Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

पर्यावरणाच्या मुद्दय़ावर मी कोकणातील जनतेबरोबर ..
लोकसभेची निवडणूक यंदा लढविण्याची इच्छा नव्हती, परंतु मीच ही निवडणूक लढवावी, असे नियतीच्या मनात होत़े त्यामुळे आता जगातील कोणतीही ताकद मला पराभूत करू शकत नाही, असा ठाम दावा बॅ़ ए़ आऱ अंतुले यांचा आह़े राजकारणात मी मुळात आलो ते सामाजिक कार्य करण्यासाठी. त्यातून गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठीच मी आजवर काम केले आह़े केवळ १८ महिने तीन दिवसच आपल्याला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी काम करण्याची संधी मिळाली असली तरी पाच वर्षांत करायचे काम मी त्या अल्पकाळात करून दाखविले. मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील गरिबांसाठी केलेले काम विरोधकांना माहीत आहे की नाही हे मला माहीत नाही.

भौतिक सुविधांची समस्या सोडविणार..
रायगड जिल्ह्यात ज्या प्रकारे भौतिक सुविधांचा विकास होणे अपेक्षित होते, तो काँग्रेसच्या राजवटीत झाला नाही़ संपूर्ण कोकणचीच ही महत्त्वाची आणि गंभीर समस्या आह़े ती सोडविण्याचा प्रयत्न आजवर मी केला आहे आणि आता केंद्रात येऊ घातलेल्या आमच्या सरकारच्या माध्यमातून ही समस्या निश्चित सोडवू शकतो, असा विश्वास मला आह़ेमच्छिमारांच्या समस्या सुटाव्यात, यासाठी संसदेत सातत्याने पाठपुरावा करीत असताना, शेतकऱ्यांना ज्या प्रमाणे कर्जमाफी देण्यात आली, त्याचप्रमाणे मच्छिमारांना कर्जमाफी देण्यात यावी अशी आपली मागणी होती, परंतु सरकारने ती गांभीर्याने विचारात घेतली नाही.

आम आदमीच्या भल्यासाठी..
आधुनिक भारताचे आशास्थान असणाऱ्या राहुल गांधी यांनी, देशहितासाठी तरुणांनी पुढे यावे असे जे आवाहन केले, त्या आवाहनास अनुसरून कोकणात गोरगरीब, सुशिक्षित युवक, मच्छिमार बांधव, शेतकरी, कामगार, अल्पसंख्याक या सर्वाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी, मी पक्षांतर्गत नियमांप्रमाणे उमेदवारी मागितली़ प्रदेश काँग्रेसकडून माझ्या नावाची शिफारस दिल्लीला गेल्यावर ८४ वर्षांच्या नेत्यांना पुन्हा निवडणूक लढविण्याची प्रबळ ऊर्मी आली आणि त्यांनी माझे तिकीट कापून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला़

शिक्षण मंडळ घोटाळा
सखोल चौकशीचे न्यायालयाचे आदेश, संजय मोरे यांच्यासह १० जण अडचणीत
सरकारी रकमेचा अपहार

ठाणे/प्रतिनिधी :
ठाणे महापालिका शिक्षण मंडळातील बहुचर्चित कंत्राटी मदतनीस नेमणूक घोटाळ्याची सखोल चौकशी करून २२ जूनपूर्वी अहवाल सादर करा, असे स्पष्ट आदेश येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिक्षण मंडळात एकच खळबळ उडाली आहे.
पालिका शिक्षण मंडळातील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत तसेच पालिकेतर्फेही चालू आहे.

एक स्वप्न टर्मिनेट झालेले..
रेंगाळलेले प्रकल्प

ठाणे/ प्रतिनिधी

ठाण्याचा आवाज दिल्लीपर्यंत पोचवणारे दिवंगत खासदार प्रकाश पराजंपे यांची ठाणे टर्मिनसची मागणी त्यांच्या हयातीत काही पूर्ण होऊ शकली नाही. ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दीचा ताण कमी व्हावा, यासाठी ठाणे व मुलुंड दरम्यान रेल्वे स्थानक उभारण्याची सूचना दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ठाणे मनोरुग्णालय तेथून हटवून त्या जागी असलेल्या १५० एकर जागेवर नवीन ठाणे टर्मिनस उभारावे आणि घोडबंदर तसेच ठाण्याच्या इतर भागात जाण्यासाठी तेथून बसेस सोडण्यात याव्यात, अशी परांजपे यांची मागणी होती. मात्र रेल्वे खात्याच्या असहकारामुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून नेटाने मागणी न झाल्याने हा प्रकल्प रेंगाळला आहे.

राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत आता ‘हे राम!’
शशिकांत कोठेकर

कँाग्रेसचे जय हो..भाजपचे भय हो..आणि शिवसेनेचे शिवसेना.शिवसेना हे अवधुत गुप्तेच्या आवाजातील सळसळते गाणे प्रचाराच्या आधी ऐकायला मिळते. राष्ट्रवादीने मात्र गाण्यांऐवजी थेट नाटिकाच दाखवण्याचा निर्धार केला आहे. प्रचारसभांच्या आधी गांधीहत्येसारखा वादातीत विषय घेऊन तासाभराची नाटिका दाखवण्यात येणार आहे. महात्मा गांधी व नथुराम गोडसे यांच्यातील वाद त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गातही सुरू राहतो. त्या चर्चेत पं. नेहरू, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, बॅरिस्टर जिना ते सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्यात जोरदार चर्चा होते. प्रत्येक नेता आपली भूमिका गांधीजींसमोर मांडत असतो.

कोकणात कुणबी, भिवंडीत कुणीबी!
शिवसेनेचा डबल गेम

सोपान बोंगाणे

भिवंडी लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार असूनही शिवसेनेसोबत असलेले विश्वनाथ पाटील यांनी कुणबीसेनेतर्फे भाजपा उमेदवार विरुद्ध उमेदवारी कायम ठेवली आहे. एवढेच नाहीतर कोकणातील शिवसेनेच्या उमेदवारांना कुणबीसेनेचा पाठिंबाही जाहीर केला आहे. त्यामुळे भिवंडी मतदारसंघात शिवसेनेच्या भूमिकेबद्दल भाजपाच्या गोटात संभ्रम निर्माण झाला असून, भाजपाच्या एका नेत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भिवंडीसंदर्भात शिवसेना नेतृत्वाने आपली भूमिका स्पष्ट करून शिवसेना-भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांतील अविश्वासाचे वातावरण तातडीने दूर करावे, अशी भावना भाजपाच्या नेत्याने व्यक्त केली.

जातीयवादी शक्तींना खडय़ासारखे दूर करा - आर.सी. पाटील
भिवंडी/वार्ताहर

भिवंडी मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारसाठी राष्ट्रवादीच्या वतीने माणकोली नाका येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आर.सी. पाटील होते. यावेळी त्यांच्यासह तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तुळशीराम पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कपिल पाटील यांनी जातीयवादी शक्तींना खडय़ासारखे दूर करून आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

वीजपुरवठा खंडित झाल्याने वागळे परिसराला झटका
ठाणे / प्रतिनिधी

लुईसवाडी-फेरोनगर येथील मुख्य केबल जळाल्याने पहाटे तीन वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने लुईसवाडी, काजूवाडी, रामचंद्र नगर, तारांगण परिसरातील रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. पहाटे तीन वाजल्यापासून खंडित झालेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता सुरू झाला. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाडय़ाने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वीज नसल्याने अनेक इमारतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. फेरोनगर येथील केबल जळाल्याने या परिसराचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संध्याकाळी उशिरा वीजपुरवठा सुरू झाला.

‘वसुंधरा दिना’ निमित्ताने ग्लोबल वॉर्मिगवर व्याख्यान
ठाणे/प्रतिनिधी :
२२ एप्रिल हा दिवस ‘वसुंधरा दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. या निमित्ताने पर्यावरणाच्या गंभीर समस्येकडे ‘ग्लोबल वॉर्मिग’कडे सर्व लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ‘वसुंधरा दिना’च्या दिवशी जागतिक तापमान वाढीवर ग्लोबल वॉर्मिगवर प्रा. डॉ. संजय जोशी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. जागतिक तापमानवृद्धीची समस्या, परिणाम व त्यावरील आपण करू शकणारे उपाय याबद्दल ते माहिती देणार आहेत. हा कार्यक्रम ठाण्याच्या इटर्निटी मॉलच्या सहकार्याने त्यांच्याच आवारात होणार आहे. वसुंधरा दिनानिमित्त घेतलेल्या ‘वसुंधरा उवाच’ स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरणही केले जाणार आहे. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाच्या या चळवळीत सहभागी होण्यासाठी बुधवार, २२ एप्रिल रोजी सायं. ६.०० वा. इटर्निटी मॉल, तीन हात नाका, ठाणे येथे मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यावरण दक्षता मंचाने केले आहे.

विश्वनाथ पाटील यांचा ‘किसान रथ’ आजपासून धावणार
वाडा/वार्ताहर

भिवंडी मतदारसंघातील ठाणे जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी आजपासून संपूर्ण मतदारसंघात ‘किसान रथ’ फिरणार असून, या रथासोबत शेतकरी आपापली शेतीची अवजारे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, बैलगाडी इत्यादी साधने घेऊन सहभागी होणार आहेत. पाटील यांनी या मतदारसंघात राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केले असून, प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. प्रचारात आपण कुठेही कमी नाही आणि मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी किसान रथाचे आयोजन केल्याचे पाटील यांनी सांगितले. किसान रथाच्या माध्यमातून ठिकठिकाणी ३५ प्रचारसभा घेण्यात येणार आहेत. शहापूर, भिवंडी तालुक्यातील ३०० हून अधिक प्रकल्पग्रस्तांना विश्वनाथ पाटील यांच्या आंदोलनामुळे नोकऱ्या मिळाल्याने प्रकल्पग्रस्त व त्यांचे नातेवाईक, तसेच पॉवर ग्रीड, गेल इंडिया, रिलायन्सच्या गॅप पाइप लाइनमुळे जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना कुणबी सेनेच्या आंदोलनामुळे मोठय़ा प्रमाणात भरपाई मिळाल्याने येथील शेतकरीही या रथयात्रेत सहभागी होणार आहेत. मंगळवारी पाली, ता. वाडा येथून निघणाऱ्या या किसान रथाचा समारोप २५ एप्रिल रोजी भिवंडी येथे एका जाहीर सभेने होणार असल्याची माहिती कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष पी.जी. सावंत यांनी दिली.

डावखरे यांच्या प्रचारासाठी येणार नेते-अभिनेते
ठाणे/प्रतिनिधी

काँग्रेस आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री नारायण राणे, मार्गारेट अल्वा, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदी नेतेमंडळींबरोबरच सलमान खान, गोविंदा आणि श्रीदेवी यांच्यासारखे अभिनेते-अभिनेत्री, तसेच अदनान सामी, वैशाली सामंत या गायक-गायिकाही येणार आहेत. २३ एप्रिलनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील हेही डावखरे यांचा प्रचार करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात तळ ठोकणार आहेत, अशी माहिती राकाँचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद हिंदुराव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याशिवाय खा. सुप्रिया सुळे, खा. निवेदिता माने, राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील, राकाँचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी, डॉ. शोभाताई बच्छाव, गोविंदराव आदिक, रिपाइंचे रामदास आठवले आदी नेते डावखरे यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. अभिनेते-अभिनेत्री मंडळी रोड शो करणार आहेत. श्रीदेवी २४ एप्रिल, तर २७ एप्रिलला गोविंदा रोड शो करणार आहेत.
दरम्यान, अंबरनाथ येथील जमियतुल उलमाए या मुस्लिमांच्या संघटनेने वसंत डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या संघटनेचे अध्यक्ष हाजी सागीर खान यांच्या नेतृत्वाखालील नऊ सदस्यांच्या शिष्टमंडळाने डावखरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले.