Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

महाराष्ट्रात ‘सोशल इंजिनिअिरग’ यशस्वी होईल- मिश्रा
पुणे, २० एप्रिल/ प्रतिनिधी

‘‘बहुजन समाज पक्षाच्या ‘सोशल इंजिनिअिरग’वर सध्या विरोधकांना बोलावे लागत असून, हा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी होणार नसल्याचे ते म्हणत आहेत. याचाच अर्थ येथे पक्षाचे ‘सोशल इंजिनिअिरग’ नक्कीच प्रभावी ठरत असून, ते यशस्वी होईल,’’ असा विश्वास बसपचे राष्ट्रीय महासचिव व खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी आज येथे व्यक्त केला. पुणे लोकसभा मतदारसंघातील बसपचे उमेदवार डी. एस. कुलकर्णी यांच्या प्रचारार्थ रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

कलावंतधर्म..
राजकीय नेतेमंडळींच्या प्रचारसभांसाठी कलावंतांची उपस्थिती ही काही नवीन नाही. केवळ प्रचारापुरतेच मर्यादित न राहता प्रत्यक्ष राजकारणामध्ये उतरलेल्या कलावंतांची यादीदेखील मोठी आहे. पण, भूमिका कोणतीही करीत असली, तरी कलावंतधर्म सोडला जात नाही, याचाच दाखला राज ठाकरे यांच्या सभेत मिळाला. लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांना भाषणासाठी पुकारण्यात आले. माईकचा ताबा घेताच त्यांनी ‘उपस्थित रसिक प्रेक्षकहो..’ असा प्रारंभ केला! त्यानंतर काहीच वेळात राज यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्याचा उल्लेख करून जाधव म्हणाले..

दुबई प्रवेशाच्या शर्यतीत अखेर ‘भारती’ची सरशी!
पुणे, २० एप्रिल/खास प्रतिनिधी

संयुक्त अरब अमिरातीमध्ये शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये सुरू असलेल्या शर्यतीत अखेर भारती विद्यापीठाने बाजी मारली! आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये बालवाडीपासून बीबीए-बीसीए, एमबीए हे उच्चशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, त्याच्या प्रवेश प्रक्रियेलाही प्रारंभ झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबई येथे नॉलेज सिटी हे शैक्षणिक विकास क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दुबईपासून ६० किलोमीटरवरील रसेलखेमा येथे खासगी शिक्षण संकुले उभारण्यात येत आहेत.

मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावण्याचे मान्यवरांचे आवाहन
पुणे, २० एप्रिल/प्रतिनिधी

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण जो लौकिक मिळविलेला आहे. तो टिकवून ठेवणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाने त्याला मिळालेला मतदानाचा बहुमोल हक्क बजावावा, असे आवाहन विद्यापीठांचे आजी माजी कुलगुरु व सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांनी मतदारांना केले आहे. देशातील अनेक नागरिक त्यांना मिळालेला मतदानाचा अधिकार बजावण्याबाबत कचुराई करतात, असा आजवरचा अनुभव आहे. मतदान करून काय होईल? असा नकारात्मक विचार करणारे अनेक मतदार आहेत.

कोणतं कार्ड चालणार..?
लोक तर म्हणतात..

पुण्यात सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे ती वेगवेगळ्या कार्डाची. मराठा कार्ड, ब्राह्मण कार्ड, मुस्लिम कार्ड, दलित कार्ड.. त्यातच राजसाहेबांनी नुकतेच रेशनकार्डही चालवले आहे ते वेगळेच! पण खरी चर्चा सुरू आहे ती आधीच्याच सगळ्या कार्डाची! कोणते कार्ड ‘चालेल’ आणि ते कोणाच्या बाजूने ‘चालेल’ ते कोणालाच सांगता येत नाही, तरीही अगदी शिरा ताणून (स्वत:च्या घशाच्या) ठामपणाने या चर्चा सुरू आहेत. स्थळ- घोरपडे पेठेतील पानाचा एक ठेला. वेळ- सकाळी अकरा-साडेअकराची.

तोफा आज थंडावणार
पुणे २० एप्रिल/ विशेष प्रतिनिधी

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा कसून प्रयत्न लोकसभेच्या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार उद्या, मंगळवारी करणार आहेत. शहरभर मोठय़ा प्रचारफे ऱ्या काढून शहर िपजून काढण्याबरोबरच आपापल्या पक्षाचे स्टार प्रचारक आणून या निवडणुकीतील रंगत ते वाढविणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डी. एस. कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रणजित शिरोळे तसेच इतरही उमेदवारांनी निवडणुकीचा प्रचार हिरिरीने केला. कलमाडी यांनी प्रामुख्याने जीपयात्रा तर शिरोळे यांनी पदयात्रांवर भर दिला. अनेक मेळावे, सभा आदींनी प्रचारात रंगत आली.

सभेत भाषण करणाऱ्या शिक्षकावर कारवाई
पुणे, २० एप्रिल / खास प्रतिनिधी

निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या शिक्षकाने राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत भाषण केल्याने त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत. तसे पत्र जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. रोहिदास केरू वेठेकर या पिंपरी पेंढारमधील सद्गुरू सीताराम महाविद्यालयाच्या शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई झाल्यास संबंधित शिक्षकाला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. यासंदर्भात दयानंद सखाराम कुटे यांनी जुन्नरच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

कलमाडी, निम्हण यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगप्रकरणी समन्स
पुणे, २० एप्रिल/प्रतिनिधी

आचरसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्ष युतीचे उमेदवार खासदार सुरेश कलमाडींसहित आमदार विनायक निम्हण आणि प्रमुख कार्यकर्त्यांना समन्स बजावण्याचे आदेश खडकी न्यायालयाने दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षात सध्या खळबळ माजली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्ष युतीचे उमेदवार खासदार सुरेश कलमाडी यांच्या प्रचारार्थ मागील आठवडय़ात संचेती हॉस्पिटल ते मुळे रोड दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीत नियमांपेक्षा अधिक गाडय़ांचा समावेश केल्याने खडकी पोलिसांच्या वतीने खासदार कलमाडींसहित आमदार विनायक निम्हण, महापालिकेतील सभागृह नेते अनिल भोसले व इतर १५० कार्यकर्ते यांच्या विरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांनी खासदार कलमाडी, आमदार निम्हण व सभागृहनेते भोसले यांना फरार दाखवून तर कार्यकर्ते धीरज आरगडे व राजेंद्र कांबळे यांना अटक करून खडकी न्यायालयात हजर केले. फरारी आरोपी दररोज प्रचाराकरिता शहरात फिरत आहेत व या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध होत असताना खडकी पोलिसांनी त्यांना फरारी घोषित केल्याबाबत न्यायालयाने पोलिसांवर यावेळी ताशेरे ओढले. तसेच खडकी पोलिसांनी यावेळी सादर केलेला तपास अहवाल दाखल करून घेण्यास यावेळी नकार देण्यात आला. फरारी आरोपी खा. कलमाडी, आमदार निम्हण व भोसले विरुद्ध तातडीने समन्स बजावण्याचे आदेश यावेळी न्यायालयाच्या वतीने देण्यात आले.

स्वातंत्र्यानंतर मुस्लिमांचा अपमान - अजहरी
पुणे, २० एप्रिल/ प्रतिनिधी

‘स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मुस्लिम समाजाचे योगदान फार मोठे होते. पण या स्वातंत्र्याची फळे मिळणे दूरच राहिले आणि स्वातंत्र्यानंतर प्रत्येक ठिकाणी मुस्लिमांचा अपमान केला जातो आहे,’ असे प्रतिपादन मौलाना अब्दुल हमीद अजहरी यांनी केले. ते जनता दल सेक्युलर व युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे उमेदवार अमानुल्ला खान यांच्या प्रचारार्थ नाना पेठेतील दर्शन हॉलमध्ये आयोजित सभेत बोलत होते. या सभेला अ‍ॅड. एस. एम. सय्यद, प्रा. एच. एम. शेख, अ‍ॅड. शाहिद अख्तर, माजी विरोधी पक्षनेता नसरुद्दीन इनामदार आदी उपस्थित होते. अमानुल्ला खान आपल्या भाषणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेवर टीका करताना म्हणाले की, कुणा उमेदवाराला पाडण्यासाठी वा निवडून आणण्यासाठी उभा राहिलेलो नाही किंवा मुस्लिमांचा उमेदवार म्हणूनही उभा राहिलेलो नाही तर दलित व बहुजन समाजाचा उमेदवार म्हणून उभा आहे. या सभेत मौलाना अजहरी यांनी शहीद हेमंत करकरे व त्यांच्या दहशतवादविरोधी पथकाचे विशेष कौतुक केले. या सभेचे प्रास्ताविक अ‍ॅड. एस. एम. सय्यद यांनी केले, तर समारोप मौलाना अब्दुल हमीद अजहरी यांच्या भाषणाने करण्यात आला.

मतदान जनजागृतीसाठी फेरी
पुणे, २० एप्रिल/ प्रतिनिधी

पुण्यातील युवकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी इंडियन युथ फोरमतर्फे काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीची सुरुवात जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते ध्वज फडकावून झाली. या प्रसंगी अविनाश बागवे, प्रफुल पटेल, उमेश गायकवाड, हनुमंत पाटील, अनिल पिल्ले, हर्षल महाजन, राहुल बालवनकर आदी उपस्थित होते. युथ फोरमच्या ‘जागो युथ जागो’ या उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून झाली. शहरातील अनेक महाविद्यालयांतील परिसरात तसेच चित्रपटगृह, वसतिगृह आदी ठिकाणी ही फेरी काढण्यात आली. मतदान का करावे, कसे करावे, याबाबत युवकांना प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात आली. फग्र्युसन महाविद्यालय, सिम्बायोसिस, पुणे विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी ठिकाणी ही फेरी काढण्यात आली.

अपंग, वयोवृद्ध मतदारांसाठी मोफत वाहनाची सोय
पुणे, २० एप्रिल/प्रतिनिधी

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या मैत्र युवा विभागातर्फे मतदानाच्या दिवशी अपंग व वयोवृद्ध मतदारांसाठी शहराच्या विविध भागांतून मोफत वाहनाची सोय करण्यात आली आहे. इच्छुक मतदारांनी २२ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपली नावे संस्थेकडे नोंदवावीत. नोंदणी केलेल्या मतदारांना २३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वाहनांची सोय उपलब्ध करुन दिली जाईल. नावनोंदणीसाठी ९८९०४४४४२७ किंवा ०२०- ६५००७०७५ या क्रमांकावर सकाळी १०.३० ते दुपारी १ व सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधावा.

धनशक्तीच्या जोरावर लढणाऱ्यांना पराभूत करा - भगवान मनसुख
पिंपरी, २० एप्रिल / प्रतिनिधी

धनशक्तीच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना जनशक्तीने पराभूत करून गजानन बाबर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष भगवान मनसुख यांनी आज येथे केले. मावळ मतदारसंघातील युतीचे उमेदवार गजानन बाबर यांच्या प्रचरार्थ चिंचवड स्टेशन येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपाचे माजी शहराध्यक्ष मामनचंद आगरवाल यांच्या हस्ते मतदार स्लिपा वाटपाची सुरवात या वेळी करण्यात आली.प्रसिद्धिप्रमुख घन:शाम माने,तसेच दीपक सुनरिया, प्रणव बर्गे, सुरेश गादिया, कोरसन आगरवाल, वसंत देवी, प्रतीक गवस, रोहन बर्गे, नितीन कुर्लेकर, सुनील बाविस्कर,प्रकाश ऊबाळे, नितीन घोरपडे, संजय शेलार आदी या वेळी उपस्थित होते. मोहननगर येथेही स्लिपा वाटप समारंभ पार पडला. मतदारांना घरोघरी जाऊन स्लिपा देण्यात आल्या.भारतीय होलार समाजाने बाबर यांना पाठिंबा देणारे पत्रक काढले. रामनगर, विद्यानगर येथील बचतगटांनीही बाबर यांना पाठिंबा दिला.

लग्नाचे आमंत्रण दिले नाही म्हणून तरुणास मारहाण
पिंपरी, २० एप्रिल / प्रतिनिधी

पिंपरी खराळवाडी येथे रविवारी रात्री एका तरुणाने लग्नाचे आमंत्रण दिले नाही म्हणून राष्ट्रीय मजूर युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलास कदम व त्यांच्या दोघा भावासह पाच जणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर रेहमान सय्यद (वय २६, रा. जामा मशीदसमोर, खराळवाडी, पिंपरी) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी कैलास महादेव कदम, सद्गुरु महादेव कदम, सतीश महादेव कदम या तिघा भावांसह इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास खराळवाडी येथे समीरचा भाऊ अन्वर रहेमान सय्यद याला आरोपींनी रस्त्यात अडवून बहिणीच्या लग्नाचे आमंत्रण का दिले नाही? या कारणावरून त्यास शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर समीरलादेखील फोन करुन बोलवून घेण्यात आले. त्याला लाकडी दांडक्याने व पंचने मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या डोक्यामध्ये दारूची बाटली फोडून दोन दात पाडण्यात आले. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या हमीद नवाब शेख यांनादेखील मारहाण करून जखमी करण्यात आले. कैलास कदम हे हिंद कामगार संघटनेचे पदाधिकारी आहेत. या प्रकरणी कोणालाही सोमवारी रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती.

पानसरेंचा उद्या फेरीने समारोप
पिंपरी, २० एप्रिल/प्रतिनिधी

पानसरे यांच्या प्रचाराचा समारोप दापोडी ते पनवेल अशा रॅलीने होणार असल्याचे प्रचारप्रमुख शिरीष जाधव यांनी सांगितले. सकाळी दहा वाजता दापोडी येथील आंबेडकर पुतळ्यापासून ही रॅली सुरू होईल. पिंपळे गुरव, सुदर्शननगर, पिंपळे सौदागर, काळेवाडी, पिंपरी कॉलनी, हॉटेल गोकुळ, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी, देहूरोड, तळेगाव स्टेशन, वडगाव, कार्ला, मळवली, लोणावळा मार्गे खोपोली-पनवेल येथे समारोप होईल.

‘पर्यटकांसाठी गाईड हा उदरनिर्वाहाचा उत्तम मार्ग’
जुन्नर, २० एप्रिल/वार्ताहर

आकर्षक व्यक्तिमत्व घडवून ऐतिहासिक वास्तूचे गाईड होण्याचा व्यवसाय उदरनिर्वाहाचा उत्तम मार्ग ठरू शकतो. असे प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक निनाद बेडेकर यांनी किल्ले शिवनेरी येथे केले. येथील सह्य़ाद्री गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने किल्ले शिवनेरीवरील गाईड प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यशाळेत श्री. बेडेकर बोलत होते.
उत्तम गाईड होण्यासाठीची दशसूत्री त्यांनी यावेळी सांगितली, सह्य़ाद्री गिरीभ्रमण संस्थेचे कार्याध्यक्ष संजय खत्री, माजी अध्यक्ष राहुल जोशी, हाय प्लसेसचे जितेंद्र हांडे, वैद्यकीय व्यावसायिक डॉ. नीलिमा जुन्नरकर, सह्य़ाद्री गिरीभ्रमणचे उपाध्यक्ष गणेश कोरे, गणेश खत्री, राकेश पांडव आदी यावेळी उपस्थित होते. उत्तम गाईड होण्यासाठीची दशसूत्री सांगताना आकर्षक व्यक्तिमत्त्व, स्थल अभ्यास, समृद्ध भाषा, टिपणवहीची सवय, स्पष्टपणा, पर्यटकांशी समन्वय, वस्तू कार्ड आदी संग्राह्य़ वस्तूंची विक्री टाळणे इतर माहिती अवगत करणे, कामाचा निर्धार आणि विषय संपादन हे पैलू जोपासले पाहिजेत असे बेडेकर यांनी सांगितले.
या कार्यशाळेतील एक सत्र व्याख्यानाच्या माध्यमातून तर दुसरे सत्र प्रत्यक्ष किल्ले भेटीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. हा एक अनोखा उपक्रम जुन्नरमध्ये होता अशी भावना यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थीनी व्यक्त केली.

‘ कष्टकरी चळवळीला अहिल्याताईंनी प्रकाश दिला’
पुणे, २० एप्रिल/ प्रतिनिधी

अहिल्याताई रांगणेकर यांचे व्यक्तित्व अत्यंत प्रसन्न, साधे आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणरे होते. त्या अत्यंत स्फूíतदायक, त्यागी, तेजस्वी आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने कष्टक ऱ्यांच्या चळवळीला प्रकाश देणाऱ्या होत्या, अशा शब्दात कम्युनिस्ट पक्षाने रांगणेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. रांगणेकर या झुंजार कम्युनिस्ट नेत्या होत्या. त्यांनी महिलांच्या दास्यमुक्तीसाठी मोठे योगदान दिले. अत्याचारांना जन्म देणाऱ्या व्यवस्थेविरोधात त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. कम्युनिस्ट पक्षाचे सचिव अजित अभ्यंकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. व्यक्तिगत जीवनात अतिशय साधेपणा, कार्यकर्त्यांबद्दल जिव्हाळा आणि चळवळीबद्दलचा उत्साह व आशादायक दृष्टिकोन असा रांगणेकर यांचा स्वभाव होता. या शब्दात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

शुभम साहित्यतर्फे प्रदर्शनात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दालन
पुणे, २० एप्रिल/प्रतिनिधी

शुभम साहित्यतर्फे आयोजित पुस्तक प्रदर्शनात उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त खास शालेय विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार मराठी, इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे स्वतंत्र दालन सुरू करण्यात आले आहे. भा. रा. भागवत, लीलावती भागवत, साने गुरुजी, ना. धो. ताम्हणकर, शांता शेळके, पु. ग. वैद्य, शांताराम कर्णिक, रमेश मुधोळकर अशा नामवंत बालसाहित्यकारांचे दर्जेदार साहित्य या दालनात उपलब्ध आहे. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे दालन विद्यार्थी व पालकांसाठी खुले आहे. तसेच पुस्तक खरेदीवर दहा ते पंचवीस टक्क्य़ांपर्यंत भरघोस सवलतही उपलब्ध आहे. अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे राजेंद्र ओंबासे यांनी केले आहे.