Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘लोकसत्ता कॅम्पेन’ गुरुवारपासून कॉलेजमध्ये
अतुल कुलकर्णी यांचा तरुणांशी थेट संवाद
प्रतिनिधी

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लोकसत्ता रविवार वृत्तान्तमध्ये ‘पहिले ते राजकारण' हा लेख लिहून लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी तरूणांना अधिक डोळसपणे मतदान करण्याचे आवाहन करणारे अभिनेते अतुल कुलकर्णी आता मुंबई परिसरातील निरनिराळ्या महाविद्यालयांमध्ये तरूण-तरूणींशी थेट संवाद साधणार आहेत. या ‘लोकसत्ता कॅम्पेन’निमित्त उन्हाळ्याच्या

 

सुटीतही कॉलेज कॅम्पस बहरणार आहेत.
एरव्ही राजकारणाबाबत उदासीन असणाऱ्या तरूणांनी अतुल कुलकर्णीच्या ‘पहिले ते राजकारण' या लेखास भरभरुन प्रतिसाद दिला. त्यातील निवडक प्रतिक्रिया ‘वृत्तान्त’मधून प्रसिद्धही झाल्या. काही पत्रांना अतुल कुलकर्णी यांनी गेल्या रविवारी ‘वृत्तान्त’मध्ये लेख लिहून प्रातिनिधीक उत्तरही दिले. आता ‘लोकसत्ता कॅम्पेन’च्या निमित्ताने अतुल कुलकर्णी थेट कॉलेजमध्ये तरूणांशी संवाद साधणार आहेत. त्याची सुरूवात गुरूवारी, २३ एप्रिल रोजी होत असून विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयात सकाळी ११ वाजता या कॅम्पेनचे उद्घाटन होत असून ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये अतुल कुलकर्णी तरुणांशी संवाद साधतील. शनिवारी, २५ एप्रिलला सकाळी ११ वाजता डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालयात अतुल कुलकर्णी ‘पहिले ते राजकारण' याविषयी तेथील तरूणांशी चर्चा करणार आहेत. याच दिवशी दुपारी ३ वाजता ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या उपस्थितीत या कॅम्पेनची सांगता होईल. तरूणांनी जास्तीत जास्त संख्येने या संवादयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकसत्ता’च्या ‘कॅम्पस मूड टीम’ने केले आहे.