Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

घरफोडीची नवी पद्धत
उपनगरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर काही केल्या गुन्हेगार सापडेनासे झाले आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाचाही

 

समांतर तपास सुरू आहे. परंतु गुन्हेगार क्वचितच हाती लागत आहेत.
घरफोडय़ांचे जे गुन्हे झाले त्यात प्रामुख्याने इमारतीच्याच पहारेकऱ्याचा हात असल्याचे निष्पन्न झाले. त्यातल्या त्यातही नेपाळी पहारेकरी असेल तर त्या सोसायटीत कधी ना कधी घरफोडीचा गुन्हा हमखास होणारच अशी पोलिसांचीही खात्री पटलेली.
कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्रकुमार जैस्वाल यांनी गेल्या काही महिन्यांच घरफोडी करणाऱ्या ज्या गुन्हेगारांचा शोध लावला त्यामध्ये प्रामुख्याने या नेपाळी गुरख्यांचाच संबंध असल्याचे स्पष्ट झाले. जैस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्य सोसायटीत नेपाळी गुरखा पहारेकरी असेल तर समजायचे की, गुन्ह्य़ाची उकल झालीच म्हणून. याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, त्या गुरख्याचा चोरीशी वा तत्सम गुन्ह्य़ाची थेट संबंध नसेल. परंतु त्याने टीप तरी दिलेली असणार हे स्पष्ट आहे. त्यापोटी त्याची बिदागी त्याला मिळत असते. त्यामुळे नोकरीही शाबूत आणि वरकमाईही. मुंबईतल्या घरफोडय़ांच्या ६० ते ७० टक्के गुन्ह्य़ांमध्ये हीच ‘मोडस ऑपरेंडी’ वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंधेरी येथील युनिट आठच्या पथकाने अटक केलेल्या आरोपींची वेगळीच ‘मोडस ऑपरेंडी’ पुढे आली आहे. या पथकाने अटक केलेल्या टोळीने २७ घरफोडय़ांची कबुली दिली आहे.
या युनिटचे पोलीस नाईक सुनील उलसार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, नवीन रिक्षा खरेदी करून त्याद्वारे उदरनिर्वाह करणारे काही इसम भरमसाठ भाडे देऊन राहत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली आणि घरफोडय़ा करणाऱ्या टोळीचा त्यांना परदाफाश करता आला. मोहम्मद कमाल जहाँगीर शेख ऊर्फ मोफा (२५), मोहम्मद आसीफ अकबर शेख ऊर्फ राजा (२३) आणि चिकूकुमार कृष्णकुमार स्वाही ऊर्फ राजू (२२) या तिघांना अटक करण्यात आली. त्यापैकी मोफा आणि राजा यांना घरफोडीच्या गुन्ह्य़ांमध्ये अटक झाली होती.
रात्रीच्या वेळी रिक्षाने प्रवाशाला सोडण्यासाठी जाताना ते पाहणी करतात. एखाद्य इमारतीत सुरक्षा व्यवस्था नीट नाही हे पाहून ते तेथे घरफोडी करण्याचे ठरवितात. त्यानुसार रिक्षाचालक या दोघांना घेऊन जातो. संबंधित दोघे टापटीप असतात. रिक्षा इमारतीसमोर उभी ठेवल्यानंतर अन्य दोघे मागच्या बाजूने तळमजल्यावरील फ्लॅटचे ग्रील कापून घरात प्रवेश करतात. मौल्यवान वस्तुंची चोरी केली की, ते पुन्हा रिक्षातून परतात. रिक्षा उभी असताना कुणी चौकशी केलीच तर रिक्षा ‘वेटिंग’मध्ये असल्याचे सांगितले जाते. सध्या ही नवी पद्धत उपनगरात विशेषत: खार, वांद्रे, निर्मलनगर आदी परिसरात वापरली जात आहे. या तिघांनी विकलेली चोरीची मालमत्ता पोलिसांनी अक्रम जहीर मोहम्मद शेख याच्याकडून हस्तगत केली आहे. सुमारे ६८ तोळे सोन्याचे दागिने आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागले आहेत. आणखी काही गुन्हे या टोळीकडून होण्याची शक्यता आहे. मात्र या टोळीच्या अटकेनंतर निर्मलनगर, खार परिसरात घरफोडीचे गुन्हे कमी झाले आहेत, असा पोलिसांचा दावा आहे.
nishant.sarvankar@expressindia.com