Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पदयात्रा, चौकसभांसह प्रत्यक्ष भेटीवर अधिक भर
थेट मतदारसंघातून (उत्तर मुंबई)
बंधुराज लोणे

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम नाईक पुन्हा मैदानात आहेत. या

 

मतदारसंघातून त्यांनी अनेकदा निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मतदारसंघ नवा नाही. गेल्या पाच वर्षांंत खासदार नसतानाही ते कार्यरत होते आणि त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. त्यामुळे त्यांनी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून खरेतर प्रचाराला सुरूवात केली होती. त्यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. प्रचारयात्रा आणि लोकांच्या प्रत्यक्ष भेटीवर नाईक यांचा भर आहे. पहिल्या फेरीत त्यांनी रेल्वे स्थानके आणि चौक सभांवर भर दिला आहे.
भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्यांची आतापर्यंत इथे सभा झालेली नाही. मात्र भाजपचे कार्यकर्ते आणि राम नाईक यांची शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा त्यामुळे प्रचारात ते आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. सकाळी राम नाईक घराबाहेर पडतात. साधारण नऊ वाजता रथावर चढतात. दुपारी १२ वाजेपर्यंत प्रचारयात्रा सुरू असते. काही प्रमुख पदाधिकारी आणि स्वत: नाईक रथावर असतात. जनतेला अभिवादन करीत रथ वस्त्यांवस्त्यांत फिरत असतो. दुसऱ्या रथावर इतर कोणी प्रमुख पदाधिकारी प्रचार करीत असतात. स्थानिक विकासाचे प्रश्न आणि दहशतवाद आदी प्रश्नांवर राम नाईक भाषण देत असतात. वाटेत त्यांना अनेकजण ओळखीचे भेटत असतात. ‘रामभाऊ’ मग त्यांच्याशी दोन शब्द बोलतात आणि रथ पुढे सरकतो. संध्याकाळी पुन्हा यात्रा सुरू होते. रात्री प्रचार संपल्यावर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात. दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम ठरविण्यात येतो.
याच मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरीष पारकर यांनीही रंगत आणली आहे. आतापर्यंत ७० टक्के मतदारसंघ पिंजून काढल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करतात. गेल्या रविवारी इथे राज ठाकरे यांची सभा झाली. त्यानंतर पारकर यांच्या प्रचाराचा जोर वाढल्याचाही दावा केला जातो. राज ठाकरे यांच्या सभेमुळे मनसेचे कार्यकर्ते मोठय़ा उत्साहाने कामाला लागले. ‘भूमिपूत्रांचे हक्क’ हा त्यांच्या भाषणाचा मुख्य विषय. अनेकजण त्यांच्या भाषणाला दाद देताना दिसतात. आधी पदयात्रा आणि नंतर गाठीभेटी असा त्यांचा दिनक्रम आहे. केवळ मुख्य रस्त्यावरूनच न फिरता गल्लीबोळात जात आहेत. कोळी समाजाचे प्रश्न आतापर्यंत कोणीच सोडविले नाहीत, असा आरोप करून आपण या समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन ते देतात. प्रचार यात्रा सुरू असताना पारकर अचानक गुरुद्वारात पोहोचतात. शीख समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येते. मध्येच दक्षिण भारतीयांच्या मंदिरातही पारकर हजेरी लावतात. प्रचार यात्रा सुरू असतानाच दुपारी आणि संध्याकाळी कोणाच्या भेटी घ्यायच्या आहेत याची यादी तयार असते. उत्तर भारतीयांच्या विरोधात थेट आणि आक्रमकपणे बोलत असतानाच इतर समाज घटकांना जवळ करण्याची संधी पारकर शोधत असतात. त्यासाठी त्यांची प्रार्थनास्थळे तसेच वस्त्यांना ते भेटी देत आहेत.
काँग्रेसचे संजय निरुपम यांनी शुक्रवारी अवेरा हॉटेलपासून प्रचाराला सुरूवात केली. योगीनगर, जांभळी गल्ली, डॉन बॉस्को हायस्कुल, जयराज नगर, अशोक रोड, गोराई क्रमांक १ ,२ सत्यसाईबाबा नगर या विभागांत प्रचार फेरी काढली होती. काँग्रेसच्या मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन निरुपम प्रचाराला निघतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, काँग्रेसचे नगरसेवक यांच्या विभागात जाताना निरुपम यांनी त्यांना पुढे केलेले असते. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे नाव आपल्या भाषणात ते जाणीवपूर्वक घेत असतात. जातीयवादी शक्तींना पराभूत करण्याचे आवाहन ते करीत असतात. आपण पूर्वी याच मतदारसंघात राहत होतो, असे ते सांगत असतात.
७० टक्के प्रचार पूर्ण केल्याचा दावा प्रमुख उमेदवारांनी केला असला तरी अनेक परिसरात हे उमेदवार पोहोचले नसल्याचे सांगितले जाते.
या तिन्ही उमेदवारांनी घरोघरी प्रत्रके वाटण्यावर भर दिला आहे. या मतदारसंघात मुख्य प्रश्न पाण्याचा आहे. हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन प्रत्येक उमेदवार देत असला तरी कुणी त्याकडे गांभीर्याने पाहणार नाही, असेच मतदारांना वाटत आहे.