Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
व्यक्तिवेध

सत्शील, मृदू स्वभाव, कोणतीही गोष्ट शांतपणे पटवून द्यायची हातोटी आणि सोपी भाषा हे त्यांचे गुण. पत्रकारांकडे सहसा न आढळणारी सोशिक वृत्तीही त्यांच्याकडे होती. डॉ. सुधाकर पवार मूळचे नाशिकचे. ‘गावकरी’ दैनिकात अगदी छोटय़ा म्हणजे कल्पनाही करता येणार नाही, अशा हुद्यावरून काम करीत शिक्षण मिळविणारे पवार पुढे त्याच दैनिकात वृत्तसंपादक आणि नंतर कार्यकारी संपादक बनले. अनेक अग्रलेख त्यांनी लिहिले. एम.ए. केल्यानंतर अनेक वर्षे शिवाजी

 

विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात व त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात विभागप्रमुख म्हणून काम पाहिल्यावर त्यांनी पुण्याच्या नानासाहेब परुळेकर कॉलेज ऑफ जर्नालिझमच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आणि तिथूनच ते निवृत्त झाले. शिवाजी विद्यापीठात असतानाच डॉ. ह. कि. तोडमल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १६५० ते १७५० या कालखंडातल्या मराठेशाहीतील पत्ररूप गद्याचा अभ्यास करून त्यावर डॉक्टरेट संपादन केली. डॉ. पवार हे पत्रपंडित श्री. रा. टिकेकर यांच्या विचारांशी समरस झालेले असे त्यांचे लाडके विद्यार्थी होते आणि गुरू या नात्याने आपल्या विद्यार्थ्यांविषयी त्यांना तेवढेच ममत्व होते. डॉ. पवार नाशिक, पुणे, औरंगाबाद वा कोल्हापूर यापैकी कोणत्याही शहरात असले तरी आपल्या विद्यार्थ्यांचा विसर कधी त्यांना पजत नसे. विद्यार्थीही त्यांच्या विनम्र स्वभावाने नेहमीच भारावून गेलेले असायचे. अपार कष्ट आणि जिद्द ही दोन्ही गुणवैशिष्टय़े होती. विद्यार्थ्यांबरोबर सहलीच्या आनंदात रमून जाणारे पवार सर जाता जाता सहजपणे विद्यार्थ्यांना तो तो विषय समजावून देत असत. त्यांचा स्वभाव कधी कधी मिस्किलही बने, पण आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या विद्यार्थ्यांलादेखील न दुखावण्याची काळजी ते घेत. १९९१ नंतर डॉ. पवार यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे संचालकपद भूषविताना या संपूर्ण अभ्यासक्रमाला एक दिशा दिली. ग्रामीण भागात पत्रकारिता करणाऱ्या वार्ताहराला बातमी म्हणजे काय हे समजले पाहिजे, त्याला बातमी लिहिता आली पाहिजे, ती फोनवरून वाचावी कशी, बातमीची तातडीची अंगे कोणती हे त्याला कळले पाहिजे, या दृष्टीने त्यांनी हा अभ्यासक्रम तयार केला आणि त्यासाठी वृत्तपत्राच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंतांकडून लिखाणही करवून घेतले. दहावी-अकरावीपर्यंतच शिकलेल्या खेडुतालाही बातमी लिहिता यावी, या उद्देशाने त्यांनी हाती घेतलेला हा उपक्रम कमालीचा यशस्वी झाला. डॉ. पवार यांनी स्वत:ही या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र ग्रंथलेखन केले. ‘उपसंपादकाचा सोबती’, ‘संवादशास्त्र’, ‘वृत्तपत्र व्यवसाय : काल आणि आज’, ‘वृत्तपत्रांची सामाजिक जबाबदारी’, ‘वृत्तपत्रांचे तत्त्वज्ञान’, ‘मराठी संवादकौशल्य’ या वृत्तपत्रांशी संबंधित विषयांखेरीज ‘भारतभाग्यश्री इंदिरा गांधी’, ‘सप्तशृंगी देवी’, ‘नाशिक तीर्थदर्शन’, ‘भारतीय इतिहासाचे मानकरी’, ‘कर्मवीर भाऊसाहेब हिरे’, ‘समाजवादी देशातील युवक चळवळीचा इतिहास’ आदी असंख्य विषयांवर त्यांनी ग्रंथलेखन केले आहे. माणसे आणि ग्रंथ जोडणे हा त्यांचा छंद होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व चिंतनशील होते परंतु उगाचच धीरगंभीर पणाचा आव त्यांनी कधी आणला नाही. अतिशय धार्मिक होते, पण आपण देवळात गेलो म्हणजे इतरांनी तिथे आलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह नसे. त्यांच्या शिकवण्याला अनुभवाची जोड होती, पण मी अमुक केले, असे त्यांच्या बोलण्यातून कधीही डोकावत नसे. श्री. रा. टिकेकर यांच्याबरोबरच वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, ग. वि. अकोलकर, वि. वा. अंबेकर आदींनी आपले जीवन सुसहय़ करण्यास हातभार लावला, असे ते म्हणत. पुण्यात त्यांनी ग्रंथलेखनात स्वत:ला वाहून घेतले होते. तथापि नियतीला हेही घडू द्यायचे नव्हते. त्यांच्या अकस्मात निधनाचा धक्का त्यांच्या विद्यार्थ्यांना जसा आहे, तसा तो त्यांच्या वाचकांनाही आहे. राजकारणापासून पर्यावरणापर्यंत आणि संत तुकाराममहाराजांपासून तुकडोजीमहाराजांपर्यंत सर्वावर श्रद्धा असणारे विनयशील व्यक्तिमत्त्व त्यांच्या निधनाने आपल्यातून गेले आहे.