Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

जाहीर प्रचाराची आज सांगता
गडकरींची नगरमध्ये सभा; कर्डिले, राजळे पाथर्डीत
नगर, २० एप्रिल/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता उद्या (मंगळवारी) सायंकाळी होणार आहे. सांगतेनंतर ‘अटीतटी’च्या प्रसंगी वापरायच्या सर्व सामग्रीची सज्जता प्रमुख उमेदवारांनी केली आहे. भाजपचे उमेदवार दिलीप गांधी प्रचाराची सांगता प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या सभेने करणार आहेत, तर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले व अपक्ष उमेदवार राजीव राजळे प्रचाराचा समारोप पाथर्डीत करणार आहेत.

मतदानाचा एका दिवसाचा खर्च ४ कोटी!
आचारसंहिता भंगाचे ५६ गुन्हे
नगर, २० एप्रिल/प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील दोन्ही मतदारसंघातील २३ एप्रिलच्या मतदानाचा एका दिवसाचा खर्च आहे ४ कोटी! ६ हजार पोलीस त्यादिवशी तैनात असतील. सुमारे एक हजार वाहने, २१ हजार कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत असतील. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.

रंग प्रचाराचे
कॉम्रेडची भ्रमंती
सागर वैद्य
गाडय़ांचा ताफा, कार्यकर्त्यांची फौज, संपर्क कार्यालय, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा आणि कडक खादीचे कपडे घातलेला उमेदवार हे सध्या सर्वत्र दिसणारे चित्र. पुढाऱ्यांना असे ग्लॅमर प्राप्त झाल्याच्या काळात आजही कम्युनिस्ट परंपरेला साजेशा पद्धतीने प्रचाराचे युद्ध लढणारा, जिंकण्या व हरण्यासाठी नव्हे, तर पक्षाची विचारधारा व देशाचे प्रश्न जनतेपुढे मांडण्यासाठी निवडणुकीला उभा असणारा उमेदवार म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कारभारी वामन ऊर्फ का. वा. शिरसाठ.

नगर अर्बन बँकेला ३ कोटी ९ लाख निव्वळ नफा
सभासदांना १५ टक्के लाभांश
नगर, २० एप्रिल/प्रतिनिधी
नगर अर्बन सहकारी बँकेस यंदा ३ कोटी ९ लाखांचा निव्वळ नफा झाला. सभासदांना यंदा १५ टक्के लाभांश देण्यात येईल. ठेवींत मोठी वाढ झाली असून, त्या ४२९ कोटी ६५ लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत. बँकेचे प्रभारी अध्यक्ष तथा उपाध्यक्ष सुरेश बाफना व ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.

चिचुंदरीला शुभ समजा!
माझे शालेय शिक्षण जन्मगावी झाले. इयत्ता चौथीपर्यंत दोनच शिक्षक असल्यामुळे एकाला दोन वर्ग सांभाळावे लागत. एका वर्गास शिकविण्याचे काम सुरू असे तेव्हा दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी गडबड करत. माझे आवडते शिक्षक पाठक गुरूजी यांनी वर्गातील एका विद्यार्थ्यांचे टोपणनाव त्याच्या स्वभाव वैशिष्टय़ामुळे ‘उंदीर’ असे ठेवले होते. तो विद्यार्थी सारखा दाताने काहीतरी कुरतडत असे व बसल्या जागी हाता-पायाच्या नखांनी माती उकरत असे.

आखेगावचे माजी सरपंच भाऊसाहेब काटे यांचे निधन
शेवगाव, २० एप्रिल/वार्ताहर
तालुक्यातील आखेगावचे माजी सरपंच व बोधेगाव येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब सर्जेराव काटे (वय ५८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले, तसेच एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. शेवगाव येथील रेसिडेन्शिअल विद्यालयाचे प्राचार्य म्हणून काही काळ त्यांनी काम केले. ‘केदारेश्वर’चे संचालक माधव काटे यांचे ते चूलतबंधू, तर जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन तज्ज्ञ डॉ. रामेश्वर काटे यांचे ते चुलते होत. रेसिडेन्शिअल विद्यालयात झालेल्या शोकसभेत काटे यांना आदरांजली वाहण्यात आली.

राहुरीला तापमानाचा वाढता पारा
राहुरी, २० एप्रिल/वार्ताहर
परिसरात गेल्या चार दिवसांत तापमानाचा पारा तीन अंशाने वाढला आहे. सध्या ४० अंशाच्यावर तापमानाचा पारा असल्याने दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट असतो.
सकाळपासूनच उन्हाचा तडाखा सुरू होतो. लोकसभा निवडणुकीचा प्रचारही शेवटच्या टप्प्यात आहे. उन्हामुळे ग्रामीण भागात कार्यकर्तेही सावलीचा आधार शोधत आहेत. उन्हाच्या तीव्रतेची झळ चारा पिकांनाही बसत आहे. कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवडय़ात नोंदविलेले तापमान असे - दि. १७ - ३७.२, दि. १९ - ३९.६, दि. २० - ४०. कडक उन्हाचा जनजीवनावर परिणाम होत आहे.

कर्डिलेंची मिरजगावला प्रचारफेरी
मिरजगाव, २० एप्रिल/वार्ताहर
राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या पत्नी अलकाताई यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या प्रचारफेरीत महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.
मिरजगावच्या सरपंच डॉ. शुभांगी गोरे, लताताई कवडे यांच्यासह सर्वश्री. संपत बावडकर, विकास तनपुरे, डॉ. गोरे, रमेश घोडके, अण्णा बनकर, विजय पवळ, संग्राम घोडके, अजिनाथ मेहेत्रे, शेख आदी प्रचारफेरीत सहभागी झाले होते. श्रीमती कर्डिले यांचे येथे फटाके फोडून स्वागत करण्यात आले.

मोदींची रद्द झालेली सभा पुन्हा घेण्यात भाजपला अपयश
नगर, २० एप्रिल/प्रतिनिधी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची रद्द झालेली प्रचार सभा पुन्हा घेण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अखेर अपयश आले. दरम्यान, या सभेच्या रद्द होण्याबाबत भाजपमध्ये जोरदार चर्चा सुरू असून, त्याचा काय परिणाम होईल यासंदर्भात उमेदवार दिलीप गांधी यांच्यापासून सर्व चिंतेत आहेत. दरम्यान, मोदी नगरची सभा रद्द करून लातूरला गेले असे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र लातूरलाही त्यांची सभा झाली नाही. ते नंतर सोलापूरला व तेथून गोव्याला जाणार, त्यासाठी वेळ मिळावा म्हणून नगरची सभा रद्द केल्याचे ऐनवेळी जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात मोदी यांनी त्या दिवशी फक्त सोलापुरात सभा घेतली. गोव्यात ते गेलेच नाहीत. त्यामुळेच नगरची जाहीर केलेली सभा का रद्द केली, याविषयी कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. पोलीस खात्याकडून मोदी यांच्या सभेला ‘क्लिअरन्स’ मिळाली नाही, अशी माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र, जिल्हाध्यक्ष ढाकणे किंवा अन्य कोणी अधिकृतपणे बोलायला तयार नाही.

असह्य़ उष्म्यानंतर बरसल्या चैत्रधारा
नगर, २० एप्रिल/प्रतिनिधी
शहर व परिसरात आज सायंकाळी बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. चैत्रधारांमुळे निर्माण झालेल्या काहीशा गारव्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दिवसभराच्या उन्हाच्या काहिलीने वैतागलेल्या नागरिकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. गेल्या आठ-दहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. तापमापकातील पाऱ्याने ४१ अंशांची पातळी गाठली होती. आज सकाळपासून प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारनंतर काळे ढग दाटून आले. साडेपाचच्या सुमारास हलक्या सरी बरसू लागल्या. थोडय़ा वेळात जोरदार पाऊस पडू लागला. रस्त्यावरील नागरिक, विक्रेते यांची त्यामुळे धावपळ उडाली. नागरिकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटून वाढत्या उष्म्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न केला. सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता. या पावसाने शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान होणार आहे. मात्र, उन्हाळी भुईमूगास पावसाने हातभार लावला. भुईमूगास लागणारे एक पाळी पाणी पावसाने वाचवले. वादळी वारे नसल्याने आंब्याचा मोहोर आणि कैऱ्यांना फारशी हानी पोहोचली नाही.

गैरप्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्ताची राजळे यांची मागणी
नगर, २० एप्रिल/प्रतिनिधी
नगर मतदारसंघात मतदानाच्या दिवशी गैरप्रकार होण्याची शक्यता गृहित धरून अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे त्या दिवशी सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्याची मागणी आज केली. आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत त्यांनी याविषयीचे निवेदन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांना दिले. आपण त्यांना त्याचे ६ पानी उत्तर दिले असून, त्यात मतदानाच्या दिवशी असणाऱ्या सर्व बंदोबस्ताची माहिती दिली आहे, असे डॉ. अन्बलगन यांनी सांगितले. राजळे यांनी आपल्या निवेदनात विरोधी उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, गृह खाते राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा दबावाखाली असेल. यासाठी नगरचे उपनगर असणाऱ्या केडगाव, बुऱ्हाणनगर, तसेच श्रीगोंदे तालुक्यात मांडवगणसह अन्य ठिकाणच्या मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतची यंत्रणा राबवावी, असे म्हटले आहे. डॉ. अन्बलगन यांनी सांगितले की, प्रशासन सर्व प्रकारची परिस्थिती हाताळण्यास सज्ज आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर असून, तिथे जादा पोलीस बंदोबस्तही देण्यात आला आहे.

नेप्ती शिवारात छापा; गावठी दारूचे रसायन जप्त
नगर, २० एप्रिल/प्रतिनिधी
गुन्हे शाखा व नगर तालुका ठाण्याच्या संयुक्त पथकाने नेप्ती शिवारात छापा टाकून ३५ हजार रुपये किमतीचे गावठी दारूचे रसायन जप्त केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नेप्ती शिवारात छापा घालून दीड हजार लिटर कच्चे रसायन जप्त केले. दारूचा अड्डा चालविणारे बाबा बाजीराव पवार, राजू बाजीराव पवार फरारी आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक राजपूत, उपनिरीक्षक गोविंद आधटराव, हवालदार राजाराम वाघ, पोलीस रमेश माळवदे, जाकीर शेख, राजेंद्र सावंत, महिला पोलीस शालन जाधव, नगर तालुक्यात पोलीस खंडागळे, सय्यद यांनी ही कारवाई केली.