Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

उपसा सिंचन योजनांचा खेळखंडोबा
प्रश्न जिव्हाळ्याचे

वार्ताहर / अमळनेर

शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणून त्याद्वारे हरितक्रांती साधावी या उद्देशाने उत्तर महाराष्ट्रात उपसा जलसिंचन योजनांचा पूर आला. पण, अशा उपसा जलसिंचन योजनांमधून पाणी मिळणे दूरच राहिले, पण शेतकऱ्यांची शेती कर्जाच्या जंजाळात अडकली. लाखोंचे कर्जाचे ओझे वाढत गेले. परिमाणी, शेतकऱ्यांना ना जमिनी विकता येईनात, ना दुसरे कर्ज मिळण्याचा पर्याय उपलब्ध राहिला. अशा स्वरूपाच्या अनेक योजना भ्रष्टाचाराच्या कुरण ठरल्या असल्यानेच की काय, संबंधित प्रश्न आजही कायमच आहेत. जळगाव व धुळे जिल्ह्य़ातून तापी नदी वाहते. या पाण्याची उचल करून जवळच्या शेतांमध्ये नेता यावे, यासाठी उपसा जलसिंचनची संकल्पना पुढे आली. गावोगावी सोसायटय़ा स्थापन झाल्या. अनेक शेतकरी भागधारक झाले. त्यांना जिल्हा सहकारी बँकांनी शेतकऱ्यांच्या जमिनी तारण घेऊन भागभांडवल दिले. अनेक योजनांचे काम सुरू झाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी नाण्याच्या दोन बाजू - नितीन गडकरी
मनमाड / वार्ताहर

गरीबी, बेकारी, दारिद्र्य, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हेच स्वप्न स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतर आम्ही पाहिले होते का, असा सवाल करून काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथे केले. दिंडोरी मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ येथील एकात्मता चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. गडकरी यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध समस्यांचा उहापोह करताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणावर टीका केली. या देशात मतपेटीसाठी दहशतवाद्यांचे तुष्टीकरण सुरू आहे, असा आरोप करून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली खंबीर आणि भक्कम सरकार सत्तेवर आणण्यासाठी भाजप-शिवसेना युतीला साथ देण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. भारनियमनामुळे शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे पाप या सरकारने केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येस भारनियमन हे प्रमुख कारण आहे. राज्यातील उद्योगधंदे बंद पडत आहेत. आघाडी सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे, असे सांगत गडकरी यांनी खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला. आ. संजय पवार, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख राजाभाऊ छाजेड, भाजपचे शहराध्यक्ष नितीन पांडे, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. जयश्री दौंड, पीपल्स रिपब्लिकनचे दिनकर धिवर, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब कटारे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता आदींची यावेळी भाषणे झाली. हरिश्चंद्र चव्हाण यांनीही जनतेशी संवाद साधला.

सासू-सुनेपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीत अधिक भांडणे- स्मृती इराणी
नवापूर / वार्ताहर

क्योंकि सांस भी कभी बहू थी या मालिकेतील सासू-सुनेच्या भांडणापेक्षा नंदुरबार जिल्ह्य़ातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे भांडण जास्तच म्हणावे लागेल. काँग्रेसने महागाई व भ्रष्टाचार वाढविला असून खोटी घोषणा करणाऱ्या आघाडीला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री स्मृती इराणीने केले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुहास नटावदकर यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. काँग्रेसच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, महागाईमुळे गरीबांना जगणे कठीण झाले आहे. सोनिया आयेंगी नई रोशनी लायेंगी असे सांगणाऱ्यांनी गरीबांच्या घराची ‘रोशनी’च गायब केली आहे. विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्या निष्क्रीय काँग्रेसला धडा शिकवा, देशाच्या सुरक्षिततेसाठी भाजप-सेना युतीच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

अंमळगाव रूग्णालयात तोडफोड
अमळनेर / वार्ताहर

वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहात असल्याच्या कारणावरून तालुक्यातील अंमळगांव ग्रामीण रूग्णालयात ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी तुफानी हल्ला चढवित संपूर्ण साहित्याची तोडफोड केली. सुमारे साडेतीन लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेळके हे शनिवारपासून गैरहजर होते. रविवारी रात्री सतीश चौधरी यांच्या मुलास उपचारार्थ ग्रामीण रूग्णालयात नेले असता चारपैकी एकही वैद्यकिय अधिकारी उपस्थित नव्हता. केवळ एक परिचारिका उपस्थित होती. उपचाराअभावी त्या दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अशा घटना या रुग्णालयात वारंवार घडत असल्याने तसेच रुग्णालयाबाबत तक्रारी मोठय़ा प्रमाणावर आल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष होता. चौधरी यांच्या मुलाच्या मृत्यूचे निमित्त होऊन उद्रेक झाला. सकाळी साडेअकराच्या सुमारास जमावाने रूग्णालयावर हल्लाबोल केला. या हल्ल्यात लाठय़ाकाठय़ांनी रुग्णालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.