Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

सुलोचनाबाईंच्या चित्रपटातील गाजलेली गीते
डॉ. सुलभा पंडित

स्थानिक ‘स्वराली’ आता संगीत क्षेत्रात चांगली स्थिरावलेली संस्था गणली जाते. गेली सतरा वर्षे सातत्याने विविध कार्यक्रम संस्थेने रसिकांसाठी तयार केले आहेत. महिलांचा वाद्यवृंद ही त्यांची फार मोठी कामगिरी आहे. केवळ महिलांनी, महिलांसाठी तयार केलेले आणि महिलांचेच असलेले हे हक्काचे व्यासपीठ आहे. वृंदवादन ही त्यांच्या कार्यक्रमांची प्रमुख ओळख तर आहेच पण, त्याबरोबर काही गाणाऱ्या महिलांकडून त्या विविध कल्पनांवर आधारित असे सुगम संगीताचे, उपशास्त्रीय संगीताचे कार्यक्रमही देत असतात.

‘पंचशील’मुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल -भन्ते संघवंस
चंद्रपूर जिल्हा कारागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

चंद्रपूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संघर्ष हा अटळ आहे. हिंसा, रक्तपात आणि गुन्हेगारीशिवाय संघर्ष करून मनुष्य आयुष्यात यशस्वी होऊ शकतो हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी दिलेल्या पंचशील तत्त्वाचा उपयोग केला तर गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन भन्ते संघवंस यांनी केले.

भारिप-बमसं उमेदवाराकडून फसवणूक; जिल्हाध्यक्षाचा आरोप
गडचिरोली, २० एप्रिल / वार्ताहर

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे भारिप बहुजन संघाचे उमेदवार दिवाकर पेंदाम यांनी या मतदारसंघातील मतदार, कार्यकर्ते व आदिवासी स्वायत्त परिषदेच्या कार्यकर्त्यांची फसवणूक व दिशाभूल केली, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी प्रा. प्रकाश दुधे, परमानंद मेश्राम, जगन जांभुळकर, प्रा. चांदेकर, बाळू टेंभूर्णे, नसीर जुम्मन शेख, रामटेके आदी उपस्थित होते.

मंगळसूत्र पळवणारे गजाआड
भंडारा, २० एप्रिल / वार्ताहर

शहरात एकाच आठवडय़ात दागिने पळवण्याचे चार गुन्हे करणाऱ्या चोरटय़ांना गुन्हे प्रगटीकरण शाखेने शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. भंडारा शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातून लग्नासाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गळसरी ओढून नेण्याचा प्रयत्न करताना महिलेने प्रसंगावधान राखल्याने काही सोन्याचे मणी पळवण्यात चोरटे यशस्वी झाले होते. त्यानंतर जकातदार कन्या शाळेच्या परिसरात शिक्षिकेचे मंगळसूत्र पळवण्याची घटना घडली. यामुळे महिलांचे दागिने पळवणारी टोळी शहरात सक्रिय झाल्याची भीती व्यक्त होत होती.

डॉ. अशोक बावस्कर यांची लॉयन्स प्रांतपालपदी निवड
खामगाव २० एप्रिल / वार्ताहर

लॉयन्स क्लब इंटरनॅशनल संस्थेच्या प्रांतपाल पदी येथील हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. अशोक बावस्कार यांची नुकतीच निवड झाली. अमेरिकेत १९१७ साली प्रारंभ झालेल्या लॉयन्स क्लबचे १९५६ मध्ये भारतात आगमन झाले व त्यानंतर मागील ५३ वर्षांमध्ये भारतभर सेवाकार्याचा प्रचार व प्रसार झाला. खामगाव शहरात लॉयन्सची स्थापना १९६७ मध्ये झाली तेव्हापासून तर आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्य़ातील कुठल्याही लॉयन्स सदस्यास प्रांतपाल पदाचा मान मिळाला नव्हता.

‘जॅकपॉट’ लागलेल्या गजानन ढगेंना छदामही मिळाला नाही
खामगाव, २० एप्रिल / वार्ताहर

३ कोटी ३८ लाख रुपयाचा ‘जॅकपॉट’ लागून ८ महिने उलटले तरीसुद्धा एक छदामही भाग्यवान विजेता गजानन ढगे यांना मिळाला नाही. त्यामुळे ढगे हे केवळ नावालाच करोडपती ठरले आहेत. शेगाव तालुक्यातील चिंचोली येथील गजानन रामहरी ढगे (४७) यांनी ओम लॉटरी सेंटर येथून ३ ऑगस्ट २००८ ला ६० रुपयाची ६ तिकिटे काढली होती. या तिकिटाला ३ कोटी ३८ लाखाचे बक्षीस लागले होते. त्यावेळी ढगे यांचा सर्वत्र गौरव करण्यात आला होता. या बक्षीसासाठी ३० दिवसाच्या आत दावा सादर करावा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ढगे यांनी केवळ १० दिवसातच दावा सादर केला. १८ ऑगस्ट ०८ ला ते ओम लॉटरी सेंटरचे मनीष खेतान यांच्यासह मुंबई येथे जाऊन ‘प्लेवीन’चे उदय थावन यांना भेटले होते. त्यावेळी ९० ते १२० दिवसात कर कपात करून बक्षीसाची रक्कम दिली जाईल, असे सांगण्यात आले. या घटनेला आज ८ महिने उलटूनही त्यांना बक्षीसाच्या रकमेतील एक पैसाही मिळाला नाही. उलट संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असे त्यांनी सांगितले. ढगे यांनी अखेर बुलढाणा येथील अॅड. अशोक सावजी यांच्यामार्फत ‘प्ले विन’च्या मुख्य कार्यालयाला याबाबत नोटीस पाठवली आहे.

नागपूरला वक्फ मंडळाचे शिबीर
भंडारा, २० एप्रिल / वार्ताहर

राज्य वक्फ मंडळाचे एक दिवसाचे शिबीर नागपूर येथे येत्या शुक्रवारी २४ एप्रिल ला मुस्लीम लायब्ररी सदर येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.
शिबिरात वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. अली कादरी उपस्थित राहणार आहेत. शिबिरात नोंदणी, तक्रारी, कर वसुली तसेच प्रलंबित प्रकरणांची सुनावणी होणार आहे. ज्यांना संस्था नोंदणीकृत करावयाच्या आहेत किंवा व्यवस्थापनासंबंधी बदल अहवाल सादर करावयाच्या आहेत अथवा निवेदन द्यावयाचे आहेत त्यांनी शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात वक्फ संदर्भातील विविध प्रश्न व समस्या मार्गी लावण्यात येतील.

खामगावात दारूनेणाऱ्यास पकडले
खामगाव, २० एप्रिल / वार्ताहर

अवैधरीत्या दारू नेणाऱ्या एकास पोलिसांनी पकडले तर एक जण पसार झाला. त्याच्याकडून पोलिसांनी दोन दुचाकीसह ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सेवानंद वानखडे गस्तीवर असताना त्यांना आठवडी बाजार येथे सूरज संपतराव गावंडे (२०) हा अवैधरीत्या देशी दारू नेताना आढळून आला. त्याच्याजवळून पोलिसांनी १० देशी दारूच्या शिशा व एलएमएल लिबेरो दुचाकी (क्र.एम.एच. २८ के ९७८) किंमत ३० हजार रुपये असा एकूण ३० हजार २७० रुपयाचा ऐवज जप्त केला. दुसऱ्या घटनेत वसंतवाडी भागात कायनेटीक लुना (क्र. एमएच २८/एच ३०७६) वर एका थैलीत देशी दारूच्या शिशा आढळल्या. हा दुचाकीस्वार पसार झाला. यात पोलिसांनी देशी दारूच्या ३० शिशा (किंमत ७५० रुपये) थैली व दुचाकी असा एकूण ३७७० रुपयाचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बबनराव नकाशे यांचे अपघाती निधन
पुलगाव, २० एप्रिल / वार्ताहर

वर्धा जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बबनराव नकाशे यांचे अमरावती मार्गावर कार उलटून झालेल्या अपघातात निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अमरावतीहून परत येत असताना चांदूरजवळ त्यांची कार उलटून हा अपघात झाला. त्यांच्यावर येथील पंचधारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील आर.के. विद्यालयाच्या प्रा. प्रमिला नकाशे यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. स्मशानभूमीवर दिलीप अग्रवाल, सुनील राऊत, बालकिशन तिरडीवाल यांनी आदरांजली वाहिली.

सामूहिक सोहोळ्यात १० जोडपी विवाहबद्ध
बुलढाणा, २० एप्रिल / प्रतिनिधी

विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाज ॠणातून मुक्त होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. समाजामुळेच व्यक्ती मोठा होतो, असे प्रतिपादन कुणबी विकास मंडळाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दयाराम वानखडे यांनी केले. सामूहिक विवाह सोहोळ्यात ते बोलत होते.
पांडुरंग कृपा कुणबी समाज भवनात हा कुणबी समाज सामूहिक विवाह सोहोळा सुमारे २० हजार समाजबांधवांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला. सोहोळ्यात १० जोडपी विवाहबद्ध झाली. या प्रसंगी आमदार डॉ. संजय कुटे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अविनाश दळवी, कुणबी विकास मंडळाचे सचिव रमेश तिव्हाणे, सुरेश बनारे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस विजय काटोले, भाजप तालुकाध्यक्ष विजय भालतडक, शहराध्यक्ष राजेंद्र शेगोकार, कुणबी विकास मंडळाचे संचालक ज्ञानेश्वर इंगळे, अरुण कंकाळ, भारत कंकाळ, शांताराम तेल्हारकर, श्रीधर ठाकरे, वासुदेव धुमाळे, सुरेश गव्हाळ, वासुदेव राऊत, भानुदास इंगळे, भानुदास भांगे, सुनील इथोळ, टी.के. मानकर, आत्माराम वानखेडे, अजय वानखडे, सुधाकर कराळे, श्रीराम इंगळे उपस्थित होते. सकाळी १० वाजतापासून जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. यावेळी ४० क्विंटल गव्हाची पोळी, १५ क्विंटल साखरेची बुंदी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्वयंपाक करण्यात आला होता. तर उत्कृष्ट नियोजनाने या विवाह सोहोळ्याने आदर्श निर्माण केला.

पोषण आहार भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
बुलढाणा, २० एप्रिल / प्रतिनिधी

पोषण आहारात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी अधिकारी व मुख्याध्यापकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पळसखेड येथील नंदकुमार पालवे यांनी चिखली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
चिखली पंचायत समितींतर्गत येणाऱ्या थोडप येथील केंद्रीय मराठी पूर्व माध्यमिक शाळेतील पोषण आहारात गैरव्यवहार झाल्याची तक्रार २६ डिसेंबर २००८ ला करण्यात आली होती. हे प्रकरण २३ जानेवारी २००९ ला चौकशीसाठी चौकशी अधिकारी बी.टी. ढंगारे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणाबाबत चौकशीची तारीख व वेळ तक्रारकर्त्यांस कळवण्यात यावी, अशा स्वरूपाचे प्रशासनाचे आदेश असतानाही ढंगारे यांनी २८ जानेवारीपूर्वी चौकशी तर केलीच नाही, शिवाय वेळ व तारीख न कळवताच आपल्या अनुपस्थितीत चौकशी केल्याचा आरोप पालवे यांनी केला आहे. त्यामुळे हा अहवाल मान्य नसून, या प्रकरण चौकशी अधिकारी व मुख्याध्यापकाविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

क्षयरोगावर नियंत्रण शक्य -डॉ. खंडाळे
ब्रह्मपुरी, २० एप्रिल / वार्ताहर

क्षयरोगावर वेळीच उपचार केल्यास हा रोग त्वरित नियंत्रणात येऊ शकतो, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी.वाय. खंडाळे यांनी स्पष्ट केले. ग्रामीण रुग्णालयात क्षयरोगजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. अन्सारी हे होते. याप्रसंगी बोलताना डॉ. खंडाळे यांनी क्षयरोग हा असाध्य असा रोग नसून त्यावर योग्य उपचार केल्यास मात करणे शक्य असल्याचे सोदाहरण पटवून दिले. डॉ. अन्सारी यांनी क्षयरोग झाल्यास त्यावरील त्वरित उपाययोजनेबद्दल माहिती दिली. याप्रसंगी डॉ. मेंढे व डॉ. शेख यांनी ‘डाट औषधोपचार’ याबाबतीत माहिती दिली. या कार्यक्रमाला रुग्ण, नागरिक व कर्मचारी उपस्थित होते.

धाबेकरांच्या विरोधात पत्रक वाटणाऱ्याविरुद्ध गुन्हा
अकोला, २० एप्रिल / प्रतिनिधी

अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब धाबेकर यांच्याविरोधात पत्रक वाटणाऱ्याविरुद्ध पातूर पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला. बाबासाहेब धाबेकरांच्या विरोधात लिहिलेले उर्दू भाषेतील पत्रक पातूरमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी वाटण्यात आले होते. पातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष कमरुद्दीन सय्यद इस्माईल यांनी यासंदर्भात पातूर पोलिसांकडे तक्रार केली हेाती. पातूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सय्यद कमरुद्दीन यांनी केली आहे.