Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
विशेष

दौलतजादा सरकार
‘ऋण काढून सण साजरा करू नये’ असे म्हटले जाते, पण सहकारातील काही मंडळींच्या पचनी हे काही केल्या पडत नाही. आपल्या सहकारी साखर कारखान्यावर कर्ज नाही ही बाब त्यांना खटकते आणि काही ना काही निमित्ताने कारखान्यावर बोजा चढवला की, त्यांना हायसे वाटते. सहकारातील धुरिणांच्या या सवयीला मात्र सरकारच जबाबदार आहे हे निश्चित! साखर कारखाना आर्थिक अडचणीत आल्यावर शेतकऱ्यांना जगविण्याच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांची कर्जे, सवलती, अनुदान, पॅकेज वा थकहमी द्यायची आणि कारखानदार पोसायचे हे काम सरकार करत आले आहे. सरकारच्या या दौलतजादा वृत्तीवर मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच ताशेरे ओढले. त्यामुळे आतातरी सरकारचे डोळे उघडणार का, असे विचारण्याची वेळ आली आहे. सातव्या पंचवार्षिक योजनेत केंद्र सरकारने राज्यातील ३८ नव्या सहकारी साखर कारखान्यांना परवानगी दिली.

सांजचुली
जंगलाची प्रचंड मोठय़ा प्रमाणात तोड होत असल्यामुळे मुख्यत्वे खेडय़ापाडय़ामध्ये स्वयंपकासाठीच्या ऊर्जेचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. आजघडीला जंगलतोडीचा वेग एवढा प्रचंड आहे की, रोजच्यारोज सकाळ-संध्याकाळ अन्न शिजवता यावे म्हणून त्यासाठी आवश्यक लाकूडफाटाही मिळणे दुरापस्त झाले आहे. जंगल नष्ट झाल्याने लाकूडफाटा वा जळावू सरपणाचा शोध घेवूनही ते मिळत नसेल तर दररोज चूल पेटवायची कशी, हा प्रश्न ग्रामीण भागात रोजचीच डोकेदुखी झाला आहे. या प्रश्नावर नुसताच उपाय नव्हे तर एक कायमस्वरुपी तोडगा म्हणून ‘सांजचुली’चा प्रयोग समर्पक उत्तर ठरू शकतो, हे नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मोरंबी गावच्या आदिवासींनी सप्रमाण दाखवून दिले आहे.

केवळ एक उरकणे..
संगीत, नाटय़, लोककला चित्रकला, सांस्कृतिक क्षेत्रातील अशा प्रत्येक रूपामध्ये नाशिकची वेगळी ओळख निर्माण झाली असली तरी साहित्य क्षेत्रातील नाशिकचे योगदान राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्याजोगे. ज्ञानपीठ प्राप्त वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांसारख्या ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांमुळे साहित्य क्षेत्रात नाशिकला मिळणारा सन्मान व निर्माण झालेला दबदबा यापुढेही कायम राखण्याची जबाबदारी आपोआपच नवीन पिढीवर येऊन पडते. नाशिकच्या साहित्य क्षेत्राचा केंद्रबिंदू म्हणून सार्वजनिक वाचनालय, नाशिक अर्थात ‘सावाना’ कडे पाहिले जाते. साहित्य क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांच्या स्थित्यंतराचा साक्षीदार असलेल्या सावानाने आपल्या परीने साहित्यिकांची नवीन पिढी घडविण्याचे काम केले असले तरी सावाना जोपर्यंत काळानुरूप बदलत नाही, तोपर्यंत या पिढीला प्रोत्साहन मिळण्याची गोष्ट तरी दूरच म्हणावी लागेल. चौकटीबाहेर जाण्यास सावाना तयार होत नसल्याने त्याचा कार्यक्रमांवरही कसा परिणाम होतो, त्याचे प्रत्यंतर १६९ व्या वार्षिक समारंभातही आले.१८४० मध्ये स्थापन झालेल्या सावानाने स्वातंत्र्यानंतरपेक्षा स्वातंत्र्याआधीचा काळ अधिक अनुभवलेला. त्याच्या पाऊलखुणा वाचनालयाच्या कारभारात आजही ठळकपणे दिसतात. या पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न निश्चितच करावा, परंतु तसे करताना नवीन पीढीच्या आवडीप्रमाणे काही बदल केल्यास त्याचा उपयोग सावानालाच अधिक होणार आहे. वाचनालयाच्या परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या वार्षिक समारंभातील निरसतेकडे त्याच दृष्टीने पाहावे लागेल. चार दिवसांच्या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी विविध वाड्:मयीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कारार्थीमध्ये राज्याच्या विविध भागातील मान्यवरांचा समावेश असल्याने त्यांच्यासमोर आपले हसे होणार नाही, यादृष्टीने कार्यक्रमाचे स्वरूप ठरविण्याची गरज होती. वाचनालयाची माहिती देण्यापासून सुरू झालेले कंटाळवाणेपण शेवटपर्यंत कायम राहिले. नशिब या कंटाळवाणेपणाचे साक्षीदार होणाऱ्यांची संख्या जेमतेमच होती. त्यातही बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा समावेश. ज्येष्ठ अशा कार्यक्रमांना युवावर्गाची उपस्थिती का राहात नाही, हे पाहण्याची गरज आहे. केवळ एक वार्षिक कार्यक्रम ‘उरकणे’ असेच स्वरूप या कार्यक्रमास प्राप्त झाले होते. सुदैवाने शेवटच्या दिवशी काव्य, गायन आणि नृत्याच्या मैफलीत सहभागी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या मित्रपरिवारामुळे ‘शेवट गोड झाला’ असे म्हणावे लागेल.
अविनाश पाटील