Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

रथी-महारथींचे भवितव्य आज ठरणार!
मुंबई, २२ एप्रिल / खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील २५ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होत आहे. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे व बॅ. ए. आर. अंतुले या केंद्रीय मंत्र्यांसह गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, समीर भुजबळ, निलेश राणे, चंद्रकांत खैरे आदींच्या भवितव्याचा फैसला उद्या ठरणार आहे. उद्या मतदान होत असलेल्या मतदारसंघांतून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे आव्हान राष्ट्रवादीपुढे असून पवारांच्या पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या या पक्षाची खरी कसोटी आहे.

एलटीटीईच्या दोन म्होरक्यांची शरणागती
प्रभाकरनचा अद्याप ठावठिकाणा नाही
कोलंबो, २२ एप्रिल/ पीटीआय
श्रीलंका लष्कराची उत्तर भागात तीव्र गतीने आगेकूच सुरू असल्याने तमिळ बंडखोर संघटनेचे आघाडीचे काही गट भराभर शरणागती पत्करत असून, गेली २५ वर्षे तमिळ बंडखोरांविरुद्ध सुरू असलेला अविश्रांत लढा आता संपुष्टात येण्याची चिन्हे दृष्टिपथात आहे. ‘एलटीटीई’ या तमिळ बंडखोर संघटनेचा पूर्वी प्रवक्ता असलेला दया मास्टर आणि जॉर्ज हे दोघे आघाडीचे नेते पुटुमाथालन येथे शरण आले.

.. तर पंतप्रधानपद स्वीकारण्याचा विचार करेन- प्रकाश करात
तिरुपती, २२ एप्रिल/पी.टी.आय.

‘अपरिहार्य परिस्थिती’ निर्माण झाल्यास पंतप्रधानपद स्वीकारण्याबाबत आपण विचार करू, असे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी आज सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सरकार स्थापण्यासाठी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगून देशात तिसरी आघाडी हीच सर्वात मोठी राजकीय शक्ती ठरेल, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण नसलो तरी अन्य कोणताही पर्याय नसल्यास हे पद स्वीकारण्याचा आपण विचार करू, असे करात यांनी पत्रकारांना सांगितले.

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अमेरिकाधार्जिणे
प्रकाश करात

समर खडस
मुंबई, २२ एप्रिल

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार अमेरिकाधार्जिणे असून या देशाच्या आर्थिक नाडय़ा स्वत:च्या ताब्यात ठेवण्याच्या अमेरिकी षडयंत्रात हे सरकार सामील आहे. त्यामुळेच या सरकारचा पाठिंबा आम्ही काढला होता. अणुकरारावर पुनर्विचार करण्यास जे सरकार तयार असेल त्याच भाजपारहित सरकारला आमचा केंद्राचा पाठिंबा असेल, अशी प्रतिक्रिया मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

डेक्कन चार्जर्सची रॉयल चॅलेन्जर्सवर मात
केपटाऊन, २२ एप्रिल/वृत्तसंस्था

डेक्कन चार्जर्सने रॉयल चॅलेंजर्सचा २४ धावांनी पराभव करून दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. ४५ धावांत ७१ धावा फटकाविणाऱ्या अ‍ॅडम गिलख्रिस्टने डेक्कन चार्जर्सला २० षटकांत ६ बाद १८४ धावसंख्या उभारून दिली. गिलख्रिस्टला सामनावीर पुरस्कार मिळाला. रोहति शर्माने ३० चेंडूत ५२ धावा फटकावून त्याला साथ दिली. रॉयल चॅलेन्जर्सला २० षटकांत ८ बाद १६० धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. २७ चेंडूत ४८ धावा फटकावून द्रविडने आणि ३२ चेंडूत ५० धावा फटकावून विराट कोहलीने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पराभवानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना राहूल द्रविड म्हणाला, ‘‘आम्ही गोलंदाजीत पहिली ६ षटके खराब गोलंदाजी केली आणि फलंदाजीच्या वेळी पहिली ६ षटके आम्ही संथ खेळलो. त्यामुळे आमचा पराभव झाला.

राणे आणि अंतुले साक्षीदार?
मुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी

२६११ खटल्यातील एक आरोपी सबाऊद्दीन शेख याच्यातर्फे साक्षीदार म्हणून केंद्रीय मंत्री बॅ. अंतुले आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांना बोलाविण्यात येईल, असे आज न्यायालयात सुचित करण्यात आले. अभियोग पक्षाने सादर केलेल्या आरोपांच्या मसुद्यावर आज संशयित सबाउद्दीन शेख याचे वकील इजाज नक्वी यांनी उत्तर दाखल केले. त्या वेळी त्यांनी पुन्हा एकदा आपल्या अशीलाविरुद्ध अभियोग पक्षाकडे कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगत त्याला दोषमुक्त करण्याची मागणी केली. तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हत्येविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांना बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणूनही न्यायालयात बोलवू, असे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने मात्र प्रकरणाची सुनावणी सध्या प्राथमिक पातळीवर असून प्रत्यक्ष खटला सुरू झाल्यानंतर त्याविषयी तुम्ही मागणी करू शकता, असे स्पष्ट केले.

‘मोडक्या हिंदीमुळे विपर्यास’
कोलकाता, २२ एप्रिल / पी.टी.आय.

लालूंना केंद्रात मंत्री होणेसुद्धा कठीण जाईल, असे विधान करणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांनी दुसऱ्याच दिवशी घूमजाव केले असून मोडक्या तोडक्या हिंदीत बोलल्याने आपल्या भाषणाचा विपर्यास झाल्याची सारवासारव त्यांनी आज येथे केली. लालू प्रसाद यादव यांचा राजद युपीए आघाडीचा अद्यापही घटक आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. समस्तीपूरला केलेल्या भाषणात आपण हिंदीत बोललो. मात्र, हिंदी तेवढेसे चांगले नाही. परिणामी शब्दांची गफलत झाली आणि विधानाचा विपार्यास करण्यात आला, असेही मुखर्जी यांनी सांगितले. प्रणव मुखर्जी यांच्या विधानामुळे आधीच ताणले गेलेले राजद-काँग्रेस संबंध बिघडण्याचा धोका निर्माण झाला होता.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात २१ टक्के वाढ
१३०० ते आठ हजार रुपयांपर्यंत वेतनवाढ
मुंबई, २२ एप्रिल / खास प्रतिनिधी

सुमारे १६ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या महिनाअखेर मिळणाऱ्या वेतनात सरासरी २१ टक्के वाढ मिळणार आहे. सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला असला तरी या संदर्भातील आदेश आज जारी करण्यात आला. वाढीव वेतनश्रेणी लागू झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात १३०० रुपये ते आठ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सुमारे १६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच साडेसात लाख निवृत्त वेतनधारकांनाही सहावा वेतन आयोग लागू झाल्याने त्याचा लाभ मिळणार आहे. निवडणूक आयोगाने संमती दिल्यामुळे सहावा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश जारी करण्यात आला. येत्या १ तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतनाचे धनादेश नवीन वेतनश्रेणीनुसार मिळतील. सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारीपासून सहा टक्के महागाई भत्त्यात वाढ मिळावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे यांनी व्यक्त केली आहे. तसेच घरभाडे व वाहतूक भत्त्यांचा प्रलंबित प्रश्नही लवकर सुटावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
प्रत्येक शुक्रवारी