Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
राज्य

धर्म, जातीच्या राजकारणापासून देशाला धोका-सोनिया गांधी
धुळे, २० एप्रिल / वार्ताहर

धर्म, जात व संप्रदायाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांपासून देशाला धोका असून त्यामुळे भारतीय संस्कृती लयास जाऊ शकते, असा इशारा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिला. काँग्रेसने आजवर देशाच्या सर्वागीण विकासासाठीच्याच योजना राबविल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार अनुक्रमे अमरिशभाई पटेल व माणिकराव गावित यांच्या प्रचारार्थ दोंडाईचा येथे आज आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

मुत्तेमवार देवदर्शनाला, वासनिक दिल्लीला.. पुरोहित आदेशाच्या प्रतीक्षेत, मेघे गोव्यात
नागपूर, २० एप्रिल / प्रतिनिधी
लोकसभेच्या विदर्भातील १० जागांसाठी मतदान झाल्यानंतर पहिले दोन दिवस कोणत्या भागात किती मतदान झाले व किती मते मिळतील, याचा काथ्याकूट करणारे बहुतांश उमेदवार आता पक्षाच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. काहींनी परमेश्वराच्या आशीर्वादाचा आधार घेण्यासाठी देवदर्शनाची योजना केली आहे तर, काहींनी रिलॅक्स होण्यासाठी पर्यटनस्थळी जाण्याचा बेत आखला आहे.

निवडणुकीच्या डय़ुटीमुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प
पुणे, २० एप्रिल/खास प्रतिनिधी

पुणे विद्यापीठातील ९९७ पूर्णवेळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ७०८ कर्मचाऱ्यांना उद्यापासून निवडणुकीच्या कामावर रुजू होण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. त्यामुळेच ऐन परीक्षांच्या हंगामामध्ये विद्यापीठाचे काम ठप्प होणार असून, पदव्युत्तर विभागांबरोबरच महाविद्यालयांनाही त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्याबाबत कोर्टबाजी झाली होती.

हौतात्म्यावर शंका घेणाऱ्या अंतुलेंवर खटला भरावा’
कोल्हापूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांच्या हौतात्म्याबद्दल शंका उपस्थित करून त्यांचा अवमान करणाऱ्या बॅ. ए. आर. अंतुले यांच्याविरुध्द राज्य शासनाने खटला दाखल करावा अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय देवणे यांच्या प्रचारसभेसाठी कदम हे कोल्हापुरात आले होते.

बॅ. ए.आर.अंतुले यांना रायगडच्या ‘आमआदमी’ चा सवाल
पूर्वीच्या आश्वासनांच्या पूर्ततेचे काय झाले?

जयंत धुळप

दरवेळच्या निवडणुकीत येनकेन प्रकारे मतदारांना आकृष्ट करण्यासाठी आश्वासनांच्या फैरी झाडून विजय संपादन केल्यावर आपल्या मतदारसंघात मागे ढुंकूनही पाहिले नाही आणि यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता आता पुन्हा मतांचा जोगवा मागणारे कॉंग्रेसचे उमेदवार केंद्रीय मंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांच्यावर रायगडचा मतदारराजा तीव्र नाराज झाला असून, पूर्वीच्या आश्वासनांच्या पूर्ततेचे काय झाले, त्याचे उत्तर अंतुलेसाहेब आता मतदानापूर्वी तरी देणार का? असा सवाल येथील मतदारांचा आहे.

राणे, प्रभू यांची प्रचारात आघाडी
सावंतवाडी, २० एप्रिल/वार्ताहर

उद्योगमंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार सुरेश प्रभू यांच्या विजयासाठी शिवसेनेने प्रतिष्ठा पणास लावली आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी प्रचारात उतरले आहेत. राणे यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादी व आर. पी. आय. आघाडीसह राणेंचे अख्खे कुटुंबच डॉ. नीलेश यांच्या विजयासाठी गावोगावी फिरत आहे.

लाभार्थ्यांची खोटी सही करून घराचे पैसे लाटण्याचा प्रकार
चिपळूण, २० एप्रिल/वार्ताहर

लाभार्थ्यांची खोटी सही करून ठेकेदारामार्फत इंदिरा आवास योजनेच्या घराचे पैसे लाटण्याचा प्रकार तालुक्यातील रामपूर येथील बौद्धवाडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी लाभार्थी सुधाकर जाधव यांनी येथील गटविकास अधिकारी विजय यादव यांच्याकडे तक्रार केली आहे. मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याने निवडणुकीच्या ऐन हंगामात हे प्रकरण गाजण्याची शक्यता आहे. जाधव यांची २००७-०८ वर्षांकरिता इंदिरा आवास योजनेकरिता निवड झाली होती.

डॉ. सुधाकर पवार यांचे निधन
पुणे, २० एप्रिल/प्रतिनिधी
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, तसेच औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुधाकर पवार यांचे रविवारी रात्री येथे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते मूत्राशय विकाराने आजारी होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पवार यांचा जन्म १९४१ साली झाला होता. शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्रविद्या विभाग सुरू झाला, त्यावेळी त्यांनी सहसंचालकपदाची जबाबदारी स्वीकारली. नंतर नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ तसेच डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी बरीच वर्षे काम पाहिले. निवृत्तीनंतर काही काळ त्यांनी पुण्यातील भारतीय विद्या भवनच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचे संचालक म्हणूनही काम केले. जनसंपर्क, वृत्तविद्येवर त्यांनी बरेच लेखन केले.