Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
विविध

शिक्षणसंस्थांतील रॅगिंग रोखण्यासाठी आठवडाभरात केंद्रीय संस्थेची स्थापना
नवी दिल्ली, २० एप्रिल/पीटीआय

शिक्षणसंस्थांमधील रॅगिंगचे प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी देखरेख करण्याकरिता येत्या आठवडाभरात एक केंद्रीय संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. सिनिअर विद्यार्थ्यांनी मद्यधुंद होणे व त्यानंतर त्यांनी केलेले रॅगिंगचे प्रकार यावर प्रकाशझोत टाकणारा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला नुकताच सादर करण्यात आला.

प्रभाकरन संबंधातील भूमिकेबाबत करुणानिधी यांचे अचानक घूमजाव
एलटीटीई दहशतवादी संघटना असल्याचे मान्य
चेन्नई, २० एप्रिल/पीटीआय
‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम’ या दहशतवादी संघटनेचा सर्वेसर्वा व्ही. प्रभाकरन याच्याविषयी काल रविवारी केलेल्या वादग्रस्त विधानाविषयी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी अचानक घूमजाव केले व तो लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम ही दहशतवादी संघटना असल्याचे मान्य केले.

उत्तर प्रदेशमधील शाळा बनत आहेत मदरसे ; केंद्राने अहवाल मागविला
नवी दिल्ली, २० एप्रिल/पी.टी.आय.

गेल्या दोन महिन्यांपासून विशेष फायदे मिळविण्यासाठी राज्यातील अनेक खासगी शाळा मदरशांमध्ये परिवर्तित करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणल्यामुळे केंद्राने उत्तर प्रदेश सरकारकडून याबाबतचा अहवाल मागविला आहे. खासगी शाळांचे मदरसे होत असल्याच्या वृत्ताचा गांभीर्याने विचार करीत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याबाबत राज्यसरकारला तातडीने चौकशीचे तसेच सत्य परिस्थितीचा अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

अमेरिकी वार्ताहर रुक्सानाला न्याय्य वागणूक देण्याचे इराणच्या अध्यक्षांचे आदेश
तेहरान, २० एप्रिल/पीटीआय
अमेरिकेची पत्रकार महिला रुक्साना साबेरी हिला हेरगिरीच्या आरोपावरून इराणमध्ये आठ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर इराणचे अध्यक्ष महमूद अहमदिनेजाद यांनी तिला न्याय्य वागणूक देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. अमेरिकेने मात्र रुक्सानावरील आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणशी सहकार्याचा हात पुढे केला असतानाच हे प्रकरण घडल्याने दोन्ही देशांमधील संबंधात काहीशी कटुता आली आहे.

‘भारत-स्पेन व्यापारासाठी ठोस वाव’
सुनील चावके
माद्रिद, २० एप्रिल

जागतिक मंदी आणि आर्थिक अडचणीच्या काळात भारत आणि स्पेनसाठी व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात भरपूर व ठोस संधी असल्याचे प्रतिपादन आज राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील यांनी केले. स्पेन आणि पोलंडच्या एक आठवडय़ाच्या दौऱ्यासाठी दिल्लीहून रवाना झाल्यानंतर एअर इंडिया वन या विशेष विमानात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. स्पेनची राजधानी माद्रिद येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी राष्ट्रपती पाटील यांचे आगमन झाले.

‘बिग बी’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उपटले प्राप्तिकर विभागाचे कान
नवी दिल्ली, २० एप्रिल/पीटीआय

२००१-०२ या कालावधीत ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक या नात्याने मिळालेल्या ६.९० कोटी रुपये मेहेनतान्यापैकी ३० टक्के रक्कम ही स्वत:च्या सुरक्षा व्यवस्थेवर खर्च झाल्याचा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी केलेला दावा मागे घेण्यास त्यांना परवानगी कशी काय दिली, असा खडा सवाल उपस्थित करून सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागाचे आज कान उपटले.

आसाममध्ये पोलीस चकमकीत १२ ठार
गुवाहाटी, २० एप्रिल/पी.टी.आय.

आसाममध्ये दोन ठिकाणी झालेल्या पोलीस चकमकीत किमान १२ जण ठार झाले असून यामध्ये ५ अतिरेक्यांचा समावेश आहे. आसामच्या सेनापती जिल्ह्णाात पहाटे १ पासून सुरू झालेल्या एका चकमकीत पाच अतिरेकी ठार झाले. या मध्ये तीन बोडो अतिरेक्यांचा तर दोन मुस्लिम अतिरेक्यांचा समावेश आहे. अतिरेक्यांकडून पोलिसांनी मोठय़ा प्रमाणावर दारुगोळा जप्त केला. अन्य एका घटनेत आसाम पोलिसांचे पाच जवान व दोन नागरिक अतिरेक्यांना केलेल्या गोळीबारात प्राणाला मुकले.

हॉटेलमध्ये सापडला ऑस्ट्रेलियाच्या पर्यटकाचा मृतदेह
नवी दिल्ली, २० एप्रिल/पी.टी.आय.

मध्य दिल्लीमधील पहाडगंज भागातील एक्स्प्रेस हॉटेलमध्ये ३३ वर्षीय ऑस्ट्रेलियाचा पर्यटक ज्युलियन स्टॅनफोर्ड मृतावस्थेत आढळून आला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मूळचा सिडनी शहराचा रहिवासी असून चार एप्रिल रोजी तो भारतात आला आहे. शुक्रवारपासून तो एक्स्प्रेस हॉटेलमध्ये राहात होता. स्टॅनफोर्ड याने आपल्या ऑस्ट्रेलियाला परत जाणाऱ्या मैत्रिणीला निरोप देण्यासाठी रविवारी सकाळीच हॉटेल सोडले होते. तिला सुखरूप विमानतळावर सोडल्यानंतर तो पुन्हा हॉटेलमध्ये आला. रात्रीच्या सुमारास त्याच्या रुममधून काही आवाज ऐकू न आल्याने ती उघडण्यात आली असता तोंडातून फेस येत असलेला स्टॅनफोर्ड बेशुध्दावस्थेत आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, पण तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालविली होती.

मुंबई हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानात सहाव्या संशयिताला अटक
लाहोर, २० एप्रिल/पी.टी.आय.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानने सहाव्या संशयिताला अटक केली असल्याची माहिती पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी दिली. ज्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारताने लवकरात लवकर त्यांच्याबाबत पुराव्यासह माहिती द्यावी अशी मागणीही रहमान यांनी केली. ज्या सहाव्या संशयिताला अटक करण्यात आली त्याचे नाव व इतर माहिती मात्र त्यांनी जाहीर केली नाही. लष्कर-ए-तय्यब्बा या दहशतवादी संघटनेच्या झाकी-ऊर-रहमान लखवी, झरार शाह, हमद अमीन सादिक, अबू अल कामा आणि शाहीद जमील रियाझ या पाच जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. जोपर्यंत भारत त्यांच्याविषयी ठाम आणखी माहिती देत नाही तोपर्यंत पाकिस्तान त्यांना शिक्षा ठोठावू शकत नाही. त्यांच्याविषयी आणखी पुरावे आणि अजमल अमीर कसाबचा कबुलीनामा भारताने पाकिस्तानच्या हाती सुपूर्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्याच्या मुलाच्या विवाह समारंभात पत्रकारांशी ते बोलत होते.

काँग्रेसमुळे नव्हे, तर जनतेमुळे केंद्रात मंत्री; लालूंचा टोला
पाटणा २० एप्रिल/पीटीआय

मी काँग्रेसमुळे नव्हे तर लोकांच्या जनादेशामुळे केंद्र सरकारमध्ये मंत्री आहे असे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आज सांगितले. लालूप्रसाद यादव यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी काँग्रेसने केली आहे त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लालूप्रसाद यादव यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी बिहारमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिलकुमार शर्मा यांनी केली आहे, त्यावर छेडले असता लालूप्रसाद म्हणाले की, काँग्रेसच्या कृपेमुळे मी केंद्रात मंत्री आहे असे नाही, लोकांचा जनादेश मिळाला असल्यानेच मला मंत्रिपद मिळाले आहे. आता तुम्ही जा आणि मला काम करू द्या असे लालू या वार्ताहरांना म्हणाले व नंतर झारखंडमध्ये जाण्यासाठी विमानात बसले. काँग्रेस पक्षावर सतत टीका करीत असल्याने राजद प्रमुख लालूप्रसाद यादव व लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पास्वान यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शर्मा यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. लालू व पास्वान यांना मंत्रिमंडळातून हाकलावे या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस एक प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविणार आहे असे शर्मा यांनी सांगितले होते.

भडक वक्तव्ये न करण्याची वरुण गांधी यांची हमी
नवी दिल्ली, २० एप्रिल/पीटीआय

जातीय सलोखा बिघडविणारे कोणतेही भडक वक्तव्य पॅरोलच्या काळात करणार नसल्याची हमी देणारे प्रतिज्ञापत्र भाजपचे नेते वरुण गांधी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाला सादर केले. यासंदर्भात वरुण गांधी यांचे वकील संदीप कपूर यांनी सांगितले की, सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गेल्या १६ एप्रिल रोजी दिलेल्या निर्देशानूसार वरुण गांधी यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले.
जातीय विद्वेष पसरविणारी भाषणे केल्याप्रकरणी वरुण गांधी यांना रासुकाखाली अटक करण्यात आली होती. त्यांची दोन आठवडय़ांच्या पॅरोलवर गेल्या १६ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली. पॅरोलच्या काळात जातीय विद्वेष पसरविणारी वक्तव्ये करणार नाही अशी हमी वरुण गांधी यांनी इटाह पोलिसांना तसेच न्यायालयाला द्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

स्टीफन हॉकिंग आजारी
लंडन, २० एप्रिल/पीटीआय
प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे आजारी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना छातीत संसर्गाचा त्रास जाणवत आहे. ६७ वर्षे वयाच्या हॉकिंग यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळली आहे. कृष्णविवरांसंदर्भात स्टीफन हॉकिंग यांनी केलेले संशोधन जगप्रसिद्ध आहे. हॉकिंग हे वयाच्या २१ व्या वर्षी अ‍ॅमोट्रोफिक लॅटरल स्केरोसिस (एएलएस) या विकाराने ग्रस्त झाले होते.