Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
लोकमानस

मतदारांसाठी आदर्श आचारसंहिता

 

कोणत्याही एका पक्षाला अथवा आघाडीला लोकसभेत निर्णायक बहुमत मिळण्याचे दिवस आता इतिहासजमा झाल्यामुळे विद्यमान मतदारांना, पक्ष विचारात न घेता उमेदवारांच्या गुणवत्तेवर निवड करून देशाला गुणवान व चारित्र्यसंपन्न सरकार मिळवून देण्याची अभूतपूर्व संधी प्राप्त झाली आहे. मी एक वरिष्ठ नागरिक असून, मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाल्यापासून, प्रत्येक निवडणुकीत न चुकता मतदान केले आहे. माझी मतदार बंधू-भगिनींना विनंती आहे की, मतदान करताना खालील निकषांचा विचार करावा.
उमेदवाराचे चारित्र्य निष्कलंक आहे काय? त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे का अथवा अशा गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली आहे काय?
उमेदवाराचे शिक्षण किती झाले आहे? हिंदी व इंग्रजीचे ज्ञान नसणाऱ्या खासदारास लोकसभेत काय चालले आहे त्याचा पत्ता लागणे अशक्य आहे.
देशापुढील समस्या समजून घेऊन त्यावर उपाय सुचविण्याची उमेदवाराची कुवत आहे का?
‘मौनी’ खासदार एक वेळ परवडले, पण जे ४०-५०% हजेरीसुद्धा लावू शकत नाहीत त्यांना पुनर्निर्वाचित करणे चूक आहे.
स्टार, सुपरस्टार व अन्य ‘सेलिब्रेटीज’कडून त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे संसदेत अभ्यासपूर्ण योगदान करणे शक्य नाही, हे लक्षात घ्यावे.
विद्यमान वा दिवंगत राजकारण्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, काका, काकी, पुतण्या, जावइे इत्यादींना त्यांची कर्तबगारी पाहून निवडावे. भावनेच्या आहारी जाऊन नव्हे.
तिकीट मिळाले नाही म्हणून पक्ष बदलणाऱ्याचा विचार तो कर्तबगार असल्यासच करावा.
जातीच्या जोरावर मते मागणारा, पैसे वाटप करणारा उमेदवार अयोग्य समजावा.
पुनर्निर्वाचित होण्यासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी, खासदार असताना, खासदारनिधीचा विनियोग कसा केला ते पहावे.
उमेदवारांमध्ये योग्य उमेदवार नसल्यास आपले मत वाया न घालविता त्यातल्या त्यात कमी अपात्र असलेला उमेदवार निवडावा.
मतदान न करणे म्हणजेच अयोग्य माणसाला अप्रत्यक्षपणे निवडणे होय.
विलास कर्णिक, डोंबिवली

हे पुढारी नंतर दिसणारही नाहीत!
लोकसभा निवडणुकीचा रंग चांगलाच चढू लागला आहे. प्रत्येक वृत्तपत्रात जाहीरनामे, वचने, आश्वासने वाचून राजकारणात किती कोडगे व्हावे लागते हे शिकायला मिळाले. कारण पालघरमधील एका उमेदवाराचे थेट मतदारांशी भेट असे छायाचित्र प्रसिद्ध झाले. मला वाटते ते पाच वर्षांतून एकदाच मतदारांच्या जवळ जातात नि भेटी घेतात. त्याचप्रमाणे दुसरे उमेदवार पत्नीसह शेतात काम करून मगच प्रचाराला जातात असा फोटो आला होता आणि ते वकील आहेत, तर मग ते शेती करतात की वकिली? कारण तेही एकदाच मतदारांना भेटत असावेत, म्हणून त्यांनाही न मागता तिकीट मिळाले आहे.
पालघर लोकसभेत कोणकोणाची युती आहे हेच कळत नाही. कल्याणमधील उमेदवार तर चक्क रेल्वेने प्रवास करून मतदारांशी संपर्क साधताना छायाचित्र आले आहे. पण या उमेदवारांनी ठाणे, वाशी रेल्वेसेवा सुरू झाल्यावर एकदा तरी प्रवास केला होता काय? ठाण्यातील एका उमेदवाराचे परिचयपत्र वाचनात आले. ते पत्रक मतदारांना होते की कामगारांना? १५ वर्षे वृत्तपत्र वाचनात त्यांचे योगदान कधी वाचनात नाही आले. मतदानाला फक्त १५ दिवस राहिले तरी मतदारांपर्यंत पोहोचणे कठीण होऊन बसले आहे. अशीच स्थिती बहुतेक मतदारसंघातील सर्व उमेदवारांची. कूपमंडूक वृत्ती त्यांना जड जात आहे. २९ एप्रिल २००९ पर्यंत हे लोक थेट भेटतील पण नंतर भेटणार तर नाहीतच; पण दिसतील की नाही हेही सांगता येत नाही. नंतर दिसणारच नाहीत असे म्हटल्यास जास्त वावगे ठरेल.
मोहन गुहे, विक्रमगड, जव्हार, मोखाडा

हे तर भ्रष्टाचाराला आमंत्रण!
जुन्या पक्षांच्या जोडीला नवनवीन पक्षही उदयाला आले आहेत. जनतेचे खरे प्रतिनिधी, समाजसेवक म्हणवून घेणाऱ्या हौसे, नवशे व गवशांना या पक्षांमधून तिकीट मिळाले नाही म्हणून पक्षाशी बंडखोरी करून उभे राहिले आहेत.
जे आज अपक्ष म्हणून उभे आहेत ते जर या निवडणुकीत निवडून आले तर त्यांची किंमत वाढणार आहे. कारण संख्याबळात कमी असलेले पक्ष त्यांना आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी फेकला जाणारा पैसा साहजिकच काळा पैसा असेल. अशा पैशाचा स्रोत काय किंवा तो कशा प्रकारे जमा झाला याचा काहीच ठावठिकाणा नसेल.
जमिनी, दुकाने, फ्लॅटस्, हॉटेले, फार्म हाऊसेस, बंगलेही फुकाचा पैसा असल्यामुळे चढय़ा किमतीत विकत घेतली जातील. सामान्य पापभीरू, प्रामाणिकपणाने वागणारे मध्यमवर्गीय व इतर साहजिकच त्यापासून वंचित राहतात.
म्हणूनच खरी लोकशाही टिकवायची असेल तर त्यांना मतदान न करणेच योग्य. कारण अशांना मतदान म्हणजे भ्रष्टाचाराला आमंत्रण. जो स्वत:च्या पक्षाचा होऊ शकत नाही तो दुसऱ्यांना जवळ कसे करणार किंवा त्यांचा कसा होणार?
मनोहर जाधव, काळाचौकी, मुंबई

मराठा आरक्षण व ओबीसी
‘गाफील ओबीसींना भवितव्य काय’ (२२ मार्च) हा प्रा. अशोक बुद्धिवंत यांचा लेख वाचला. त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात लिहिलेल्या अगोदरच्या लेखांद्वारे ओबीसीमध्ये जे जागृतीचे कार्य केले आहे, त्याकरिता धन्यवाद.मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करणे म्हणजे उंटाला तंबूत प्रवेश देण्यासारखे आहे. जेमतेम १५ टक्के असणाऱ्या उच्च मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या तिप्पट-चौपट प्रमाणात जे राजकीय प्रतिनिधित्व मिळते ते इतर बहुजन समाजाने त्यांना केलेल्या मतदानामुळे, हे त्यांनी विसरू नये. मराठा समाज व इतर बहुजन समाज यांच्यामध्ये दुफळी निर्माण झाली व त्यांनी मराठा उमेदवाराला मते द्यायचे टाळले तर मराठा राजकर्त्यांचे नुकसान होईल हे जाणून मराठा नेत्यांनी आरक्षणासाठी पुढे सरकविलेली प्यादी त्वरित मागे घ्यावीत.
अजूनपर्यंत काही अपवाद वगळता मराठा समाजाला सातत्याने मुख्यमंत्रीपद मिळालेले आहे, निदान पुढच्या वेळी ६० टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसीमधून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड व्हावी ही अपेक्षा.
विद्याधर बांदेकर, बोरिवली, मुंबई

मनांचे शुद्धीकरण आवश्यक
‘मन बेशुद्ध तुझं’ (१५ मार्च) हा अतुल देऊळगावकरांचा अप्रतिम लेख वाचण्यात आला. पाणी शुद्ध ठेवण्याची जाणीव जनतेच्या सर्व स्तरांवर व्हावयास हवी, ही त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी व वास्तव आहे. हा लेख वाचताच माझे मन दोन दिवस अगोदर घडलेल्या प्रसंगाकडे गेले.
१३ मार्चला मी बडोद्यात होतो. बडोद्यापासून १५-१६ कि.मी. अंतरावरून मही नदी वाहते. तिथे अहमदाबाद महामार्गाने जाता येते. नदीचे पात्र बरेच रुंद असून तेथील स्थानिक लोकांत मही नदीबद्दल खूप श्रद्धा आहे. नदीच्या काठावर जागोजागी लाकडी अथवा शाडूच्या, फूट दीड फूट उंचीच्या मूर्ती उभारल्या आहेत. लोक त्यांची पूजा करतात. पूजेनंतर गुलाल, निर्माल्य तिथेच पाण्यात टाकतात. नदीचे पात्र अतिशय घाण असून चोहीकडे प्लास्टिकच्या पिशव्या व गुटख्याचे पाऊच दिसतात. पात्रातील पाणी खूप गढूळ असूनही भाविक कुटुंबे श्रद्धेने त्यात स्नान करतात व पाणी तोंडात घेतात. या ठिकाणी मी माझे भाऊ व भाच्यासोबत माझ्या मेव्हण्याच्या अस्थी व रक्षा विसर्जनासाठी गेलो होतो. श्रद्धेचा भाग म्हणून पूजास्थानापासून बऱ्याच अंतरावर ओंजळभर अस्थींचे विसर्जन केले. राहिलेल्या अस्थी व रक्षेचे विसर्जन मात्र केले नाही. महामार्गाच्या मधोमध रुंद दुभाजक असून तिथे बोगनवेल व तत्सम रोपे लावली आहेत, तिथे विसर्जन केले.
नदी स्वच्छ ठेवणे हे खूप मोठे कार्य असून ते केवळ सर्वाच्या सहभागाने शक्य आहे. यात आम्हाला समाधान एवढेच की, मही नदीचे पाणी आणखी घाण न करता आम्ही आमचा खारीचा वाटा उचलला आहे. प्रत्येकाने असा विचार केल्यास आपल्या नद्या स्वच्छ राहण्यास हातभार लागेल.
विजयकुमार सौताडेकर, लातूर