Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

महाकाल ते महाकाली!
मुंबईतील सर्वात जुन्या असलेल्या कान्हेरी लेण्यांपासून सुरू झालेले हे सिटीवॉक पाशुपतांचा प्रभाव असलेल्या जोगेश्वरी लेण्यांच्या मार्गाने आता महाकाली लेण्यांपर्यंत पोहोचले आहे. महाकालीची लेणी यापूर्वी अतिशय वाईट अवस्थेमध्ये होती. यापूर्वी या लेण्यांमध्ये अधूनमधून जाण्याचा प्रसंग यायचा तो बातम्यांच्या निमित्ताने. या लेण्यांमध्ये त्यावेळेस दारुचे आणि जुगाराचे अड्डे चालायचे. मात्र आता अलीकडे पुरातत्व खात्याने अतिशय चांगली कामगिरी बजावली असून हा संपूर्ण परिसर या जुगाऱ्यांपासून मुक्त केला आहे. आता या लेण्यांना एक चांगले कुंपणही घालण्यात आले असून तेथील सर्व घाण स्वच्छ करण्यात आली आहे. आता हा परिसर केव्हाही जावून फिरता येईल, एवढा उत्तम आहे. येणाऱ्या काळात आणखी काही चांगले रिस्टोरेशनचे काम करून या परिसराचे सुशोभिकरण करण्याचाही त्यांचा विचार आहे. प्रत्यक्ष लेणी पाहण्यास सुरुवात करण्याआधी या लेण्यांचे ठिकाण समजून घेणे महत्त्वाचे ठरते. ज्या टेकडय़ांवर या लेणी वसलेल्या आहेत त्यांना वेरावली टेकडय़ा असे म्हणतात. बाजूलाच पालिकेचा वेरावली जलाशयही आहे. पूर्वेच्या बाजूस पवई आणि विहार जलाशय येतात. आग्नेयेस घाटला आणि कोपरे गावठाण आहे. महाकालीच्या उत्तरेस जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड आहे. ही सर्व आजूबाजूची ठिकाणे जुनी असून हे सर्व मार्ग हे जुने व्यापारी मार्ग आहेत. सध्या विहार तलावावरून- तुळशी मार्गे जो रस्ता कान्हेरीकडे जातो, तो जुना प्राचीन मार्ग आहे. जोगेश्वरी- विक्रोळी हाही जुना व्यापारी मार्ग आहे. आणि घाटकोपरमार्गे त्यावेळेस तुभ्र्याला आणि तिथून पुढे एलिफंटाला जायचे असा मार्ग होता. महाकालीच्या खालच्याच बाजूस कोंडिविटा नावाचे गाव आजही अस्तित्वात आहे. हे प्राचीन गावठाण आहे. कोंडिविटे ही एके काळी िबब राजाची राजधानी होती. महाकाली आणि जोगेश्वरीची लेणी अस्तित्वात आली त्यावेळेस या परिसरामध्ये बरीच तळी होती. पाण्याचा साठा मुबलक होता. आता मात्र या तळ्यांची संख्या कमी झाली आहे. बौद्ध धर्मातील हिनयान, महायान, वज्रायन पंथांचा प्रभाव आपल्याला महाकालीमध्ये थेट पाहायला मिळतो. पहिल्या शतकाच्या अखेरीस किंवा दुसऱ्या शतकामध्ये महाकालीची सुरुवात झाल्याचे मानले जाते.

नवीन सहा स्पर्धक करणार धमाल
स्टार प्रवाहवरील ‘जोडी जमली रे’ या रिअलिटी शोला स्पर्धकांचा आणि प्रेक्षकांचाही आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागच्या पर्वात सागर आणि अर्चना या जोडीला सर्वोत्तम अनुरूप जोडी हा किताब मिळाला आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचे पारितोषिकही मिळाले. आता नवीन पर्व गुरुवारपासून सुरू होत आहे. या नवीन पर्वात संतोष वैद्य, योगेश शुक्ल, रघुवीर भगावत, सुमिधा रानडे, हर्षदा जोशी आणि धनश्री सहस्रबुद्धे असे नवे सहा स्पर्धक सहभागी होत आहेत. आपला अनुरूप जोडीदार शोधण्यास त्यांना सूत्रसंचालक कविता मेढेकर आणि अतुल परचुरे यांच्यासह स्पर्धकांचे पालक, तज्ज्ञ मंडळी मदत करणार आहेत. नेहमीप्रमाणे इंटरॅक्टिव्ह व रंजक खेळांद्वारे ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट’ घेऊन जोडय़ा ठरविण्यात येतील आणि मग सर्वोत्तम अनुरूप जोडी हा किताब मिळविण्यासाठी स्पर्धा रंगणार आहे. तीन जोडय़ा कुणाकुणाच्या जमणार हे गुरुवार व शुक्रवारच्या भागात रात्री १० वाजता पाहिल्यावरच प्रेक्षकांना समजणार आहे.
प्रतिनिधी