Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

कर्तृत्वाला उधाण येईल
दशमात गुरू, राहू, पंचमात शनी यांच्या प्रतिक्रियांना रविवारच्या चंद्र-गुरू युतीपासूनच व्यापक आकार मिळत राहील. मेष, सूर्य कर्तृत्वाला उत्थान देणार असून, मेष, वृषभ राशीतील बुधाचे भ्रमण शब्द शक्तीमधून बरीच प्रकरणे मार्गी लावण्यास उपयुक्त ठरेल; परंतु शुक्र, मंगळ व्ययस्थानी असेपर्यंत प्रपंचातले प्रश्न आणि वाढते खर्च यांचा मधून मधून त्रास होत राहील. शुक्रवार- शनिवार यांच्यावर अमावस्येची छाया असल्याने नवी कृती टाळा. राजकारणात सावधपणेच वाटचाल करावी. तरीही अनेक प्रकरणे मार्गीही लागतील. छोटे-मोठे प्रवास संभवतात. भक्तिमार्गातून आध्यात्मिक आनंद मिळेल.
दिनांक - २०, २१, २४, २५ शुभकाळ.
महिलांना- प्रयत्नांत कसूर नको.

प्रवासाला वेग येईल
भाग्यात गुरू, राहू, लाभात शुक्र-मंगळ सहयोग, गुरुवारी बुध राशीस्थानी प्रवेश करील. याच ग्रहांचा प्रभाव मंगळवारच्या शुक्र-मंगळ युतीमुळे मजबूत होईल आणि वृषभ व्यक्तींचा प्रवास सर्वत्र वेगाने सुरू होईल. प्रपंचातील प्रसन्नता, प्राप्तीतली शक्ती, प्रयत्नांत नवा उत्साह निर्माण करतील. कला, साहित्य, विज्ञान, व्यापार आदी क्षेत्रांत दबदबा निर्माण करणाऱ्या घटना घडतील. शनिवारी चंद्र-रवी युती होत असल्याने आश्वासने आणि लिखापढीच्या व्यवहारात कोणत्याही कारणास्तव बेसावध राहू नका. सगळ्याच क्षेत्रांमध्ये सबुरीने निर्णय घेणे फायद्याचे ठरेल. बढतीचे योग संभवतात. दूरचे प्रवास होतील.
दिनांक- २० ते २३ शुभकाळ.
महिलांना- कार्य गुणिले प्रयत्न बरोबर यश याचा प्रत्यय सतत येत राहील.

समीकरणे सुटतील
पराक्रमी शनी, दशमात शुक्र, मंगळ, मेष, सूर्य यातून व्यवहाराची समीकरणे सोडवता येतील. अर्थप्राप्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा यांना नवे रूपही देता येईल. अष्टमात गुरू, राहू आहे, व्ययस्थानी बुधाचा प्रवेश होणार असल्याने आश्वासन ते कृती यामध्ये कोठेही अतिशयोक्ती करू नका. त्यामुळे शुक्र-मंगळ युतीचा लाभ प्रपंच ते प्राप्तीपर्यंतच्या बहुतेक वर्तुळात मिळवता येईल.
दिनांक- २० ते २५ शुभकाळ.
महिलांना- अपेक्षा सफलतेचा आनंद मिळेल.

बस्तान झकास बसेल
भाग्यात शुक्र, मंगळ, दशमात सूर्य, सप्तमात राहू आणि मेष, वृषभ राशीतील बुधाचे भ्रमण याच ग्रहांमुळे साडेसातीचे दुष्परिणाम नियंत्रणात ठेवून नव्या नव्या आघाडय़ांवर कर्क व्यक्तींना आपले बस्तान झकास बसवता येणार आहे. रविवारच्या चंद्र-गुरू युतीपासून त्याचा प्रत्यय शिक्षण, विज्ञान, कला, व्यापार यामध्ये येत राहील. मंगलकार्ये ठरतील. नव्या उद्योग केंद्राचे नियोजन करता येईल. शनिवारच्या चंद्र-रवी युतीने शब्द कृतीत अडकू नयेत यासाठी सतर्कता बाळगा.
दिनांक- २२ ते २५ शुभकाळ.
महिलांना- कला- साहित्यात श्रेष्ठत्व सिद्ध होईल.

करावे एक, अनुभव भलताच
साडेसाती आहे आणि अष्टमात शुक्र, मंगळ आहे. त्यात गुरू, राहूचा असहकार सुरू असल्याने करावे एक व्हावे भलतेच, अशाच प्रकारचे अनुभव येत राहतील. मात्र विचलित होऊ नका. प्रयत्न सोडू नका. देवावर विश्वास ठेवा. भाग्यांत सूर्य आणि भाग्य दशमातील बुध भ्रमणातून होणारा युक्ती पुरवठा प्रतिष्ठेला संरक्षण देऊन नियमित उपक्रम सुरू ठेवण्यास उपयुक्त ठरणारा आहे. अपूर्ण माहिती आणि आश्वासन यांच्या विश्वासावर नवं काही करू नका.
दिनांक- २०, २१, २४, २५ शुभकाळ
महिलांना- संयम, सत्य यांचा प्रतिष्ठेसाठी उपयोग होईल.

आक्रमणे निष्क्रिय होतील
पंचमात गुरू, राहू, सप्तमांत शुक्र, मंगळ, गुरुवारी बुधाचे भाग्यात आगमन होत आहे. कन्या व्यक्ती याच अनुकूल ग्रहांमधून मिळणाऱ्या संधी, लाभणारे यश, प्रतिष्ठा प्रबळ करण्यासाठी उपयोगात आणतील, तर साडेसातीची बरीच आक्रमणे निष्क्रिय करता येतील. मन प्रसन्न ठेवा. रविवारच्या चंद्र-गुरू युतीपासून प्रगतीचा आलेख आकर्षक होत राहील, त्यात व्यापारी प्राप्ती, राजकीय प्रतिष्ठा, बौद्धिक कार्याची प्रसिद्धी यांचा समावेश राहील. जागा, वाहन खरेदी संभवते. त्यामुळे आनंदी राहाल.
दिनांक- १९, २२, २३ शुभकाळ.
महिलांना- रागरंग पाहून कृती करा. यश प्रभाव निर्माण करील.

धोका स्वीकारू नका
चतुर्थात गुरू, राहू, शुक्र, मंगळाची नाराजी, बुध अष्टमात येत आहे. तूळ व्यक्तींनी शनिवारची अमावस्या संपेपर्यंत व्यवहार आणि कृती यामध्ये कोणताही धोका स्वीकारू नये. चंद्र-रवी युतीमधून फटका बसण्याचाच संभव अधिक आहे. भागीदारी, खरेदी-विक्री, ठरणारी मंगलकार्ये, मिळणारी आश्वासने, कागदपत्रातील लिखाण, महत्त्वाचा दस्तऐवज, शासकीय प्रकरणातील पुरावे, यासंबंधात तर चुका क्षम्य ठरणारच नाहीत. परमेश्वरी चिंतनातून उत्साह मात्र मिळत राहील.
दिनांक- २०, २१, २४, २५ शुभकाळ.
महिलांना- संधी सापडेपर्यंत स्वस्थ राहा.

समन्वय साधा
दशमात शनी, पंचमात शुक्र-मंगळ, गुरुवारी बुध सप्तमात येत आहे. कार्यचक्र वेगाने फिरत राहील. कार्यपत्रक, योजना, कृती यांचा समन्वय मात्र सातत्याने साधीत राहणे अवश्यक आहे. रविवारच्या चंद्र-गुरू युतीपासूनच प्रगती दृष्टिपथात येत राहील. रंगभूमीवर चमकाल, अर्थप्राप्ती आकर्षक होईल. मंगलकार्ये ठरतील. समाजात सन्मान मिळतील. प्रवास, भेटी, चर्चा सत्कारणी लागतील. बुध-नेपच्यून केंद्रयोग होत असल्याने शब्दप्रभाव आणि मौल्यवानवस्तू यात मात्र सावध राहा.
दिनांक- १९, २२, २३ शुभकाळ.
महिलांना- विचाराने कृती करा. सकारात्मक परिणाम होतील.

प्रतिमा उजळून निघेल
भाग्यात शनी आणि गुरू, राहूचे सहकार्य, चतुर्थातील शुक्र-मंगळ सहयोग यांचा परिणाम व्यवहाराच्या बऱ्याच विभागांत अनुकूल होईल आणि प्रतिमा उजळून काढणारे यशही मिळेल. पंचमातील रवीमुळे नवे अधिकार हाती येणे शक्य आहे. मुलांच्या समस्या मार्गी लावता येतील. शनिवारच्या चंद्र-रवी युती योगाच्या आसपास अपरिचित व्यक्ती माहीत नसलेले व्यवहार आणि मिळकतीची कागदपत्रे यातून समस्या निर्माण होऊ देऊ नका. काळजीपूर्वक व्यवहार करा.
दिनांक- २०, २१, २४, २५ शुभकाळ.
महिलांना- चकित करणारे यश मिळवता येईल. मनाला शांतता वाटेल.

मार्ग निर्वेध होतील
राशीस्थानी गुरू-राहू, पराक्रमी शुक्र-मंगळ गुरुवारचे बुध राश्यांतर यामुळे मकर व्यक्तींचे कार्यमार्ग निर्वेध होऊ लागतील आणि आगेकूच गतिमान होईल. रविवारच्या चंद्र-गुरू युतीपासूनच त्याचा प्रत्यय येत राहावा. अष्टमात शनी असेपर्यंत काही मंडळी कुरापती काढतील. शासकीय नियमात काही प्रकरणे अडकतील, पण शनिवारी चंद्र-रवी युती योग संपताच यावर यशस्वी कृती करता येईल. व्यापारातून पैसा मिळेल. शुभकार्ये ठरतील. बढती बदली संभवते. आठवडा उत्तम राहील.
दिनांक- २० ते २३ शुभकाळ.
महिलांना- संसारात खुश राहाल. कला-सांस्कृतिक क्षेत्रात चमकाल.

ग्रह आधार देतील
सप्तमात शनी, मीन राशीत शुक्र, मंगळ, मेष सूर्य यांची राशी कुंडलीतील बैठक अर्थप्राप्ती, प्रतिष्ठा, प्रापंचिक समस्या यांना आधार देतील आणि मंगळवारच्या शुक्र-मंगळ युतीपासून एकेका समस्यांमधून बाहेर पडू लागाल. व्ययस्थानी गुरू-राहू असल्याने प्रबलतेसाठी प्रलोभनांचा उपयोग करू नका. गुरुवारी बुध चतुर्थात प्रवेश करीत असल्याने शब्दांचा उपयोगही युक्ती युक्तीनेच करायला हवा आहे. त्यामुळे बाहेर पडण्यात अडथळे येणार नाहीत. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक- २० ते २४ शुभकाळ.
महिलांना- स्वच्छ कृतीमुळेच यश निश्चित.

यशाने चमकत राहाल
राशीस्थानी शुक्र-मंगळ, लाभात गुरू-राहू, मेष रवी गुरुवारी बुध पराक्रमी येणार आहे. नेत्रदीपक यशाने मीन व्यक्ती अनेक प्रांतांत झळकत राहतील. रविवारच्या चंद्र-गुरू युतीपासून याचे प्रतिसाद प्रत्ययास येऊ लागतील. कला, साहित्य, विज्ञान, व्यापार आणि शिक्षण या क्षेत्रात सत्कारणी परिश्रमाचा आनंद मिळवता येईल. शनिवारी चंद्र-रवी युती योग असल्याने यशाचे रूपांतर मस्तीत होऊ देऊ नका आणि भक्तिमार्ग विसरू नका, षष्ठातील शनीचा त्रासही त्यामुळे कमी होईल.
दिनांक- २२ ते २५ शुभकाळ.
महिलांना- प्रयत्न आणि कल्पकतेने यश व्यापक होईल. ‘कराल ती पूर्व’ या उक्तीचा अनुभव यावा.