Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

पवार, शिंदेंसह दिग्गजांचे भवितव्य आज सीलबंद
पुणे, २२ एप्रिल/प्रतिनिधी

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील दोन राजो व चार खासदरांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. सांगलीत विद्यामान खासदार प्रतीकस पाटील, इचलकरंजीच्या खासदार निवेदिता माने, कोल्हापूरचे माजी खासदार व बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलिक व सोलापूरचे खासदार सुभाष देशमुख उद्याच्या मतदानात भवितव्य आजमावित आहेत. सांगलीत काँग्रेसला अजित घोरपडे यांची बंडखोरी तर कोल्हापुरात राष्ट्रवादीला सदाशिवराव मंडविक यांची बंडखोरी सर्वाचे लक्ष वेधून घेणारी आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोघा कार्यकर्त्यांना मारहाण
वाळव्यात आज गृहमंत्र्यांना फिरण्यास मज्जाव करावा- शेट्टी

कोल्हापूर, २२ एप्रिल / विशेष प्रतिनिधी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या उठावामुळे विचलित झालेल्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या मतदारसंघात मोठी दहशत निर्माण केली आहे. त्यांच्याच प्रोत्साहनाने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणे, मतदान केंद्रावर बूथ न टाकण्याविषयी धमक्या देणे असे सर्रास प्रकार सुरू असून मतदानावेळी मतदानकेंद्रांचा कब्जा घेणे, असुरक्षित वातावरण निर्माण करणे अशा गोष्टींची गंभीर शक्यता असल्याने वाळवा तालुक्यातील १६ गावांसह मतदारसंघातील एकूण ३३ गावात विशेष यंत्रणा तैनात करावी.

आबांच्या कानपिचक्या
सांगली, २२ एप्रिल / प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आमदार अजित घोरपडे यांना विविध राजकीय पक्षातील बंडखोर पाठिंबा देत आहेत. मात्र त्यांच्या अकलेची दिवाळखोरी निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी बुधवारी व्यक्त केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार खासदार प्रतीक पाटील यांच्या समर्थनार्थ हॉटेल ‘अ‍ॅम्बेसिडर’ येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत आर. आर. पाटील बोलत होते. लोकसभेची निवडणूक स्थानिकऐवजी राष्ट्रीय मुद्दय़ावर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कोल्हापूर , हातकणंगलेत ‘अर्थ’वाही यंत्रणा गतिमान
कोल्हापूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील प्रचाराचा गदारोळ मंगळवारी सायंकाळी संपल्यानंतर उमेदवारांच्या विश्वासू कार्यकर्त्यांची अर्थकारणावर अवलंबून असलेली यंत्रणा गतिमान झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कुंपणावरून उडी मारून आत आल्याबद्दल एका सामान्य माणसाच्या विरूध्द आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करणाऱ्या आचारसंहिता अंमलबजावणी पथकाला आणि त्यांच्या कॅमेऱ्याला मात्र अर्थकारणाच्या हालचाली दिसू शकत नाहीत.

सोलापुरात बसपाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा खोटा प्रचार
निवडणूक आयोगाकडे तक्रार
सोलापूर, २२ एप्रिल/प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा मतदारसंघात बसपाचे उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना पाठिंबा दिल्याचा जाणीवपूर्वक खोटा प्रचार केला जात असून त्यासाठी बसपाच्या लेटरपॅडचे स्कॅन करुन त्याचा दुरुपयोग करण्याचे हिणकस राजकारण खेळले जात असल्याचा आरोप बसपाला पाठिंबा दिलेले माकपचे आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत त्यांनी काँग्रेसवर संशय घेतला असून तशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाला एकच दिवस शिल्लक असताना बसपाच्या लेटरपॅडचे स्कॅन करुन त्याचा दुरुपयोग करीत व त्यावर खोटय़ा सह्य़ा करुन या पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा असल्याचे निवेदन प्रसार माध्यमांना पाठविण्यात आले. बसपाची व उमेदवार गायकवाड यांची बदनामी व्हावी आणि या पक्षाचा वाढत चाललेला जनाधार कमी व्हावा हाच यामागचा हेतू आहे, असे आमदार आडम यांनी सांगितले. या निंद्य घटनेचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. या पत्रकार परिषदेस पक्षाचे उमेदवार प्रमोद गायकवाड यांच्यासह जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संजीव सदाफुले, अ‍ॅड. रजाक शेख, नगरसेवक बबलू गायकवाड, आनंद चंदनशिवे, अशोक जानराव आदी उपस्थित होते.

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी आज
अक्कलकोट, २२ एप्रिल/वार्ताहर

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा गुरुवार दि. २३ रोजी साजरा होत आहे. मात्र लोकसभा निवडणूक मतदान आणि उन्हाची तीव्रता यामुळे भक्तजनांचा ओघ कमी होण्याची शक्यता आहे.
श्री दत्त अवतारी स्वामीसमर्थांनी भारतभर भ्रमण करून प्राचीन प्रज्ञापुरी म्हणजेच अक्कलकोट नगरीत पुरातन वटवृक्षाखाली २२ वर्षे वास्तव्य केले. कर्मयोगाचा संदेश देत भक्तजनांच्या उद्धारासाठी अनेक अद्भूत लिला केल्या. अवतार समाप्ती शके १८०० साली चैत्रमास त्रयोदशीस वटवृक्षाखाली केली. यंदा १३८ वी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त पहाटे दोन वाजता नगरप्रदक्षिणा, पहाटे काकड आरती, अभिषेक, गुरुचरित्र पारायण, दुपारी १२ वाजता परंपरेप्रमाणे अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने स्वामी समर्थाची महापूजा आणि नेवैद्य अर्पण केला जाणार आहे. सायंकाळी पाच वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे. स्वामी समर्थाचे मूळपीठ वटवृक्ष मंदिर तोरण पताका, नयनरम्य विद्युतदीपांनी सुशोभित करण्यात आले आहे. भक्तजनांना सुलभतेने दर्शन व्हावे यासाठी वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष बाळासाहेब इंगळे, विश्वस्त विलास फुटाणे आत्माराम घाटगे, महेश इंगळे, उज्वला सरदेशमुख यांच्यासह अंकुशराज जगदाळे, मल्लीनाथ बोथले, तुळशीराम आवटे, तात्यासाहेब घाटगे, विजय कडगंची कार्यरत आहेत.
पुण्यतिथीनिमित्त भक्तजनांच्या महाप्रसादाची सोय स्वामी समर्थ मंडळात करण्यात आली असून, अध्यक्ष जन्मेंजय भोसले, सचिव श्याम मोरे, सेवाकार्यात मग्न आहेत. स्वामी समर्थाच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या राजेशयन मठात महापूजा अध्यक्ष अ‍ॅड. शरद फुटाणे यांच्या हस्ते होणार आहे.

घोरपडेंचा विजयाचा दावा
सांगली, २२ एप्रिल / प्रतिनिधी

खासदारकीचे कवच पांघरून प्रतीक पाटील व त्यांच्या कंपूने केलेला भ्रष्टाचार पुराव्यानिशी जनतेच्या दरबारात मांडला आहे. त्याला जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आमदार अजित घोरपडे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केला. अजित घोरपडे यांच्या राम मंदिर चौकातील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिनकर पाटील हेही उपस्थित होते. भ्रष्टाचारविरहीत कारभार व सर्वागीण प्रगती या दोन मुद्दय़ांवर आपण निवडणूक प्रचारात भर दिला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बँक, साखर कारखाना, सूतगिरणी, बझार व दूध संघ अशा अनेकविध संस्था त्यांच्या वारसांनीच संपविल्या. त्यातील भ्रष्टाचार आपण जनतेसमोर मांडला आहे. आता खासदारच वसंतदादा शेतकरी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने चुकीची कारवाई केल्याचे सांगत आहेत. ही गोष्ट हास्यास्पद असून यातून खासदारांचे अज्ञानच प्रकट होते, अशी टीकाही घोरपडे यांनी केली. निवडणूक प्रचारादरम्यान जनतेने आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. परिवर्तनाच्या या लढाईत सहकार्य करण्याचे आवाहन आपण केले आहे. त्याला निश्चितच साथ मिळेल. सांगली शहरातील पाणी योजना, ड्रेनेज व गुंठेवारी यासह ग्रामीण भागातील क्षारपड जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ताकारी, टेंभू व म्हैसाळ या सिंचन प्रकल्पांना केंद्र शासनाकडून निधी खेचून आणण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही घोरपडे म्हणाले.

पवार, उदयनराजेंना भटक्या- विमुक्तांचा पाठिंबा
सातारा, २२ एप्रिल/प्रतिनिधी

माढा व सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीस भटके विमुक्त जाती जमातीचा पाठिंबा देण्यात आला असल्याचे भटके विमुक्त समन्वय समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष व्यंकटराव अवधूत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यातील इतर ठिकाणी राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहनही केले. अवधूत यांनी सांगितले की, भटक्या विमुक्त मतदारांची संख्या धनगरांसह ११ टक्के आहे. माढा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर धनगर समाजाचे असले तरी त्यांना दोन टक्क्य़ांच्यावर मते पडणार नाहीत. त्यांनी भटके विमुक्तांसाठी काहीही केलेले नाही. भटके विमुक्तांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने बाळकृष्ण रेणके आयोग नेमला. त्यांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे. ती झाल्यास १० टक्के वेगळे आरक्षण प्राप्त होणार आहे. महादेव जानकर यांना या आयोगाबाबत काही माहिती असल्याचे दिसून येत नाही. भटके विमुक्त त्यांना साथ देणार नाहीत.