Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

‘लोकसत्ता कॅम्पेन’ गुरुवारपासून कॉलेजमध्ये
अतुल कुलकर्णी यांचा तरुणांशी थेट संवाद

प्रतिनिधी

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लोकसत्ता रविवार वृत्तान्तमध्ये ‘पहिले ते राजकारण' हा लेख लिहून लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी तरूणांना अधिक डोळसपणे मतदान करण्याचे आवाहन करणारे अभिनेते अतुल कुलकर्णी आता मुंबई परिसरातील निरनिराळ्या महाविद्यालयांमध्ये तरूण-तरूणींशी थेट संवाद साधणार आहेत. या ‘लोकसत्ता कॅम्पेन’निमित्त उन्हाळ्याच्या सुटीतही कॉलेज कॅम्पस बहरणार आहेत. एरव्ही राजकारणाबाबत उदासीन असणाऱ्या तरूणांनी अतुल कुलकर्णीच्या ‘पहिले ते राजकारण' या लेखास भरभरुन प्रतिसाद दिला.

पदयात्रा, चौकसभांसह प्रत्यक्ष भेटीवर अधिक भर
थेट मतदारसंघातून (उत्तर मुंबई)

बंधुराज लोणे

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम नाईक पुन्हा मैदानात आहेत. या मतदारसंघातून त्यांनी अनेकदा निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मतदारसंघ नवा नाही. गेल्या पाच वर्षांत खासदार नसतानाही ते कार्यरत होते आणि त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. त्यामुळे त्यांनी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून खरेतर प्रचाराला सुरूवात केली होती. त्यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. प्रचारयात्रा आणि लोकांच्या प्रत्यक्ष भेटीवर नाईक यांचा भर आहे. पहिल्या फेरीत त्यांनी रेल्वे स्थानके आणि चौक सभांवर भर दिला आहे.

‘शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठीच रिंगणात..’
४०० ते ५०० वष्रे ज्ञात इतिहास असणाऱ्या आपल्या रायगडमध्ये जमिनींच्या बचावासाठी अनेक लढाया, क्रांत्या, सत्याग्रह झाल़े त्यात माहीत असलेल्या चिरनेरचा सत्याग्रह, चरीचा संप या प्रसिद्ध क्रांत्या होत़ या लढ्यांतून प्राप्त झालेल्या सुपीक जमिनी विनाशकारी प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार असून त्या जमिनी वाचविण्यासाठी मी ही निवडणूक लढवित आहोत़ पेणमधील ‘सेझ हटाव’ यासाठी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला नाही़ उद्ध्वस्त होणारे कोळी बांधव आणि कोळीवाडे यांचा आवाज दडपण्यात आला़ आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहानुभूतीसाठी मोठमोठे पॅकेज देणाऱ्यांना, जिवंतपणी शेतकरी मरणप्राय यातना भोगत आहेत याचा विसर पडला़

आयडिया उत्क्रांतीची
आयडियाची कल्पना आहे उत्क्रांतीची.. सर्व सजीव नैसर्गिक निवडीनुसार उत्क्रांत झाले असल्याचा उत्क्रांतिवादाचा क्रांतिकारी सिद्धांत.. अशी उत्क्रांतीची संकल्पना.. आज आपल्याला अगदी साधी, सरळ वाटणारी.. पण विश्वास ठेवा १५० वर्षांपूर्वी मात्र डार्विनच्या उत्क्रांतिवादामुळे जगभर एकच वैचारिक हलकल्लोळ उडाला.. ‘ओरिजिन ऑफ स्पिसिज्’ या आपल्या पुस्तकात डार्विनने उत्क्रांतीवादाचा क्रांतिकारी विचार सादर केलाय.. उत्क्रांतीवाद ही एक क्रांतिकारी संकल्पना आहे.. पृथ्वीवरील जीवशास्त्रीय उत्क्रांती नैसर्गिक निवडीच्या सूत्रातून झाली असल्याचा महान सिद्धांत डार्विनने मांडला..

पालिकेचे सल्लागार असलेला आयआयटी बॅकआऊट
खास प्रतिनिधी

पालिकेच्या विधि विभागाने टीसीएस या पालिकेचे संगणकीय सल्लागार म्हणून काम पाहणाऱ्या कंपनीला टेट्राचे काम देता येणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतरही मुंबईसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या १०० कोटी रुपयांच्या आपत्कालीन दूरसंचार प्रणाली ‘टेट्रा संदेश दळणवळण प्रकल्पा’साठी जागतिक निविदा काढून अत्यंत घाईने निविदा निश्चित करण्याचे काम सुरू असल्यामुळे पालिका वर्तुळात ‘अर्थपूर्ण संशय’ व्यक्त करण्यात येत आहे. या साऱ्यात आयआयटीची बदनामी होत असल्याने या प्रकल्पाचे सल्लागार म्हणून काम पाहणाऱ्या ‘आयआयटी’ सारख्या जागतिक संस्थेनेही यापुढे पालिकेचे सल्लागार म्हणून काम पाहण्याची इच्छा नसल्याचे कळवले आहे.

घरफोडीची नवी पद्धत
उपनगरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर काही केल्या गुन्हेगार सापडेनासे झाले आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाचाही समांतर तपास सुरू आहे. परंतु गुन्हेगार क्वचितच हाती लागत आहेत. घरफोडय़ांचे जे गुन्हे झाले त्यात प्रामुख्याने इमारतीच्याच पहारेकऱ्याचा हात असल्याचे निष्पन्न झाले. त्यातल्या त्यातही नेपाळी पहारेकरी असेल तर त्या सोसायटीत कधी ना कधी घरफोडीचा गुन्हा हमखास होणारच अशी पोलिसांचीही खात्री पटलेली.

रानारानात गेली बाई शीळ गं..
एके काळी एचएमव्हीचे दादा अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायक जी. एन. जोशी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष..एचएमव्हीमध्ये अधिकारी असताना शास्त्रीय संगीताच्या कलाकारांकडून जोशी यांनी अनेक रेकॉर्ड्स करून घेतल्याच, पण त्या हूरहूर लावणाऱ्या भावगीताच्या काळाचे खरे जनक असे त्यांना म्हणता येईल. कारण ते स्वत: भावगीतांच्या वाटेवरचे पहिले यात्रिक होते. स्वत: उच्चशिक्षित वकील असलेले जोशी वावरले व रमले ते संगीताच्या क्षेत्रात. १९३५ पासून त्यांच्या एचएमव्हीकडून सातत्याने रेकॉर्ड्स येत गेल्या.

वेध बर्फाच्छादित आवरणाचा
पृथ्वीवरील ७२ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. यापैकी बहुतांश भाग समुद्र आहे. पृथ्वीवरील या बर्फाच्छादित आवरणाचे तुकडे पडत आहेत आणि हे तुकडे वेगाने समुद्राच्या दिशेने सरकत आहेत. जगभरातील पाणीपुरवठय़ावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या घटनेमागची रहस्य काय आणि त्यावरील उपाय काय, हे शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांकडून सुरू आहे. नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवर येत्या २२ एप्रिल रोजी ‘अर्थ डे स्पेशल’ निमित्ताने दाखविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये या समस्येचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

आशीष बुक सेंटरतर्फे चर्चगेट येथे पुस्तक प्रदर्शन
प्रतिनिधी

आशीष बुक सेंटरच्या वतीने १५ एप्रिलपासून चर्चगेट येथील सुंदराबाई सभागृहात पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून याच ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. त्याला साहित्यप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळतो. सध्या उन्हाळ्याची सुटी सुरू झाल्याने लहान मुलांची पुस्तके मोठय़ा प्रमाणावर विकली जात असल्याचे या बुक सेंटरचे व्यवस्थापक प्रवीण झा यांनी सांगितले. शाळा-महाविद्यालयांच्या ग्रंथालयांसाठी या प्रदर्शनात खास सवलत देण्यात आली आहे. जाहिरात, वास्तुरचना, कला, सौंदर्य, कुकरी, संगणक, फॅशन, कथा-कादंबऱ्या, बागकाम, खेळ, छायाचित्रण, इतिहास, चरित्र- आत्मचरित्र अशा विविध विषयांवरील एक लाखापेक्षा जास्त पुस्तके या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. २८ एप्रिलपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

जग, भारत आणि महाराष्ट्राच्या समग्र माहितीची ‘ज्ञानगंगा’!
प्रतिनिधी

जग, भारत आणि महाराष्ट्राशी संबंधित सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि भौगोलिक विषयांसह अन्य अनेक विषयांची समग्र माहिती आता ‘ज्ञानगंगा’ या सीडीद्वारे उपलब्ध झाली आहे. शैलानी सॉफ्टवेअर सोल्युशन्स कंपनीने ही सीडी तयार केली असून गेल्या महिन्यात महाबळेश्वर येथे झालेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. या सीडीमध्ये जग, भारत आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध छायाचित्रे आणि नकाशे देण्यात आले असून भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञान, प्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे कार्य, शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पर्यटन, धर्म, भाषा, संगीत आदी विषयांची संपूर्ण माहिती यात देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्त्येक जिल्ह्याची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती, तेथील हवामान यासह प्रत्येक जिल्ह्याचा नकाशा देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ०२०-४००५६५५४ किंवा ०२५६१-२२४९४१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

ल्यूकोडर्मा आणि सोरायसिस बरा होऊ शकतो- डॉ. काब्रा
प्रतिनिधी

ल्युकोडर्मा (पांढरे डाग अथवा श्वेतचर्म) किंवा सोरायसिस हे रोग झालेली व्यक्ती खचून जाते. हे रोग पूर्णपणे बरे होत नाहीत, अशी बऱ्याच जणांची समजूत असते. जळगाव येथील डॉ. महेंद्र काब्रा यांच्या मते होमिओपथीच्या उपचारांनी हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. काब्रा यांनी सांगितले, ल्युकोडर्मा आणि सोरायसिस हे दोन्ही त्वचारोग नाहीतच. हे त्वचेवाटे बाहेर पडणारा रोग आहेत. या रोगांचे मूळ शरीराच्या अंतर्गत अवयवांत होणाऱ्या विकारांत असते. त्वचेवर पांढरे डाग हे आतील रोगाचे उत्सर्जन आहे. त्यामुळे याची लक्षणे त्वचेवरील पांढऱ्या डागांच्या रुपाने दिसत असली तरी आतील रोग बरा करणे हाच ल्युकोडर्मा किंवा सोरायसिवरील इलाज आहे. ते पुढे म्हणाले की, होमिओपथी या रोगाचे समूळ उच्चाटन करते. यावरील उपचारांचा कालावधी सहा महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंत असू शकतो. होमिओपथीने उपचार सुरू झाल्यावर आतील रोग बरा होतो आणि त्यामुळे आपोआपच ल्युकोडर्मा किंवा सोरायसिसही बरा होतो. मेंदूपासून पायापर्यंत कोणत्याही अवयवाला होणारा विकार हे ल्युकोडर्मा किंवा सोरायसिस होण्यासाठी कारणीभूत असू शकतात.
गेली २५ वर्षे या क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉ. काब्रा यांच्या मुंबई, जळगावसह भारतभरात आणि इंग्लंडमध्येही शाखा आहेत. त्यांनी सांगितले की, रुग्णावर जेवढय़ा लवकर उपचारांची सुरुवात होते, तेवढय़ा लवकर हा विकार बरा होण्यास मदत होते. या रोगामुळे कंड सुटते, झोप येत नाही आणि रुग्णाच्या दिनचर्येवर परिणाम होतो. अशा माणसांचा विवाह होण्याच्या मार्गातही अनेक अडचणी निर्माण होतात. डॉ. काबरा केवळ रुग्णांवर उपचार करून थांबत नाहीत. तर त्यांनी अशांसाठी विवाहनोंदणी कार्यालयही सुरू केले आहे. योग्य उपचार, योग्य आहार आणि विहार या त्रिसूत्रीचा वापर केल्या ल्युकोडर्मा आणि सोरायसिस हे विकार पूर्णपणे बरे होतात, असे डॉ. काब्रा खात्रीलायकरित्या सांगतात. या विकारांबद्दल अधिक माहितीसाठी ९६१९२९०५४९ या क्रमांकावर किंवा cure@drkabra.com या ईमेल अड्रेसवर डॉ. काब्रा यांच्याशी संपर्क साधावा.