहे.

देशात उभारणार उच्चस्तरीय उपकरण चाचणी सुविधा
मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी

एनटीपीसी, एएचपीसी, पॉवर ग्रीड आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन या कंपन्या २५० कोटी रुपये खर्चून देशात उच्चस्तरीय उपकरण चाचणी सुविधा उभारणार आहेत. सदर चार कंपन्यांनी त्याबाबत ११ एप्रिल रोजी करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून प्रत्येक कंपनीचा प्रत्येकी २५ टक्के इतका वाटा आहे.

कॉ. अहिल्या रांगणेकर अनंतात विलीन
मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी

ज्येष्ठ मार्क्सवादी नेत्या कॉ. अहिल्या रांगणेकर यांच्या मृतदेहावर आज शिवाजी पार्क स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राजकीय, कामगार क्षेत्रातील कार्यकर्ते, नेते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी कॉ. अहिल्या रांगणेकर को लाल सलाम अशा घोषणा देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. रांगणेकर यांचा मृतदेह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वरळी येथील ‘जनशक्ती’ या पक्ष कार्यालयात ठेवण्यात आला होता. तिथे अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. संध्याकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली. लाल ध्वजात त्यांचा मृतदेह गुंडाळण्यात आला होता. ट्रकसमोर पक्षाचे शकडो कार्यकर्ते हातात लाल ध्वज घेऊन रांगेत चालत होते. अहिल्या रांगणेकर अमर रहे, मार्क्सवाद झिंदाबाद, कम्युनिस्ट पक्ष झिंदाबाद अशा घोषणा देत अंत्ययात्रा शिवाजी पार्क स्मशानभूमित पोहोचली. कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्यावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पक्षाच्या नेत्या खा. वृंदा करात, सुभाषिनी अली, सिटूचे नेते एम. के. पंदे यांनी पक्षाच्या वतीने रांगणेकर यांना अखेरचा ‘लाल सलाम’ केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे, आ. कपिल पाटील, जयंत धर्माधिकारी, कॉ. उदय भट, कॉ. वासुदेवन यांच्यासह हजारो कम्युनिस्ट कार्यकर्ते, नेते उपस्थित होते.

एम.फार्मसीची सीईटी २८ जून रोजी
मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी

प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर पदवी (एम.फार्मसी) अभ्यासक्रमासाठी येत्या २८ जून रोजी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. सीईटीबाबतची सविस्तर अधिसूचना लवकरच जाहीर करण्यात येईल, असे संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. सु. का. महाजन यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.