Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
नवनीत

जी व न द र्श न
ती एक विधवा

आयुष्याच्या अध्र्या वाटेवर तिचा पती देवाघरी निघून गेला. तिची कूस उजवली नव्हती. आपल्या चंद्रमौळी झोपडीत ती एकटीच राहात होती. वंध्या, त्यात विधवा, त्यामुळे तिच्या नशिबी दुहेरी उपेक्षा आली होती. ‘विधवांना त्रास देऊ नये, जो त्यांच्यावर अन्याय करील तो शापग्रस्त ठरेल.’ (जुना करार, अनुवाद २७:१९) असा नियम मोझेसने घालून दिला होता. परंतु पुराणातील वांगी पुराणातच कुजून जात असतात.
धर्मकायद्यांचे अभ्यासक विधवांचे वकीलपत्र घेत. त्यांना मदत करण्याचा आव ते आणत, परंतु वास्तविक ते त्यांची लूटमार करीत. ती विधवासुद्धा अशा शोषणाची बळी ठरली होती. अशा पंडितांचा येशूने जाहीर निषेध केला. (नवा करार, मॅथ्यू २३:१४)
आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा देवाला द्यावा, हा धर्माचा नियम तिला माहीत होता. देवाला काहीतरी दिलेच पाहिजे या विचाराने तिला अस्वस्थ केले. तिने दिवसभर शेतात काम केले. तिला मजुरीची दोन नाणी मिळाली. ती पहाटे उठली. नाणी घेऊन ती जेरुसलेमच्या मंदिरात गेली. श्रीमंत लोक मोठमोठय़ा देणग्या देत होते. ती संकोचली. शरमली. मनाचा हिय्या करून तिने हळूच ती नाणी दानपत्रात टाकली. त्या नाण्यांच्या क्षीण नादाने मंदिराच्या पायरीवर ध्यानस्थ बसलेल्या प्रभू ख्रिस्ताची समाधी भंग पावली. तो उठला. धिम्या पावलांनी प्रवचनपीठावर चढला आणि मोठय़ाने म्हणाला, ‘‘येथील सर्व धनवानांनी जे दान केले आहे, त्यापेक्षा या गरीब विधवेने अधिक दिले आहे. त्या सर्वानी हातचे राखून दान केले, तिने आपली सर्व कमाईच देऊन टाकली आहे.’’ (नवा करार, लूक २१:१.४) प्रामाणिक गोरगरिबांच्या दानाच्या नावाने कान सुखावतात. तर भ्रष्टाचारी श्रीमंताच्या दानाच्या खणखणाटाने कानठळय़ा बसतात.
संत पॉल हा येशूचा परमशिष्य होता. त्याने विधवांना पुनर्विवाह करण्याचा सल्ला दिला. त्याने सांगितले, ‘वासनेने जळण्यापेक्षा लग्न केलेले बरे.’ (१ करिंथ ७ : ८) साठ वर्षांवरील विधवांचा संघ काढून, त्यांना आधार द्यावा, असे संत पॉलने आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. (१ तिमथी ५ : ९-१०).
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd43@gmail.com

कु तू ह ल
राशीत व नक्षत्रात असणे
ग्रह, सूर्य किंवा चंद्र एखाद्या नक्षत्रात व राशीत असतो, याचा अर्थ काय?

पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. याचा परिणाम म्हणून सूर्य तारकांच्या संदर्भाने आपली जागा बदलतो असे आपल्याला दिसते. तारकांच्या पाश्र्वभूमीवर स्थलांतर करणाऱ्या सूर्याचा एक मार्गच आकाशात रेखाटता येतो. या सूर्यमार्गाला आयनिक वृत्त असे म्हणतात. सूर्यमार्गावरील ताऱ्यांना किंवा तारकांच्या गटाला आपण रोहिणी, पुनर्वसू, मघा किंवा सिंह, वृश्चिक या नावाने संबोधतो. सूर्य, ग्रह, चंद्र यांचे अचूक स्थान सांगण्यासाठी सूर्यमार्गाचे समान बारा भाग केले आहेत. सूर्यमार्गाचे म्हणजे ३६० अंशाचे समान बारा भाग केले, तर प्रत्येक भाग ३० अंशाचा होतो. या भागांना गणितात्मक राशी म्हणतात. सूर्य दररोज सरासरी एक अंश चालतो म्हणजे सूर्याचा मुक्काम एका राशीत एक महिना असतो. सूर्य एखाद्या राशीत असणे म्हणजे त्या तारकांच्या पाश्र्वभूमीवर असणे किंवा त्या त्या गणितात्मक विभागात असणे असा अर्थ घ्यावा. भारतीय खगोलतज्ज्ञांनी प्रत्येक राशीचे गणितात्मक पद्धतीने सव्वादोन भाग केले आहेत. त्यामुळे १२ राशी मिळून २७ नक्षत्रे होतात. सूर्याचा सिंह राशीत किंवा मघा नक्षत्रात प्रवेश याचा अर्थ काय? सिंह ही पाचवी रास आहे. म्हणजे सूर्याने ४ राशींचा अर्थात १२० अंशांचा प्रवास पूर्ण केला आहे असा अर्थ घ्यावा. मघा हे सिंह राशीतील सुरुवातीचे नक्षत्र आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात मृग नक्षत्र लागले याचा अर्थ त्या नक्षत्र विभागात सूर्याने प्रवेश केला असे समजावे. सूर्य ज्या राशीत किंवा नक्षत्रात असतो त्या राशीतील तारे सूर्याबरोबरच उगवतात व मावळतात, त्यामुळे त्यांचे दर्शन त्या काळात होत नाही.
हेमंत मोने
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२

दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
दुसरी एलिझाबेथ

१९५२ साली ग्रेट ब्रिटन या देशाच्या सम्राज्ञीपदी विराजमान झालेल्या एलिझाबेथ दुसऱ्या यांना खरे तर आपण ब्रिटनच्या सम्राज्ञीपदी येऊ असे वाटले नव्हते. कारण त्या पंचम जॉर्जच्या धाकटय़ा मुलाच्या कन्या. त्यांचा जन्म लंडनमध्ये २१ एप्रिल १९२६ रोजी झाला. काही राजकीय उलथापालथींमुळे तिचे वडील सहावे जॉर्ज इंग्लंडचे राजे बनले आणि त्या राजकन्या. इतिहास, भाषा संगीत या विषयात त्यांनी प्रावीण्य मिळविले होते. राजघराण्याशी संबंधित असणाऱ्या फिलिप माऊंटबॅटन यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. १९५२ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. १९५३च्या सुमारास त्यांचा राज्याभिषेक होऊन त्या देशाच्या राजप्रमुख बनल्या. बदलत्या काळाचे भान त्यांना होते. त्या जेव्हा सम्राज्ञीपदी आल्या तेव्हा ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळायला लागला होता. प्रत्यक्ष गादीवर असताना ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांना भेट देणाऱ्या त्या पहिल्याच राजप्रमुख. यानंतर त्यांनी अनेक युरोपियन देशांना अधिकृतरीत्या भेटी दिल्या. अमेरिका व कॅनडाचाही दौरा आखला. तब्बल अर्धशतकानंतर भारत आणि भारतीय उपखंडाला भेट देण्याचा योग त्यांच्यामुळेच आला. १९७७ साली त्यांच्या राज्यरोहणाला २५ वर्षे झाली. त्यानिमित्ताने लंडनमध्ये आयोजित राष्ट्रकुल देशांच्या परिषदेत ३६ देशांचे प्रमुख उपस्थित होते. परिषदेच्या अध्यक्षपदी त्या होत्या. राजघराण्याला पारंपरिक चौकटीतून त्यांनी बाहेर काढले. शाही कुटुंबाचे घरगुती जीवन त्यांनी दूरचित्रवाणीवरून दाखवायला सुरुवात केली. आपल्या बहिणीच्या अधिकृत घटस्फोटालाही परवानगी दिली. आपला मुलगा प्रिन्स चार्ल्स याला वारस म्हणून अधिकृतपणे १९८८च्या सुमारास जाहीर केले. जगातील एक धनवान महिला अशीही त्यांची ओळख होती.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
सोनलचे धाडस

दगडू कासवाला आपल्या तळय़ात राहण्याचा फार कंटाळा आला होता. तळय़ातले कंटाळवाणे आयुष्य सोडून त्याला वेगळे जीवन जगायचे होते. दगडू तळय़ातून बाहेर आला आणि चालत राहिला. किती तास, दिवस गेले ठाऊक नाही. अचानक त्याला पूर्वी कानावर न पडलेले आवाज ऐकू येऊ लागले. आजूबाजूने वेगाने काहीतरी पळत जाई. नाकातोंडात धूळ जाई. एवढा मोठा आवाज करत वेगाने पळणारे प्राणी त्याने पूर्वी पाहिले नव्हते. रस्त्यावर त्याचे पाय चिकटत होते. त्याला अचानक हवेत वर घेतले गेले. दगडूला वाटले, कुणा घारीने आपल्याला पकडले आहे. चारी पाय, मान आपल्या कवचात ओढून घेतली. उग्र वासाची शू खूप प्रमाणात केली. त्या वासाने शत्रू दूर जाईल असे त्याला वाटले. दगडूला वाटले तसे काही घडले नव्हते. तो एका शहरात शिरला होता. डांबरी रस्त्यावर चालताना एका मोटारीखाली तो चिरडणार, एवढय़ात त्या माणसाने कचकन ब्रेक दाबले. रस्त्याने एवढय़ा संथपणे हालणारी छोटी आकृती पाहण्यासाठी तो खाली उतरला. लहान शहाळय़ाच्या आकाराचे, अंगावर लिंबोणी रंगाच्या चांदण्या असणारे ते कासव पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने दगडूला अलगद उचलले आणि घरी येऊन आठ वर्षांच्या सोनलला दिले. ते जिवंत सुंदर खेळणे नव्हे मित्र पाहून सोनल किंचाळली, ‘अय्या, कासव? माझ्यासाठी? मी पाळू याला.’ सोनलच्या संगतीत दगडू छान रमला. तळय़ात यायचा तसा कंटाळा त्याला येईना. आई भाजी निवडायला बसली की तो देठे फस्त करी. काकडी, द्राक्षे, टोमॅटो, कलिंगड त्याला फार आवडायचे. शिवाय फरसबी, फ्लॉवर, कोबी यावर ताव मारायचा. सोनल त्याला मित्र-मैत्रिणींच्यात खेळायला नेई. बाबा वाचत बसले की तो पायाला लाडाने हळूच चावे. मग बाबा त्याला उचलून मांडीवर घेत. आई लाडाने त्याला कोवळी भाजी निवडून देई. एकदा सोनल आणि दगडू गच्चीत खेळत असताना अचानक एका डोमकावळय़ाने दगडूवर झडप घातली. दगडू घाबरला. त्याने चटकन डोके आणि पाय कवचात आत घेतले. कावळा दगडूला पायात उचलण्याचा प्रयत्न करू लागला. धारदार चोचीने त्याच्यावर फटके मारू लागला. एवढय़ात दगडूऽऽऽ अशी सोनलची किंकाळी त्याने ऐकली. कोपऱ्यातली बॅट उचलून सगळे बळ एकवटून सोनलने बॅटचा टोला कावळय़ाला मारला. बेसावध कावळा कोलमडत बाजूला पडला आणि धडपडत उठून उडून गेला. दगडूला छातीशी कवटाळून रडे आवरत सोनल म्हणाली, यापुढे तुला एकटय़ाला सोडून मी कधीच जाणार नाही. तिने पाहिले. दगडूच्या दोन्ही डोळय़ांतून पाणी येत होते. जणू त्याला म्हणायचे होते, ‘‘तुला सोडून मी तरी जगू शकेन का?’’ मैत्री म्हणजे केवळ एकत्र खाणे-पिणे, खेळणे, मोबाईलवर बोलणे, चित्रपट एकत्र पाहणे नव्हे. चांगला मित्र होण्यासाठी मित्राची काळजी घेणे, त्याला कुठली अडचण आहे का? त्याला तुमच्या मदतीची गरज आहे का, या गोष्टींकडे लक्ष देऊन आवश्यक ती कृती करणे मैत्रीत आवश्यक असते. आजचा संकल्प- मी मित्राची काळजी घेईन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com