Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
अग्रलेख

दहशतीची फेरी!

 

सार्वत्रिक निवडणुकीची दुसरी फेरी आज १३ राज्यांमध्ये आणि १४१ मतदारसंघांमध्ये पार पडते आहे. पहिल्या फेरीत नक्षलवाद्यांनी चार राज्यांमध्ये हिंसाचार माजवून १८ जणांचे बळी घेतले होते. ती त्यांची रंगीत तालीम होती, असे मानले तर आज काही मतदारसंघांवर पूर्ण तयारीनिशी ते चाल करू शकतात. देशातले १८२ जिल्हे नक्षलवादीग्रस्त आहेत. झारखंडमधल्या लातेहार जिल्हय़ात नक्षलवाद्यांच्या नावावर वरकाकाना-मुघलसराय ही रेल्वेगाडीच त्यांनी पळवून नेली आणि अखेरीस त्यांनी प्रवाशांना सोडून दिले. ज्यांनी हे कृत्य केले, त्यांनी आपण नक्षलवादी नसल्याचे म्हटले आहे. गेल्या गुरुवारच्या कारवाईत सुरक्षा पथकांनी ज्यांना नक्षलवादी समजून गोळय़ा घातल्या ते सर्वसामान्य खेडूत होते. त्यांचा नक्षलवादी कारवायांशी काडीमात्र संबंध नव्हता, असा गावकऱ्यांनी दावा केला आहे. मारल्या गेलेल्या खेडुतांच्या नातलगांना सरकारने अद्यापि नुकसानभरपाईही दिलेली नाही, त्याचा निषेध म्हणून ही गाडी पळवण्यात आली, असा त्यांचा दावा आहे. ती त्यांनी लातेहारमध्ये सोडूनही दिली. ज्या अर्थी त्यांनी एकही गोळी न झाडता ही पॅसेंजर गाडी ताब्यात घेतली, त्या अर्थी ते नक्षलवादी असतीलच, असे नाही. आजचे नक्षलवादी सामाजिक न्यायापेक्षा खंडणीचीच भाषा अधिक उच्चारतात. गाडी पळवताना त्यांनी ती उच्चारली नाही, म्हणजेच ज्यांनी कुणी ती पळवली त्यांचा उद्देश मतदारांवर दहशतीचा प्रभाव पाडणे हा असू शकतो. आजच्या फेरीत अशा दहशतपायी मतदार कमी प्रमाणात घराबाहेर पडले, तर उर्वरित मतदारांच्या नावावर खोटे मतदान करण्याचे तंत्र संबंधितांना अवलंबिता येईल. मतदारांवर अनेक प्रकारांनी दहशत बसवता येते. बिहार, झारखंड या राज्यांमध्ये यापूर्वी खोटे मतदान सर्रास केले गेले आहे, किंबहुना काही ठिकाणचे तेच एक वैशिष्टय़ आहे. ज्या ठिकाणाहून ही रेल्वे पळवली, त्या परिसरातल्या कोणत्याच भागात आज मतदान होणार नाही. काही ठिकाणी ते गेल्या गुरुवारी पारही पडले आहे. या खेपेला प्रत्यक्ष मतदार न पाठवताही निवडणूक केंद्राधिकाऱ्यामार्फतच सर्व मतदान घडवून आणायची व्यवस्था ते करू शकतात. या राज्यांमध्ये गुन्हेगारी पाश्र्वभूमी असणारे उमेदवार भरपूर आहेत आणि त्यांच्या साथीदारांना त्यांना कसे निवडून आणायचे, ते चांगले माहीत आहे. महाराष्ट्रात पहिल्या फेरीत काही ठिकाणी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची सर्वसाधारण आकडेवारी ३५ टक्के होती, ती पुढल्या तासाभरात ७५ टक्के झाली, म्हणजे ४० टक्के मतदान अवघ्या एका तासात झाले. हा चमत्कार कसा घडला, ते संबंधित उमेदवार वा त्यांचे प्रतिनिधीच सांगू शकतात! मतदारही शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्या ‘गोष्टी’साठी थांबतात हेही गूढ आहे. मतदान घडवून आणायला बिहार, झारखंड यांसारख्या राज्यांमध्ये झुंडशाही, पैसा आणि राजकीय पक्षांनी पोसलेले गुंड यांचा वापर सर्रास केला जातो, त्याला अपवाद कोणताही पक्ष नाही. मार्च २००६ मध्ये निवडणूक नसतानाही नक्षलवाद्यांनी रेल्वे पळवून नेऊन ४० जणांना ओलीस ठेवले होते. म्हणजे रेल्वेच्या रेल्वे पळवायचाही हा काही पहिलाच प्रयत्न नव्हे. नक्षलवादीदेखील वेगवेगळय़ा क्लृप्त्या लढवू शकतात. नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकायचे आवाहन केले असले तरी ते त्यांच्या प्रभावाखाली असणाऱ्या भागात उद्या अमलात येणार नाही, त्यामुळेच इथे संशयाला जागा आहे. आजची निवडणूक पार पडली, की लोकसभेच्या एकूण जागांच्या निम्म्याहून थोडय़ा कमी जागांचे मतदान इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत बंदिस्त होणार आहे. उर्वरित निम्म्यापेक्षा जास्त मतदारसंघांत ३० एप्रिल, ७ मे आणि १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्या वेळी अनुक्रमे १०७, ८५ आणि ८६ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. आज व्हायच्या मतदानात महाराष्ट्रातले २५ मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी बऱ्याच लढती या प्रतिष्ठेच्या म्हणून मानल्या गेल्या आहेत. ज्यांना अजूनही आपल्या मस्तकावर पंतप्रधानपदाचा मुकुट शोभून दिसेल, असे वाटते, त्या शरद पवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. जातीचा अस्सल आधार शोधायलाही सध्या कोणत्याच पक्षाला शरम वाटत नाही. ज्याला पोलीस काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रभर शोधायचे नाटक करत होते आणि जो तेव्हाच्या गृहमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून व्यासपीठावर बसत असे, अशा व्यक्तीला पक्षातून राष्ट्रवादीने बाहेरचा मार्ग दाखवला आणि आता त्याला पुन्हा गोदातीरी ‘पावन’ करून घेण्यात आले आहे. त्याला एकदम घसघशीत पदाचा घासही भरवण्यात आला आहे. त्यायोगे ‘अवघा रंग एकचि झाला’ हेच त्या पक्षाच्या धुरिणांना दाखवून द्यायचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर, छोटय़ा-मोठय़ा जातींच्या समूहांवर, अन्य मागास जातीजमातींवर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचा साधा विचारही त्यांच्यापैकी कुणी करेल, असे वाटत नाही, कारण त्या पक्षात ती परंपरा नाही. ग्रामीण भागाचे प्रश्न आपल्यालाच जास्त कळतात म्हणणाऱ्यांना आपण किती आणि कोणत्या ग्रामीण भागाकडे पाहिले हेही त्यांच्या त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उमजले असावे. आज महाराष्ट्रात पार पडणाऱ्या मतदानाच्या दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पक्ष, तर काहींमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना आणि काँग्रेस विरुद्ध भाजप अशा लढती होतील. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील, सुप्रिया सुळे, नारायण राणे यांचे चिरंजीव अशा काहीजणांचा आजच्या लढतीत समावेश आहे. बीडमधून गोपीनाथ मुंडे हेही उभे आहेत. अहमदनगरमध्ये बंडखोरांनी पेच निर्माण केला आहे. त्यांचे बोलविते धनी वेगळे आहेत. सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणचे माजी संस्थानिक लढतींमध्ये आहेत. सांगलीसारख्या काँग्रेसच्या मतदारसंघात काँग्रेसविरोधी बंडखोरी करणारा उमेदवारही काँग्रेसचाच आहे. म्हणजे तिथे भाजपला उमेदवारही उसना घ्यावा लागला आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार की नाही, ते आधी त्यांना ठरवता येत नव्हते, मग एकेका मतदारसंघासाठी त्यांच्यात घासाघीस सुरू झाली. त्यात ज्या मतदारसंघांबाबत वाद नव्हता, त्यात सांगलीचा मतदारसंघ होता. तिथे भाजप कधीच यशस्वी होऊ शकलेला नाही. या खेपेला त्यांना दोन्ही काँग्रेसजनांच्या लढतीत स्वत:चा खराखुरा उमेदवार उभा करून तशी संधी मिळवता आली असती, पण तिथे भाजपच्याच एका वरिष्ठ नेत्याने आपल्या उमेदवाराला नाव मागे घ्यायला भाग पाडून अवसानघात केला आहे. ‘राष्ट्रीय पातळीवरील आमचा पक्ष म्हणजे आमचा ‘बाप पक्ष’ होता, त्याचा निवडणूक कार्यालयात ‘मृत्यू’ झाला’, अशी पत्रके तिथे वाटण्यात आली आहेत. शिवाय जो उमेदवार काँग्रेस विरोधात लढतीत आहे, त्याने आपल्याला भाजपचा पाठिंबाच नको आहे, असे जाहीर केल्याने पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणाऱ्या या पक्षावर स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून शिव्याशाप खायची वेळ आली आहे. महाराष्ट्रात ज्या लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूरचा समावेश आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी महाराष्ट्रात ज्या एकाच ठिकाणी आतापर्यंत प्रचार केला तो हा मतदारसंघ आहे. त्यालाही काँग्रेस पक्षांतर्गत रस्सीखेचीतून महत्त्व लाभले आहे. ‘लोकसत्ता’साठी डॉ. मनमोहन सिंग यांनी लातूरला दिलेल्या मुलाखतीतूनही त्यांच्या मनाचा कल स्पष्ट झाला आहे. केंद्रात सध्या ज्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या हाती सत्ता आहे, त्या आघाडीतल्या पवारांच्या पक्षासह अन्य कुणालाही ते सध्या तरी दुखवू इच्छित नाहीत, हे उघड आहे. मात्र त्याच वेळी भारताच्या ऊर्जाविषयक समस्येवर भारत-अमेरिका अणुऊर्जा करारच लाभदायी उपाय आहे, यावरही ते ठाम आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनीही दोन देशांमधले असे महत्त्वाचे करार रद्द करता येत नाहीत, असे सांगून कराराचे समर्थनच केले आहे. या पाश्र्वभूमीवर डाव्यांच्या भूमिकेला किंमत शून्य आहे, हेही त्यांनी नमूद केले आहे. डावे हे नेहमीच आत्मपरीक्षणापलीकडे पोहोचलेले, परंतु आत्ममग्न असल्याने ते डॉ. मनमोहन सिंग यांच्या मनाचा विचार करतील असे नाही. नाही तरी डाव्यांनी विचारांची बांधिलकी कधीच सोडून दिलेली असल्याने आता ते त्यांच्या भूमिकेत बदल करतील, अशी अपेक्षा तरी का करावी? आजच्या मतदानात महाराष्ट्राखालोखाल आंध्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांचे अनुक्रमे २०, १७, १७ मतदारसंघ आहेत. बिहार, आसाम, झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश, काश्मीर, त्रिपुरा, गोवा, मणिपूर या राज्यांमध्येही आजच मतदान होत आहे. त्यामुळे मतदानाची ही दुसरी फेरी अधिक हिंसक होण्याची शक्यता आहे. रेल्वे पळवायची कालची कृती ही त्याचीच एक चुणूक आहे.