Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

‘जातीयवादी शक्तींचा बीमोड करा’
उरण/वार्ताहर -
जातीयवादी शक्तींचा बीमोड करण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनाच विजयी करण्याचे आवाहन अजित पवार यांनी उरण येथील जाहीर सभेतून केले.
उरण न.प.च्या प्रांगणात जाहीर सभेत पवार यांनी शिवसेना-शेकाप-भाजपवर जोरदार टीका केली. देशात दहशतवादी घटना घडू नयेत, असे वाटत असेल तर केंद्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे पवार म्हणाले. वैचारिक पातळी घसरलेले नेते, पुढारी भडक भाषणे केली की मते मिळतील या भ्रमात आहेत.

बाबर- पानसरे आले ‘आमने-सामने’!
पनवेल/प्रतिनिधी -
पिंपरी- चिंचवडपासून नवी मुंबईतील खारघपर्यंत पसरलेला मावळ मतदारसंघ प्रचारादरम्यान पिंजून काढणारे शिवसेनेचे गजानन बाबर आणि राष्ट्रवादीचे आझम पानसरे हे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार नुकतेच एका व्यासपीठावर आले. पनवेलमध्ये व्याख्यानमालेला नवसंजीवनी देणाऱ्या ‘सिटीझन्स युनिटी फोरम’ या संस्थेतर्फे खांदा कॉलनीतील श्रीकृपा सभागृहात नुकतेच ‘आमने-सामने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर यांनी या दोन उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

‘जनतेच्या अनेकविध समस्यांना आघाडी सरकार जबाबदार’
बेलापूर/वार्ताहर -
गाडय़ांचे सुटे भाग, रिक्षाचालकांना लागणारा सीएनजी, तसेच वाढत्या महागाईसह अनेक समस्यांना राज्यातील आघाडी सरकार जबाबदार आहे, असे मत शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे यांनी येथे व्यक्त केले. वाशी येथे आयोजित महाराष्ट्र रिक्षाचालक सेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या आघाडी सरकारच्या काळात पाच हजार जणांनी आत्महत्या केली, तरीही पुन्हा मतदारांकडे निलाजरेपणाने ते मते मागायला येत आहेत. दहशतवादाने थैमान घातले असून, देश असुरक्षिततेच्या उंबरठय़ावर असताना हे सरकार पुन्हा कोणत्या तोंडाने मत मागते आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘उच्चशिक्षित उमेदवार ही काळाची गरज’
बेलापूर/वार्ताहर -
ज्या संसदेत देशाचे कायदे होतात, आर्थिक-रोजगार याविषयीची महत्त्वपूर्ण धोरणे होतात, तेथे उच्चशिक्षित उमेदवार निवडून जाणे ही काळाची गरज असल्याचे मत मनसेचे ठाणे लोकसभा चिटणीस सुरेश कोलते यांनी येथे व्यक्त केले. ठाणे लोकसभेचे मनसेचे उमेदवार राजन राजे यांच्या कोपरखैरणे येथे आयोजित सत्कार समारंभात कोलते बोलत होते. कोलते पुढे म्हणाले की, संसदेत राज्यातून उच्चशिक्षित उमेदवार जात नसल्याने दिल्लीत गेल्यावर बोलावे तरी काय, असा प्रश्न आपल्या खासदारांना पडतो.

तटकरे ऊर्जा नव्हे, कंदील मंत्री - बाबर
उरण/वार्ताहर -
सातत्याने होणाऱ्या भारनियमनामुळे राज्याची जनता त्रस्त झाली असून, ऊर्जामंत्र्यांना कंदील मंत्री संबोधून सेनेचे बाबर यांनी तटकरे यांची चांगलीच खिल्ली उडविली.
उरण येथे रविवारी शिवसेना-शेकाप-भाजपची युतीची जाहीर सभा झाली. या सभेत मावळ मतदारसंघातील सेनेचे उमेदवार गजानन बाबर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्र सोडले. काँग्रेस व राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांनी पैसे आहेत म्हणून उमेदवारी, डोकं आहे म्हणून नव्हे, अशी मार्मिक टीकाही केली. काँग्रेस-राष्ट्रवादी या नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगून त्यांच्या पेकाटात मतदारांनी लाथा घालण्याचे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीत महागाई, बेरोजगारीबरोबरच सुरक्षिततेचा मुद्दाही महत्त्वाचा असल्याचे बाबर यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यावर अनेक संकटे आली. मात्र रायगडचे खासदार अंतुले तिकडे कधीही फिरकले नसल्याची टीका सेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील यांनी केली. बिघडलेले घडय़ाळ व सडलेला हात मोडीत काढण्याचे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसची घमेंड जिरविण्यासाठी बाबर यांना निवडून देण्याचे आवाहन आमदार विवेक पाटील यांनी केले. शनिवारी याच प्रांगणात काँग्रेस-राष्ट्रवादीची सभा झाली होती. या सभेपेक्षा रविवारी सेना-शेकाप युतीच्या सभेला दुपटीने गर्दी होती.

पानसरेंच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये आज फेरी
पनवेल/प्रतिनिधी -
मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आझम पानसरे यांच्या प्रचारार्थ रविवारी पनवेल शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टीतर्फे फेरी काढण्यात आली. ढोल-ताशे आणि बँडच्या घोषात निघालेल्या या प्रचारफेरीमुळे पनवेलमधील राजकीय वातावरण तापले होते. गांधी मार्ग, मुसलमान नाका, नगर परिषद कार्यालय, सावरकर चौक, आगरी समाज कार्यालय, छत्रपती शिवाजी पथ आदी परिसरातून काढण्यात आलेल्या या फेरीचा समारोप रोटरी सर्कल येथे झाला. यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच हजरत अली दग्र्यात प्रार्थना करण्यात आली. या फेरीत माजी खासदार रामशेठ ठाकूर, शाम म्हात्रे, लक्ष्मण पाटील, महेंद्र घरत, प्रशांत ठाकूर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. सी. घरत, विभाकर नाईक आदी नेत्यांसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान पानसरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांची जाहीर सभा मंगळवारी २१ एप्रिलला नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे. सी. के. टी. विद्यालयाच्या मैदानात दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे.

मावळमध्ये मनसे तटस्थ
पनवेल/प्रतिनिधी -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेलमधील कार्यकर्ते आणि मतदार विशिष्ट पक्षाला मतदान करणार, अशा वावडय़ा उठविल्या जात आहेत, परंतु पनवेल मनसेचा कोणत्याही उमेदवाराला अथवा पक्षाला पाठिंबा नसल्याचे शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांनी म्हटले आहे. ज्या मतदारसंघात मनसेने उमेदवार उभे केलेले नाहीत, तेथे मनसेचा कोणालाही पाठिंबा नसेल, हे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले.