Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आयडिया उत्क्रांतीची
आयडियाची कल्पना आहे उत्क्रांतीची.. सर्व सजीव नैसर्गिक निवडीनुसार उत्क्रांत झाले असल्याचा उत्क्रांतिवादाचा क्रांतिकारी सिद्धांत.. अशी उत्क्रांतीची संकल्पना.. आज आपल्याला अगदी साधी, सरळ वाटणारी.. पण विश्वास ठेवा १५० वर्षांपूर्वी मात्र डार्विनच्या उत्क्रांतिवादामुळे

 

जगभर एकच वैचारिक हलकल्लोळ उडाला..
‘ओरिजिन ऑफ स्पिसिज्’ या आपल्या पुस्तकात डार्विनने उत्क्रांतीवादाचा क्रांतिकारी विचार सादर केलाय..
उत्क्रांतीवाद ही एक क्रांतिकारी संकल्पना आहे.. पृथ्वीवरील जीवशास्त्रीय उत्क्रांती नैसर्गिक निवडीच्या सूत्रातून झाली असल्याचा महान सिद्धांत डार्विनने मांडला..
सिद्धांत होता उत्क्रांती हे एक सत्य आहे.. जगातील प्रजाती दैवी निर्मितीतून एकाएकी निर्माण झाल्या नाहीत तर त्याची निर्मिती आधी अस्तित्वात असलेल्या प्रजातीपासून होते.. उत्क्रांतीमुळे.. प्रजातीची निवड होण्यासाठी डार्विनच्या मते नैसर्गिक निवड कारणीभूत असते.. या प्रक्रियेमुळे विशिष्ट प्राणिमात्रातील त्या प्रजातीच्या अस्तित्वासाठी असलेला गुण टिकविला जातो.. प्रजातीतील हे विशेष गुण अस्तित्वात असलेल्या पिढय़ांकडून पुढच्या पिढय़ांत संक्रमित केले जातात.. हा विशेष गुण त्या प्रजातीतील प्राण्यात मोठय़ा प्रमाणावर संक्रमित होतो व मूळ प्राण्यापेक्षा भिन्न अशा या प्राण्यांची एक नवीन जात बनते.. या नवीन जातीतून अनेक प्रजाती उदयास येतात व होतो ‘जाति उद्गम’.. असा सिद्धांत.. उत्क्रांतीचा.. अन् या सिद्धांताचा जनक आहे महान शास्त्रज्ञ चार्लस् डार्विन..
पाच वर्षांची महान पृथ्वीप्रदक्षिणा करून चार्लस् डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतामुळे प्रचलित वैचारिक संकल्पनांना प्रचंड हादरा बसला.. अन् एकोणिसाव्या शतकातील पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या निर्मितीविषयक वेडगळ संकल्पनांना उत्क्रांतीच्या सिद्धांतामुळे सुरुंग लागून तत्कालीन समाजाचा जणू पायाच हादरला..
मनुष्यप्राणी ही देवाची अनमोल निर्मिती नसून उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार नैसर्गिक निवडीच्या उत्क्रांती प्रक्रियेतील सर्वसाधारण आकृतिबंधाचा केवळ एक क्षुल्लक घटक असल्याच्या विचाराला तत्कालीन धर्मसत्तेचा कडाडून विरोध होता.. वैज्ञानिक जगतात आज सहजपणे स्वीकारला जाणारा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत वैज्ञानिक निकषांवर तावून-सुलाखून पारखून घेण्यात आलाय.. पण एकविसाव्या शतकातील आजच्या आधुनिक प्रगत युगातही उत्क्रांतिवादाला कडव्या विचारसरणीकडून होणारा विरोध मात्र कायम आहे..
अशी डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या संशोधनाची रोमांचक चित्तरकथा.. उत्क्रांतीवाद अन् त्याचे वादग्रस्त पुस्तक.. महान शास्त्रज्ञ चार्लस् डार्विनच्या द्विजन्मशताब्दी वर्षांत व उत्क्रांतीवादाच्या क्रांतिकारी संकल्पनेला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मानवजातीच्या इतिहासात गेल्या २००० वर्षांत आपल्या सभोवतालचे विश्व जाणून घेण्याच्या आपल्या विचारसरणीत आमूलाग्र बदल घडविणाऱ्या चार्लस् डार्विनचे योगदान महत्त्वाचे आहे.. चला तर मग वेध घेऊ या उत्क्रांतीवाद आणि उत्क्रांतीवादाच्या जनकाचा..
उत्क्रांतीवादाचा जनक चार्लस् डार्विन (१८०९-१८८२)
१२ फेब्रुवारी १८०९ साली चार्लस् डार्विनचा इंग्लंडमधील श्रूसबेरी येथे जन्म व १९ एप्रिल १८८२ साली वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी इंग्लंडमधील डाउन येथे चार्लस् डार्विनचे निधन झाले. हे वर्ष चार्लस् डार्विनच्या द्विजन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
उत्क्रांतीवाद
‘ओरिजिन ऑफ स्पिसिज्’ हे उत्क्रांतिवादाची क्रांतिकारी संकल्पना सादर करणारे चार्लस् डार्विनलिखित पुस्तक २४ नोव्हेंबर १८५९ रोजी प्रसिद्ध झाले.. उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताला या वर्षी १५० वर्षे पूर्ण होत आहेत.
‘डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत हा आधुनिक जीवशास्त्राचा पाया आहे.’.. कॉलिन टज