Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रानारानात गेली बाई शीळ गं..
एके काळी एचएमव्हीचे दादा अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायक जी. एन. जोशी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष..एचएमव्हीमध्ये अधिकारी असताना शास्त्रीय संगीताच्या कलाकारांकडून जोशी यांनी अनेक रेकॉर्ड्स करून घेतल्याच, पण त्या हूरहूर लावणाऱ्या भावगीताच्या काळाचे खरे जनक असे त्यांना म्हणता येईल. कारण ते स्वत: भावगीतांच्या

 

वाटेवरचे पहिले यात्रिक होते. स्वत: उच्चशिक्षित वकील असलेले जोशी वावरले व रमले ते संगीताच्या क्षेत्रात. १९३५ पासून त्यांच्या एचएमव्हीकडून सातत्याने रेकॉर्ड्स येत गेल्या. त्यांना मानवंदना देण्यासाठी कंपनीने त्यांच्या आवाजातील जुन्या ४३ भावगीतांचा दोन सीडींचा संच बाजारात आणला असून त्यात जोशी यांच्या आवाजातील फिरत, लयकारी, खटके-मुरके याचा आस्वाद रसिकांना घेता येतो. आता काहीही केले तरी ही गाणी रेडियोवर, टीव्हीवर ऐकायला मिळायची नाहीत. त्यामुळे ‘स्वरगंगेच्या तीरी’ हा संग्रह काढून एचएमव्हीने रसिकांसमोर एक नजराणाच पेश केला आहे. एचएमव्हीत रमाकांत रुपजी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच करून टाकले. जी.एन. जोशी, रमाकांत रुपजी व वसंतराव कामेरकर या अधिकाऱ्यांच्या त्रयीने या भावगीतांच्या काळाला खरा आकार आणि आधार दिला. किती नव्या नव्या कलाकारांना त्यांनी हेरून प्रोत्साहन दिले व त्यांच्याकडून नेमकी रसिकांना आवडतील अशी गाणी करून घेतली त्याला तोडच नाही. शिवाय मराठी व हिंदी चित्रपटांच्या संगीताचे काम पुन्हा निराळे..अर्थात त्यात जोशी यांचा मुख्य वाटा नसला तरी स्टुडिओ उपलब्ध करून देणे, गायक व वादकांची रिअर्सलचे वेळापत्रक याचे ताळतंत्र पुन्हा त्यांनाच बघावे लागे. त्यात कलाकारांचा मूड सांभाळणे, त्यांना न दुखावणे ही मोठी जबाबदारी असायची. एचएमव्हीत ४० वर्षे जी. एन. जोशी यांनी हे काम लीलया सांभाळले. त्या काळात कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एचएमव्ही हे एकच मोठे व्यासपीठ होते. त्यामुळे जी. एन. जोशी हे का दादा अधिकारी होते, याचा अंदाज रसिकांना येईल.
‘रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ असे म्हणणाऱ्या एका प्रेमात पडलेल्या तरुणीचे हे मनोगत मेहेकरचे कवी ना. घ. देशपांडे यांचे. ते जोशी यांनी निवडले व चाल लावून म्हणायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात रमाकांत रुपजी यांनी ते ऐकले व त्याची रेकॉर्ड करण्याचे ठरले. जोशी यांचा या शीळेच्या गाण्यामुळेच एचएमव्हीत प्रवेश झाला व पुढे या शीळेनेच त्यांना वकीलीचे ज्ञान विसरण्यास भाग पाडले. खरे तर निसर्ग आणि प्रेमाची महती याचे वर्णन करणारे हे स्त्री गीत, पण ते गायले एका पुरुषाने..महाराष्ट्रात ते १९३५ च्या सुमारास घराघरांत पोहोचले. तुफान रेकॉर्ड्स खपल्या व एचएमव्हीलाही मोठा आर्थिक फायदा झाला. त्यांचा फिरता आवाज आणि गायनातील सहजता बघून त्यांनाच तेथे अधिकारी होण्याची संधी मिळाली. ना. घ. देशपांडे यांची ‘नदीकिनारी, नदीकिनारी गं’ व ‘फार नको वाकू उंच जरी बांधा’ ही गाणी पुन्हा जी. एन. जोशी यांनी गाजविली. ‘डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको’ हे ना. घ. यांचे आणखी एक प्रसिध्द गाणे, पण ते नंतर पुढे सुधीर फडके यांच्या आवाजात लोकप्रिय झाले. जी. एन. जोशी यांच्या आवाजात असेच आणखी एक गाजलेले स्त्री गीत म्हणजे भा. रा. तांबे यांचे ‘डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका’..पुढे वसंत प्रभू यांच्या संगीतात लतादीदींनी ते आणखी लोकप्रिय केले. ना. घ. देशपांडे आणि स. अ. शुक्ल यांची गाणी जोशी यांनी वेचून वेचून निवडली, चाली लावून ती म्हटली व लोकप्रिय केली. जी ४१ गाणी आहेत ती बहुतांश १९३५ ते १९४५ च्या दरम्यानची आहेत. त्यामुळेच भावगीतांच्या वाटेवरचा पहिला यात्रेकरू म्हणून जी. एन. जोशी यांनाच श्रेय दिले पाहिजे. त्या काळात गजानन वाटवे यांनीही रसिकांना असेच वेड लावले, पण त्यांचा काळ १९३८-३९ नंतर खरा जोमाने सुरू झाला. जोशी आणि वाटवे यांची गाणी ऐकणे व हरवून जाणे हा त्या काळातील मध्यमवर्गीय मराठी घरातला छंद होता. ज्यांच्याकडे ग्रामोफोन असायचा त्यांना समाजात का मोठा मान होता, हे रसिकांना त्यातून कळावे. या संग्रहात जोशी यांची अन्य गाजलेली गाणी म्हणजे ‘प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी’, ‘आलात ते कशाला, प्रिय जाहला कशाला’, ‘अशी घालं गळा मिठी बाळा’, ‘एकटीच भटकत नदीकाठी’, ‘चल रानात साजणा’ ही होत. त्या काळातील गायिका लीला लिमये आणि गांधारी हनगल (म्हणजे गंगुबाई हनगल) यांच्यासोबतची तीन द्वंद्वगीते संग्रहात आहेत आणि ती ऐकताना मजा येते. कारण द्वंद्वगीतांचे हे सुरुवातीचे रुपडे आहे. ‘मंजूळ वच बोल सजणा’ (लीला लिमये) आणि ‘तू तिथे अन मी इथे हा’ व ‘चकाके कोर चंद्राची’ (गंगूबाई हनगल) ही ती तीन गाणी आहेत. ही तीनही गाणी पुन्हा कवी स. अ. शुक्ल यांची आहेत. ‘राया येता जवळ मनमोहना’, ‘चल रानात सजणा’, ‘जादुगारिणी सखे साजणी’, ‘आमराईत कोयल बोले’, ‘कन्हैय्या दिसशी किती साधा’, ‘या तारका सूर बालिका’, ‘झुळझुळ वाहे चंद्रभागा’, ‘देव माझा तू कन्हैय्या’ ही अन्य स. अ. शुक्ल यांची गाणी संग्रहात दिसतात. ‘नज सोडवे पदाला’ या गीताला तर ‘कशी या त्यजू पदाला’ या ‘एकच प्याला’मधील गाजलेल्या नाटय़गीताची सहीसही चाल आहे. ‘आकाशीच्या अंतराळी’ व ‘विसरून जा’ ही दोन पदे कवी अनिल यांची तर ‘प्रिय जाहला कशाला’ व ‘माझ्या फुला उमल जरा’ ही दोन पदे वि. द. घाटे यांची आहेत. माधवराव पटवर्धन म्हणजे माधव ज्युलियन यांची दोन गाणीही रसिकांना मोहवतात.
कविवर्य स. अ. शुक्ल हे त्या काळी मोठे प्रस्थ होते. अनेक भावगीतांबरोबरच त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही गाणी लिहिली. ते शीघ्र कवी होते व त्यामुळे निर्मात्यांना त्यांचे काम खूप आवडायचे. काव्य मागितले आणि लगेच मिळाले तर तो निर्माता तरी का नाही खूश होणार? त्यांचा ज्योतिषाचा अभ्यासही प्रचंड होता. ग. दि. माडगूळकर यांची कुंडली बघून हा पोरगा माझी जागा घेणार हे भविष्य त्यांनी वर्तवले होते आणि पुढे अगदी तसेच झाले. संगीतकार दत्ता कोरगावकर आणि ज्येष्ठ बुजुर्ग अभिनेते जोग व अभिनेते शाहू मोडक यांचाही ज्योतिषाचा अभ्यास चांगला होता. निर्मात्यांना चित्रपटाच्या शुभारंभासाठी व चित्रिकरणाचे महुर्तही हीच मंडळी काढून द्यायची. रसिकांनी हा जी. एन. जोशी यांचा संग्रह आवर्जून संग्रही बाळगण्याजोगा झाला आहे.
दादा कोंडके-विनोदी संवाद आणि गाणी
‘बोट लाविन तिथं गुदगुल्या’ व ‘आली अंगावर’ या दादांच्या दोन चित्रपटांमधले विनोदी संवाद आणि गाणी एचएमव्हीने या सीडीत पेश केले आहेत. ‘बोट लाविन तिथं’मधल्या संवादाबरोबरच ‘आई माझ्या लग्नाची गं का तुलाच पडली घाई’, ‘पाणी थेंब थेंब गळं’ आणि ‘पिकलं जांभूळ’ ही गाणी रसिकांना ऐकता येतात. संवाद हे दादांचे आवडते लेखक राजेश मुजुमदार यांचे आहेत. ‘साखर झोपेमंदी’ हे गाणे आली अंगावरमधले आहे. दादा कोंडके यांच्या चाहत्यांना खूश करून सोडेल अशीच ही सीडी आहे.
चालले मी संगतीने
व्यवसायाने स्टेट बँकेत नोकरी करणाऱ्या व काव्याचा छंद जोपासणाऱ्या सविता दामले व संगीतकार उषा टिकेकर-देशपांडे यांच्या सहकार्याने हा भावगीतांचा संग्रह नुकताच दाखल झाला असून सर्व गाण्यांना उत्तम चाली आहेत. ‘चालले मी संगतीने’, ‘घन कलला गं’. ‘चंद्राची ती कोर’, ‘जाण्याची इतुकी का घाई’, ‘राजसा घ्यावा गोविंद विडा’ अशी वेगवेगळ्या भावार्थाची गाणी वैशाली सामंत, साधना सरगम, मंदार आपटे, विद्या करलगीकर, अंजली नांदगावकर या गायक कलाकारांकडून गाऊन घेण्यात आली आहेत. ‘चालले मी संगतीने’ आणि ‘राजसा, घ्यावा गोविंद विडा’ ही दोन गाणी खरेच चांगली झाली आहेत. भावगीतांच्या क्षेत्रातील हा नवा प्रयत्न आहे आणि मेहनतीने गाण्यांची निवड करण्यात आली आहे. ‘मनसा’ या संस्थेने ही सीडी बाजारात आणली आहे.
satpat2007@rediffmail.com