Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
क्रीडा

काही सिद्ध करण्यासाठी मी क्रिकेट खेळत नाही- सचिन तेंडुलकर
केप टाऊन, २०एप्रिल/ पीटीआय

क्रिकेट हा खेळ मी कोणाला काहीही सिद्ध करून दाखविण्यासाठी खेळत नाही, तर क्रिकेटवर माझे मनापासून प्रेम असून जोपर्यंत मी खेळाचा पुरेपूर आनंद लुटतोय तो पर्यंत मी खेळतच राहीन असे मत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. लहानपणी जेव्हा क्रिकेट खेळाला सुरुवात केली तेव्हा कोणाला काहीही सिद्ध करून दाखविण्यासाठी मी मैदानात उतरलो नव्हतो. राहुल द्रविड किंवा अन्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या मनातही खेळाचा ‘श्रीगणेशा’ करताना असे काही नसेल. आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली कारण आम्ही खेळावर निस्सीम प्रेम करीत होतो.

सुरक्षेच्या कारणास्तव तटस्थ ठिकाणी सामने - नील्सन
दुबई, २० एप्रिल/पीटीआय

दक्षिण आशियायी देशांमधील तणावपूर्ण वातावरणामुळेच पाकिस्तानविरुद्ध आम्ही तटस्थ ठिकाणी सामने खेळण्यास तयार झालो, असे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक टिम नील्सन यांनी येथे सांगितले. काही वेळा परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर असते, मात्र आमच्याबरोबर पाकिस्तानचे सामने होत आहेत ही त्यांच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. तटस्थ ठिकाण निवडले नसते तर कदाचित हे सामने झाले नसते, असे सांगून नील्सन म्हणाले, पाकिस्तानला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर आणले आहे. पाकिस्तानात कोणीही जाण्यास तयार नाही.

डिसेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास तयार - जस्टीन वॉन
वेलिंग्टन, २० एप्रिल/ए.एफ.पी.
पूर्वघोषित कार्यक्रमानुसार येत्या नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यासाठी न्यूझीलंड संघ उत्सुक नाही. गेल्या महिन्यात श्रीलंकन संघावर लाहोरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दौरा करण्यास ते राजी नाहीत. मात्र डिसेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याची त्यांची तयारी असून पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका नंतर इतरत्र खेळण्यास ते उत्सुक आहेत.

आशियाई बिलियर्ड्स व स्नूकर स्पर्धा; पंकज अडवाणी, अ‍ॅन्डा झांग विजेते
पुणे, २० एप्रिल/प्रतिनिधी

भारताच्या पंकज अडवाणी याने आशियाई बिलियर्ड्स स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविताना दोन वेळा विश्वविजेत्या पीटर गिलख्रिस्ट याचे आव्हान ५-३ अशा फ्रेमने संपुष्टात आणले. २१ वर्षांखालील गटाच्या स्नूकर स्पर्धेत चीनच्या अ‍ॅन्डा झांगने अजिंक्यपद मिळविले. पीवायसी हिंदू जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अडवाणी याने १०१-५०, ८-१००, १००-२३, २०-१०१, ११-१०१, १००-८६, १००-०, १००-३९ असा विजय मिळविला.

सेंटर फॉर एक्सलन्सर इन टेबल टेनिसला तज्ज्ञांचे मार्गदर्शन
मुंबई, २० एप्रिल/क्री.प्र.

खार एज्युकेशन सोसायटीच्या श्री मुंबादेवी विद्यामंदिर आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन टेबल टेनस यांच्या वतीने खार पश्चिम येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरात, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, तंदुरुस्त आहार आणि सर्वोच्च यश संपादन करण्यासाठी लक्ष कसे केंद्रित करावे या विषयांवर विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले.

१९ वर्षांखालील क्रिकेट : आजचा दिवस दोन्हीही संघासाठी निर्णायक ठरणार
भारत सर्वबाद १६५ ऑस्ट्रेलिया ५ बाद १३६
पर्थ, १९ एप्रिल/ पीटीआय
येथील वाकाच्या वेगवान खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर फॉर्मात असलेल्या भारताच्या १९ वर्षांखालील संघाची केन रीचर्डसनने पाच विकेट्स घेत भारतीय संघाची १६५ धावांत दाणादाण उडविली. भारतीय संघ शतक पूर्ण करायच्या आतच तंबूत परतला असता पण कर्णधार अशोक मनेरियाने अर्धशतकी खेळी साकारीत संघाला सावरले.

बॉम्बे गोल्ड कप हॉकी : पंपोश उपान्त्यपूर्व फेरीत
मुंबई, २० एप्रिल / क्री. प्र.

रुरकेलातील हॉकी अ‍ॅकॅडमी च्या पंपोश इलेव्हन संघाने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करताना इंडियन ओव्हरसीज बँकेला ३-१ असे पराभूत करीत ४७व्या बॉम्बे गोल्ड कप हॉकी स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघांनी पहिल्याच सत्रात हे गोल केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ओव्हरसीज बँकेला तब्बल आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यावर त्यांना एकही गोल करता आला नाही. पंपोश संघातर्फे अमित रोहितदासने दोन तर जेम्स मुंडाने एक गोल केला. ओव्हरसीज बँकेच्या विनोद रायरने एकमेव गोल केला. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला पंपोशच्या रोहितदासने संघाला आघाडी मिळवून दिली, पण नवव्या मिनिटाला ओव्हरसीजच्या विनोदने बरोबरी साधली. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला पुन्हा एकदा रोहितदासने गोल केला.

महाराष्ट्रदिनी मलबार हिल चषक क्रिकेट स्पर्धा
मुंबई, २० एप्रिल/क्री.प्र.

मलबार हिल, बाणगंगा विभागातील मागील २९ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मलबारहिल कला क्रीडा केंद्राने विभागातील होतकरू क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिवर्षांप्रमाणे २७ वी मलबारहिल चषक २००९ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १ मे महाराष्ट्र दिन या दिवशी केले आहे.ही स्पर्धा रविवार, दिनांक २६ एप्रिल, २००९ आणि दिनांक १ मे, २००९ सकाळी ८.०० वाजता वाळकेश्वर येथे स्वातंत्र्यसैनिक एस. एम. जोशी मैदान, डुंगरशी मार्ग, सेंट एलिझाबेथ हॉस्पिटलसमोर, वाळकेश्वर येथे खेळविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी २३ एप्रिल, २००९ पर्यंत केंद्राचे अध्यक्ष प्रदीप तानावडे किंवा व्यवस्थापक नितीन ठाकरे, अनिल कानडे यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राचे सरचिटणीस प्रकाश भालेकर यांनी सर्व स्थानिक संघांना केले आहे.

वेरॉक कप क्रिकेट : प्रशांत कुमारचे शतक; आंध्रला मोठी आघाडी
पुणे, २० एप्रिल/क्री.प्र.

पिंपरी-चिंचवड येथे सुरू असलेल्या वेरॉक कप क्रिकेट स्पर्धेत डी. बी. प्रशांत कुमारच्या शतकी खेळीमुळे आंध्रने पुणे कोल्टस् विरुद्ध पहिल्या डावात २६१ धावांची आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून पुणे कोल्टस संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरवणाऱ्या आंध्रने त्यांना ५५ धावांतच गुंडाळले. व्ही. अय्यपाने २३ धावांत ८ बळी मिळवत ही करामत केली. त्यानंतर आंध्रच्या डी. बी. प्रशांत कुमार आणि जी. श्यामसुंदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागी रचली तर जी. चिरंजीवी आणि टी. वामसिकृष्णाने पाचव्या विकेटसाठी ८८ धावांची भागी रचल्याने आंध्रने पहिल्या दिवसाअखेर ८ बाद ३१६ धावा केल्या आहेत. दुसऱ्या लढतीत गोवा संघाला १६८ धावांत गुंडाळणाऱ्या बडोद्याने दिवसअखेर ४ बाद १४० धावा केल्या आहेत.

कॅरम : परमार, राठोड अंतिम फेरीत दाखल
मुंबई, २० एप्रिल/क्री.प्र.

ए. के. फाऊंडेशन आयोजित ३ ऱ्या नारायण शांताराम गोसावी स्मृती चषक १४ व १८ वर्षांखालील मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत विशाल परमार, लतेश राठोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
१४ वर्षांखालील कुमार एकेरी निकाल- उपान्त्य फेरी- विशाल परमार वि. वि. पिंकेश लकुम ६-११, १८-७, ६-२. लतेश राठोड वि. वि. अभिषेक भारती १०-०, ८-५. १८ वर्षांखालील कुमार एकेरी निकाल- उपान्त्य फेरी- राहुल सोळंकी वि. वि. शेख सज्जाद ५-७, १२-०, ९-० (सडन डेथ), राहुल कोळी वि. वि. रोशन साळवी १०-२, ८-७.
१८ वर्षांखालील कुमार एकेरी- उपउपान्त्य फेरी निकाल शेख सज्जाद वि. वि. अभिषेक दहिगांवकर ६-५, १४-५, राहुल सोळंकी वि. वि. सागर पालशेतकर ०-१२, १४-०, १४-०, रोशन साळवी वि. वि. निशांत मकवाना १२-१, १४-४, राहुल कोळी वि. वि. मोबीन शेख ११-१०, ५-६, १४-५.

कबड्डी :ओम कबड्डी, शिरोडकर स्पोर्टस् अजिंक्य
मुंबई, २० एप्रिल/क्री.प्र.

ओम कबड्डी संघ- ठाणे व डॉ. शिरोडकर स्पोर्टस् क्लब यांनी एच. जी. एस. क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे जेतेपद पटकाविले. ओम कबड्डी संघाचा प्रशांत चव्हाण पुरुषांत तर शिवशक्ती महिला संघाची गौरी वाडेकर महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. त्या दोघांना प्रत्येकी रोख रुपये ५,०००/- देऊन गौरविण्यात आले. ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व मुंबई व शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने घेण्यात आलेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात ओम् संघाने मुंबईच्या साऊथ कॅनराचे आव्हान १५-९ असे संपुष्टात आणत विजेतेपदाचा चषकासह रोख रु. २१,०००/- ची कमाई केली. साऊथ कॅनराला रोख रु. १५,०००/- वर समाधान मानावे लागले.महिलांच्या अंतिम सामन्यात डॉ. शिरोडकरने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवशक्ती संघाचा १८-१२ असा पराभव करीत जेतेपदाबरोबरच रोख रु. २१,०००/- प्राप्त केले. शिवशक्ती संघाला रोख रु. १५,०००/- प्रदान करण्यात आले.ओम् कबड्डी संघाचा गिरीश ईरनाक पुरुषांत व डॉ. शिरोडकरची कय्यल टी. महिलांत स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचे तर साऊथ कॅनराचा गौरव शेट्टी पुरुषांमध्ये व डॉ. शिरोडकरची सुजाता काळगावकर महिलांमध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचे खेळाडू ठरले