Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वेध बर्फाच्छादित आवरणाचा
पृथ्वीवरील ७२ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. यापैकी बहुतांश भाग समुद्र आहे. पृथ्वीवरील या बर्फाच्छादित आवरणाचे तुकडे पडत आहेत आणि हे तुकडे वेगाने समुद्राच्या दिशेने सरकत आहेत. जगभरातील पाणीपुरवठय़ावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या घटनेमागची रहस्य काय आणि त्यावरील उपाय काय, हे शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांकडून सुरू आहे. नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवर येत्या २२ एप्रिल रोजी ‘अर्थ डे स्पेशल’ निमित्ताने

 

दाखविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये या समस्येचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता ‘सीड हन्टर’, सायंकाळी ५ वाजता ‘स्ट्रेंज डेज ऑन द प्लॅनेट अर्थ : ओशन्स - डेंजरस कॅच’, सायंकाळी सहा वाजता ‘स्ट्रेंज डेज ऑन द प्लॅनेट अर्थ : ओशन्स - डर्टी सिक्रेट’, सायंकाळी ७ व ११ वाजता ‘अर्थ रिपोर्ट : स्टेट ऑफ द प्लॅनेट’ आणि रात्री ८ व १२ वाजता ‘एक्स्ट्रिम आइस’ हे कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहेत.
‘चार दिवस सासूचे’ विक्रमी २००० भाग
ई टीव्ही मराठी, झी मराठी, मी मराठी आणि सह्य़द्री या चार वाहिन्यांमध्ये टीआरपीची तीव्र स्पर्धा आहे. त्याशिवाय हिंदी वाहिन्यांच्या आकर्षक कार्यक्रमांमुळे मराठी प्रेक्षकांना मराठी मालिका बघण्यासाठी खेचून आणण्यासाठीही अनेक क्लृप्त्या मराठी वाहिन्यांना करतात. टीआरपीचा आलेख सतत उंचावत ठेवण्यात ई टीव्ही मराठीला सगळ्यात मोठा हातभार लागला तो श्री सिद्धिविनायक चित्र प्रस्तुत ‘चार दिवस सासूचे’ या कार्यक्रमाचा! स्टार प्लसवरील ‘क्यों कि साँस भी बहू थी’ या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे हिंदी वाहिन्यांमध्ये या पठडीतील मालिका सादर करण्याची अहमहमिका सुरू झाली त्याचप्रमाणे ‘चार दिवस सासूचे’ सुरू झाल्यानंतर या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे अन्य मराठी वाहिन्याही या प्रकारच्या चार-चार ट्रॅक असलेल्या गोष्टींची मालिका निर्मिती करण्यासाठी सरसावल्या. अजूनही गाजत असलेल्या मालिकेचे दोन हजारावा भाग मे महिन्यात प्रसारित होणार आहे. मराठी मालिकेने २ हजार भागांपर्यंत घोडदौड करणे हा मराठी वाहिन्यांमधला विक्रम या मालिकेने केला आहे.
आशालता देशमुख यांच्या कुटुंबाची कहाणी, एक बिझनेस वुमन आणि एक राजकारणी व्यक्ती म्हणून रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली आशालता देशमुख ही व्यक्तिरेखा तसेच कविता मेढेकर हिने साकारलेली अनुराधा देशमुख ही व्यक्तिरेखा या दोन प्रमुख व्यक्तिरेखांभोवती ‘चार दिवस सासूचे’ मालिकेचे कथानक गुंफलेले आहे. सुरुवातीपासूनच या दोन व्यक्तिरेखा मालिकेच्या केंद्रस्थानी असूनही मालिकेची लोकप्रियता नवी उंची गाठते आहे हे या मालिकेचे खरे यश आहे. सर्वसाधारणपण एक व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून गुंफलेल्या कथानकात नंतर टीआरपी मिळाला तरी मूळ व्यक्तिरेखा हळूहळू त्यातून बाजूला पडते असे शेकडो भागांच्या मालिकेत पाहायला मिळते. मात्र या दोन व्यक्तिरेखा हेच मालिकेचे बलस्थान बनवण्यात पटकथा लेखक आणि दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत हे या मालिकेचे वैशिष्टय़ आहे.
राजकारण, घर आणि बिझनेस या तिन्ही आघाडय़ांवर सामथ्र्यशाली व प्रभावी भूमिका घेणारी आशालता देशमुख आणि सोशिक असली तरी वेळप्रसंगी निश्चित भूमिका ठामपणे मांडणारी अनुराधा देशमुख या दोन्ही व्यक्तिरेखा सशक्त असल्यामुळेच ही मालिका लोकप्रियता टिकवून आहे किंबहुना त्यामुळेच महिला प्रेक्षकांचा या व्यक्तिरेखांना जोरदार पाठिंबा मिळाला असावा.
चिन्या
एण्डेमॉल इंडिया या रिअॅलिटी शोचे वेगवेगळे फॉरमॅट बनविणाऱ्या कंपनीने मराठी वाहिन्यांच्या क्षेत्रात पाऊल ठेवले असून ‘मी मराठी’ वाहिनीवर ‘चिन्या’ ही बच्चेकंपनीला आवडणारी मालिका तयार केली आहे. ‘गोटय़ा’, ‘बोक्या सातबंडे’, ‘नायक’ या बालगोपाळांच्या व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या मालिकांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून बच्चेकंपनीला आवडेल अशी मालिका देण्याचा हा मी मराठीचा प्रयत्न आहे अर्थातच टीआरपी वाढविण्याचा हेतू यामागे आहे हे विसरून चालणार नाही. दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७.३० वाजता ‘चिन्या’ बच्चेकंपनीला भेटतोय. चिन्या या टोपणनावाची व्यक्तिरेखाही चिन्मय कुलकर्णी या चिमुरडय़ाने साकारली आहे. खोडकर चिन्या आणि त्याच्या जोडीला शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, बाळ कर्वे या लोकप्रिय कलावंतांच्या भूमिका यात आहेत.