Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

प्रचार कार्यालये ओस, कार्यकर्तेही सैरभैर
‘कल चमन था, आज उजडा हुआ..’

ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून, नागपूर, २० एप्रिल

मतदान आटोपल्यानंतर उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांची आता अवस्था पाहिल्यानंतर ‘कल चमन था, आज उजडा हुआ, ये क्या हुआ’ या ‘वक्त’ चित्रपटातील गाण्याची आठवण कार्यकर्त्यांना झाल्याशिवाय राहत नाही. निवडणूक म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांसाठी निदान दोन आठवडय़ांची पर्वणीच असते. उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी सकाळच्या चहा-फराळापासून तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची आणि इतर सारी व्यवस्था केलेली असते. मात्र, मतदानाचा दिवस संपताच ही सारी व्यवस्था धाराशाही केव्हा पडते, हे बिचाऱ्या कार्यकर्त्यांना समजतही नाही.

मुत्तेमवार देवदर्शनाला, वासनिक दिल्लीला, पुरोहित आदेशाच्या प्रतीक्षेत, मेघे गोव्यात..
नागपूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभेच्या विदर्भातील दहा जागांसाठी मतदान झाल्यानंतर पहिले दोन दिवस कोणत्या भागात किती मतदान झाले व किती मते मिळतील, याचा काथ्याकूट करणारे बहुतांश उमेदवार आता पक्षाच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. काहींनी परमेश्वराच्या आशीर्वादाचा आधार घेण्यासाठी देवदर्शनाची योजना केली आहे तर, काहींनी रिलॅक्स होण्यासाठी पर्यटनस्थळी जाण्याचा बेत आखला आहे. नागपूरसह विदर्भाच्या बहुतेक मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी इतरत्र जावे लागले आहे किंवा लागणार आहे. भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ येथील उमेदवार प्रचारासाठी रवाना झाले आहेत.

प्रमोद अग्रवालचा कसून शोध
नागपूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

प्रमोद अग्रवालच्या शोधासाठी पोलिसांची पथके कामाला लागली असून बेपत्ता होण्यामागे त्याचा हेतू तरी काय, असा प्रश्न पोलिसांसह नागरिकांनाही पडला आहे. पोलीस स्वस्थ बसलेले नाहीत. विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहेत. त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी त्याचे नातेवाईक, परिचित तसेच गोतावळ्यात कानोसा घेतला जात आहे. साध्या वेषातील पोलिसांची काही संशयित ठिकाणी पाळत आहे. फार दिवस तो फरार राहू शकत नाही. याशिवाय पोलीस काहीच बोलायला तयार नाहीत.

‘पॅकेज टूर्स’ला निवडणुकीचा फटका, व्यवसायात २० ते २५ टक्क्यांनी घट
नागपूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

गेले काही महिने जागतिक मंदीची झळ सोसणाऱ्या पर्यटन क्षेत्राला आता निवडणुकीचा फटका बसतो आहे. त्यामुळे टूर ऑपरेटर्सच्या व्यवसायात २० ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू असून मे महिन्याच्या पंधरवडय़ापर्यंत ती चालणार असल्याने यंदा पर्यटन क्षेत्राला जागतिक मंदीबरोबर निवडणुकीचाही फटका बसणार आहे. एप्रिल आणि मेमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुटय़ा येत असल्याने पर्यटनस्थळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

गेल्या वर्षीच्या पीक हानीची मदत यंदा
नागपूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

शेतकऱ्यांना तातडीने मदत करणारे सरकार, अशी शेखी मुख्यमंत्र्यांपासून सर्वच अधिकारी मिरवत असले तरी, प्रत्यक्षात मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेताना चालढकलच केली जाते. गेल्यावर्षी मार्च, एप्रिलमध्ये गारपीट व मुसळधार पावसामुळे झालेल्या फळबागांच्या नुकसानीची मदत शासनाने यावर्षी मार्च अखेरीस जाहीर केली. पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टपर्यंत मदत दिली जाणार आहे. आचारसंहिता असल्याने ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी अवधी लागणार आहे.

महिलेचा खून; मायलेकांना अटक
नागपूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

िहगण्यातील एका महिलेच्या खून प्रकरणी पोलिसांनी मायलेकांना अटक केली. संत्री बंडू चव्हाण व मुलगा अनिल बंडू चव्हाण असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गीता बंडू चव्हाण (रा. धनगरपुरा िहगणा) हिचा मृतदेह शनिवारी सकाळी तिच्या घरीच सापडला होता. कपाळावर गंभीर दुखापत झाल्याचेच स्पष्ट दिसत होते. िहगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. बंडू चैनू चव्हाण याला पहिली संत्री, दुसरी गीता व तिसरी शोभा या तीन बायका असून संत्रीला तीन मुलगे व एक मुलगी, गीताला एक मुलगा व शोभाला एक मुलगी आहे. बंडू गीतासोबत राहतो. तो रखवालदार आहे.याप्रकरणी संत्री व तिचा मुलगा अनिल या दोघांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. होळीच्या दिवशी अनिल गीताकडे पलंग मागण्यास गेला होता. तिने नकार दिल्याने त्यांच्यात भांडण झाले. तिला संपवण्याचा अनिलने ठरवले होते. शुक्रवारी बंडू अमरावतीला लग्नासाठी गेला होता. अनिलने संत्रीला कोंढाळीहून बोलावून घेतले. रात्री उशिरा गीताच्या घरात शिरून सब्बलीने गीताच्या चेहऱ्यावर जोरदार वार करून तिला ठार मारले, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

सहकार खात्याच्या दुर्लक्षामुळेच नागरिकांची फसवणूक
ग्राहक चेतना मंचचा आरोप
नागपूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

कळमना मार्केट अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रमोद अग्रवालने कोटय़वधी रुपयांच्या ठेवी स्वीकारताना मोठय़ा व्याजाचे आमिष दाखविले, देवा धर्माच्या नावाखाली योजना राबवून सर्व वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या. त्याकडे सहकार खात्याचे प्रमुख म्हणून जिल्हा उपनिबंधक संजय कदम यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांची फसवणूक झाली असल्याचा आरोप ग्राहक चेतना मंचने केला आहे. सोसायटीच्या अनेक शाखांना सहकार खात्याची परवानगी नसताना शाखा उघडण्यात आल्या, ग्राहकांना भेटवस्तू वाटप करणे, जाहिरातींवर लाखो रुपये खर्च करणे इत्यादी बाबींवर सहकारी खाते, पोलीस आर्थिक गुन्हे शाखा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादींनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक झाली आहे. त्यामुळे सोसायटीच्या संचालक मंडळासह सहकारी पतसंस्थेच्या जिल्हा उपनिबंधकाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक चेतना मंचचे शरद भांडारकर, सुभाष खाकसे, प्रमोद लोणारे, नाना झोडे, अ‍ॅड. योगेश शुक्ला, मधुकर रामटेके, शैलेंद्र दहीकर, संजय चामट आदींनी केली आहे. तसेच फसवणूक झालेल्या ग्राहकांनी त्याची तक्रार जिल्हा दंडाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्याचे आवाहन मंचने केले आहे.

स्वप्नजा सोसायटीतर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबीर
नागपूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वप्नजा एज्युकेशन सोसायटीच्यावतीने १ ते ३० मेपर्यंत व्यक्तिमत्व विकास या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. एक महिन्याच्या कालावधीत शिबिरार्थीना व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुलाखतीचे तंत्र, नेतृत्व, वक्तृत्व व कौशल्य, उद्योजकता नैपुण्य, वेळेचे व्यवस्थापन, देहबोली, लेखन संवाद, पत्रलेखन, संवाद कौशल्य इत्यादी विषयाची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. १५ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांना या शिबिरात प्रवेश मिळणार आहे. अधिक माहितीसाठी २७०५९७३ व ९४२२८६०६४८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जनसंवाद विभागाची परीक्षा पुढे ढकलली
नागपूर, २० एप्रिल/ प्रतिनिधी

जनसंवाद विभागाची उद्या, मंगळवारपासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मंगळवारी, २१ एप्रिलला ‘तत्त्व आणि पत्रकारितेचा इतिहास’ हा पेपर १४ मे रोजी घेण्यात येईल. मॉडर्न न्यूज रिपोर्टिग आणि फिचर रायटिंग हा २८ एप्रिलला सुरू होणारा पेपर आता २७ मे रोजी होईल आणि ‘एडिटिंग इन इलेक्ट्रॉनिक इरा’ हा ४ मे रोजी होणारा पेपर २९ मे रोजी घेण्यात येणार असल्याची अधिसूचना विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे. या तीनही पेपरचे परीक्षा केंद्र आणि वेळ तीच राहील. उर्वरित पेपरच्या तारखा आणि वेळेमध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नसून याची प्राचार्य, विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने अनेक विद्यार्थी अडचणीत आले असून वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करीत असलेल्या अनेक पत्रकारांनी सुट्टय़ा काढून परीक्षेची तयारी केली होती. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे रिझर्वेशन, लग्नाच्या योजना आखल्या होत्या. तेही लोक आता अडचणीत आले आहेत. दरम्यान, विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासक्रमाची परीक्षा तीन दिवसांवर येऊन ठेपली असता त्याचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन विद्यार्थ्यांनी आज, सोमवारपासून आंदोलनाचा इशारा दिला होता.

मेटॅडोरच्या धडकेने तीन मजुरांचा मृत्यू
नागपूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

वेगात असलेल्या मेटॅडोरने (टाटा एस) दिलेल्या धडकेने रस्त्यावर काम करणाऱ्या तीन मजुरांचा मृत्यू झाला. त्यात दोन मुलींचा समावेश आहे. वर्धा मार्गावर बेल्याजवळील सोनेगाव येथे सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. व्यंकटय्या एलय्या मादास, दानापल्ली रमादेव नागन्ना व मादास कविता मसन्ना (सर्व रा. मुछटल्ला आंध्र प्रदेश) ही मृत मजुरांची नावे आहेत. ‘जेएसआर कन्ट्रक्नशन कंपनी’ला राष्ट्रीय महामार्गावरील सोनेगाव परिसरात रस्ता बांधणीचे कंत्राट मिळाले असून रस्ता दुभाजकासाठी माती भरण्याचे काम तेथे सुरू आहे. हे काम सुरू असताना नागपूरकडून वेगात जात असलेल्या टाटा एस (एमएच ३१ सीबी ३५३४) वाहनाने या तीन मुजरांना धडक दिली. अपघात झाल्याचे समजताच बेला पोलीस तातडीने तेथे पोहोचले. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या व्यंकटय्याला बुटीबोरीच्या रचना रुग्णालय आणि इतर दोघी मजूर मुलींना शुअरटेक रुग्णालयात दाखल केले. तेथे सायंकाळी तिघांचा मृत्यू झाला. बेला पोलिसांनी वाहन चालक आरोपी समतुल श्याम शिरसाट (रा. िहगणघाट) याला अटक केली.

तीन ठिकाणी चोऱ्या; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
नागपूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

सीताबर्डीवरील फॅशन क्लब, इब्राहिम ब्रदर्स या दुकानाच्या मागील लाकडी दाराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी सव्वादोन लाखाचा ऐवज लांबवला. सोमवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली. दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले रोख ४४ हजार व १ लाख ७१ हजार ९०३ रुपयांचे रेडिमेड कपडे, असा एकूण २ लाख १५ हजार ९०२ रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार दुकान मालक नौशाद मुसा इब्राहिम (रा़ मेंहदीबाग कॉलोनी) यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात केली. पाचपावलीमधील उड्डाण पुलाजवळील दिनेश ज्वेलर्सच्या व्हेंटिलेटरच्या सळ्या काढून चोरटय़ांनी सोन्याचे दागिने व रोख ४० हजार, असा एकूण ७५ हजार १४५ रुपयांचा ऐवज लांबवला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला़ तिसरी चोरी नागसेन नगरात सोमवारी सकाळी उघडकीस आली. जमील अहमद मोहम्मद सलीम हे शुक्रवारी बाहेरगावी गेले होते. सोमवारी सकाळी घरी परतले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. कपाटातील ३१ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख ४० हजार, असा एकूण ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कुख्यात आरोपींना अटक
नागपूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

हद्दपार असलेल्या एका कुख्यात आरोपीला इमामवाडा पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. कमलेश ऊर्फमििरडा बळवंत गवई (रा़ रामबाग) हे त्याचे नाव आहे. परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्तांनी त्याला १९ जुलै २००८ला दोन वर्षांसाठी नागपूर शहर व नागपूर ग्रामीण भागातून हद्दपार केले होत़े गिट्टीखदान पोलिसांनी वीस वर्षांपासून फरार असलेल्या रज्जुसिंग ऊर्फ तेजकुमार जगदधारीसिंग ठाकूर याला कुतुबशहानगर येथून तसेच सुब्रोत्तम नकुलचंद राय (रा़ जगदीशनगर) या आरोपींना सोमवारी अटक केली़ मालकाला मारहाण करून लुटले ट्रक चालक आणि वाहकान मालकाला मारहाण करत लुटल्याची घटना वाडी येथे खडगाव मार्गावर रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. कोहली ट्रान्सपोर्टचे मालक प्रितलपालसिंग कोहली (रा़कोलबास्वामी कॉलोनी) हे उभे असताना ट्रक (एमपी/२०/एचबी/१४२८) चालक जगदीश व वाहक या दोघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली आणि काळ्या बॅगमधील ७७ हजार रुपये हिसकून पळून गेल़े प्रितपालसिंग यांना गेटवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले.